आंदोलनातले साधेसुधे हरेंद्र ताऊ शेतकऱ्यांसाठी सेलिब्रिटी बनले होते…

शेतकरी या देशाचा कणा आहे असं आपण म्हणतो किंबहुना ते मान्यच करावं लागतं. कृषिप्रधान देशाचा मणका म्हणजे शेतकरी, संबंध देशाला अन्न पुरवून आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो. पण कधी कधी शेतकरी त्याच्या स्वॅगमुळे सुद्धा चर्चेत येतो, आजचा किस्सा अशाच एका साध्या शेतकऱ्याच्या स्वॅगचा. व्हायरल होणं आजच्या काळात तशी विशेष गोष्ट राहिलेली नाही उठसूट कुणीही सोशल मीडियावरून घराघरात पोहचू शकतं. पण एखादा आपल्या हेतु तुन आपलं काम कशा प्रकारे व्हायरल करू शकतो ते या शेतकऱ्याकडून शिकलं पाहिजे.

केंद्र सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. विधेयक परत आल्यानंतर शेतकरीही दिल्ली सीमा सोडून आपापल्या घरी परतण्याच्या तयारीला लागले. या एक वर्षात शेतकऱ्यांनी येथे असे आंदोलन उभे केले की देशाचा इतिहास सदैव स्मरणात राहील. यादरम्यान दिल्लीतील तिन्ही सीमा मंचावरून अनेक शेतकरी नेत्यांनी आपली भाषणे केली.

सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकणाऱ्या या शेतकरी नेत्यांