सणासुदीत वशाट खावं वाटलं किंवा जातीबाहेर लग्न करावं वाटलं तर हा पिच्चर तुमच्यासाठीय…

झकऱ्या मुहम्मद म्हणजे मुसलमान माणसाचं नवं सौंदर्यशास्त्रय. मल्याळम इंडस्ट्रीत नाव कमावणारा नवाट पोऱ्या. त्याच्या मागच्या पिच्चरला, “सुदानी फ्रॉम नायजेरिया”ला कोल्हापुरातल्या फुटबॉलर पोरांनी डोक्यावर घेतलं होतं.

फुटबॉल, फॅमिली, इस्लाम आणि प्रेम ह्या सगळ्याला आपलंसं करून एका कथेत गुंफून अफाट तोरण बनवण्याचं काम मल्लूच करू शकत्यात. ह्या खालच्या एका मिनीटावरून त्यातल्या कोण कुठल्या आफ्रिकन पोराला अख्ख्या केरळनं किती जीव लावलाय समजेल…

त्याचा नवीन पिच्चर साध्या स्टोरीवर आहे. सोबतच्या कलाकारांची नावं मोठी आहेत यंदा.

सगळ्यांची आवडती ‘करीब करीब सिंगल’ पार्वती आणि सौबीन साहिर सोबत इंद्रजित, जुजू जॉर्ज, कुंभलंगीमधली ग्रेस अँटनी ह्यांचीही जादू ह्यात आहेच.

पण रहेमतुल्लाह म्हणत त्यानं आपल्या कथेत आता मोठ्या विषयाला हात घातलाय.

जरका कधी मुसलमान दोस्ताबरोबर वशाट जेवायला बसलं तर चौकशी होतेय ती हराम आहे का झटका… KFC मध्ये गेल्याव नक्की काय खावं ह्याची गोची होऊन बसते. आमच्या लहानपणी,गावातल्या एका खालाने खेकडा धरलेला चिमटा कायमचा फेकून दिला होता, शिवाय ‘खेकड्यांच्या जवळ गेलाच कसा’ म्हणून टोले पडले होते. तर दुसरीकडं नक्की काय हलाल आहे ह्याच्यावरून मोठे वादविवाद होत असत्यात.

त्यामुळं ह्याही बाबतीत जरका ‘लोग आसान समझते हैं मुसलमान होना’ असा समज असेल तर काढून टाका.

सोप्या भाषेत जे आम्ही पेन्शनवाला मशिदीत जे शिकलो, त्याच्यावरून हलाल म्हणजे जे काही कायद्यानं वैध, योग्य आणि मान्य असेल ते. आणि हराम म्हणजे ह्याच्या विरुद्ध, जे नसेल ते. आपल्याला जेवायच्या बाबतीत ते जास्त लवकर दिसून येतं, पण दर बाबतीत चांगुलपणानं वागावं म्हणून हे नियम आहेत.

दर जुम्म्याच्या खुतब्यातून आम्हालाही सईद सायेबांकडून नवनवीन गोष्टी समजत्यात, पण कुरआनपासून ते वेगवेगळ्या ‘हदीस’मध्ये ह्या गोष्टींचं सांगोपांग वर्णन येतं.

फकल्लू मिम्मा रजाका कुमुल लहू हलालन तैयीबनव वाशकुरु नि’मतल-लाही इन कुंतुमी इयाहू ता’बुदून

पवित्र कुरआनच्या सुराह (थोड्या फरकानं अध्याय समजा) अल-बकराहमधल्या १७२ व्या आयतीत (ओवी) म्हटलंय की “श्रद्धावंत माणसांसाठी अल्लाहनं चांगल्या वस्तूंचा पुरवठा केला आहे, त्याचे सेवन करावं”.

पण जगाची आणि धर्माची गती वेगळी झाल्यावर काय होतं?  काळाच्या ओघात हलाल काय असावं नि हराम काय ह्यात बऱ्याच गोष्टींची भर पडलेय. मग एखादी गोष्ट भावली आणि दुसरीकडं समाजानं चुकीची मानली तर काय?

जिंदगीची मूल्य आणि प्रेम, धर्म आणि कला ह्या गोष्टीतलं एक निवडावं लागलं तर माणसानं कुणाची निवड करावी? युधिष्ठिरापासून ते हजरत इब्राहिमपर्यंत, मिलिंद राजापासून गुरुगोविंदसिँह, तुकारामापासून ते अलामा इकबाल ह्या सगळ्यांपुढं हा प्रश्न कधींनकधी आला होता.

त्या माणसांनी आपल्या विवेकानं ह्या दोन्हींची सांगड घालून उत्तरं शोधली आणि इतिहासात आणि धर्मात आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरली.

पण आपण पडलो रोजचं धडपडीचं जगणं तारून नेणारी साधी माणसं!

आपण ह्यातलं काय निवडावं? काय ठरवावं आणि बदलत्या जगाचा आणि आपल्या धर्माचा ताळमेळ कसा घालावा? ह्याचं उत्तर शोधताना ‘हलाल लव्ह स्टोरी’ तुमच्या हाताशी असुद्या.

छोट्या गावातल्या एका इस्लामिक संघटनेच्या लोकांना भाषणं आणि पथनाट्य सोडून चांगलं काहीतरी करायचं असतंय. सगळीकडं आयटम नम्बर आणि दारूबाज हराम गोष्टींना उचलणारे पिच्चर बघून जाणती माणसं आपल्या सांस्कृतिक कमिटीमार्फत पिच्चर बनवायचा ठरवत्यात. पण असा की जो मुस्लिम आचारविचारांना पटेल आणि रुचेल.

ह्या चित्रपटाउन हलाल कायदेकानुन मोडणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची अस्तेय. ह्यात ‘धुमधडाका’मधी डिरेक्टर झालेल्या लक्ष्याला शरद तळवलकरांनी दिला नसल एवढा तऱ्हेतऱ्हेचा त्रास त्यांना होतो. गावातली लोकं शूटिंग आल्यावर एवढी कावत्यात की विचारता सोय नाय.

इस्लामचे नीतिनियम पाळून तिथल्याच लोकांकडून ऍक्टिंग करून घ्यायचं अफाट काम त्यांच्या डोक्यावर येऊन पडतं आणि त्याच्यात ते किती आणि कसं सक्सेस होत्यात ह्यात पिच्चरची मजाय.

माणसांच्या साध्या हालचालींत, वागण्यात, बसण्यात किती जादू अस्तेय ते डायरेक्टर झकऱ्याभाईला सहजी दिसतं. नमाज पढवताना दोन्ही कानाला हात का लावायचं असं आम्ही विचारलं होतं तव्हा मौलाना साहेब म्हणले होते की ‘इथं उभं राहिलं म्हणजे तू अल्लाहपुढं थांबून त्यांच्याशी बोलणार अस्तूय. तेव्हा सगळ्या जगाचा शिणभाग मागं सोडून आलुय, असं होईल, म्हणून!’ हलालच्या कित्येक सीनमध्ये तोच अनुभव येतो.

देवाने सांगितलेल्या मार्गावर चालत जाणारी लोकं त्याच्या शोधात किती उजळून निघतात ह्याचा अनुभव पिच्चर देतो.

पिच्चरमध्ये पार्वती जेमतेम पाच मिनिटं दिसतेय. पण अजूनपर्यंत तिच्या पूर्ण पिच्चरमध्ये असलनसल एवढी ताकद अन कसदार अभिनय ह्या ५ मिनिटांतय. अमेझॉनवर पिच्चर बघायची हीच मजा असत्या, आवडतं माणूस कितीपण वेळा बघता येतं.

सौबीन जेवढ्यांदा स्क्रीनवर येईल, तितक्यांदा घरच्यांची झोपमोड केली म्हणून तुम्ही शिव्या खाणार एवढं त्यानं हसवलंय.

गाणी थेट अल्लोपनिषद किंवा संस्कृत श्लोकांतून अल्लाहची महती सांगणारी आहे.

अलहमदुलिल्लाह गाणं तर अजय-अतुलनं केलंय असं रेंगाळत राहतं. कॅमेरा हसतखेळत मिड-शॉटवर अवलंबून राहतो. कम्युनिस्ट सरकार असलेल्या सगळ्या देशांत आणि संस्कृतीत कॅमेरा एका माणसाला कधीच उचलत नाही, तो दरवेळी समूहाचं जगणं दाखवतो हे आपोआप होत असल का?

दर मिनिटाला क्लोजप घेणाऱ्या हिंदीवाल्यांनी हे कायतरी शिकाय पाहिजे. कथांना उपकथानकांचे फाटे फुटल्यावर येणारा वैताग इथं जाणवत नाही कारण त्याच्या संदर्भात थेट न बोलता झकऱ्या खूप काय कुजबुजून जातो. त्याला सांगायचंय ते ऐकायला तुम्हीही थोडं डोकं लावायला पाहिजे एवढंच तो मागतो.

ते कळालं की तुमची त्याच्या टोनमध्ये सुबहानल्लाह गाणार ह्याची गॅरंटी…

तुम्ही ह्याच्यात कायतरी आक्षेपार्ह असल म्हणून बघू जाल, तर काही घावणार नाही. पापभिरू ग्रामीण मुसलमान शेतकऱ्याचं जगणं, तरुण पोरांची कलेकडं बघायची वाढत जाणारी दृष्टी, नवराबायकोत येणारे पण कधी बोलून न दाखवलेलं ताणतणाव ह्या सगळ्यातून झकऱ्याभाई आपल्याला अलगद शेवटाकडं आणून सोडतो.

माणसाच्या मनात देवाला कवटाळून जगण्याची असणारी अफाट इच्छा कलेच्या सोबतीनं कशी निभवावी आणि शेवटी प्रेमच सगळी बंधनं कशी तोडू शकतंय ह्याचा आदर्श चित्रपटानं घालून दिलाय.

  • भिडू वैभव वाळुंज

 

Leave A Reply

Your email address will not be published.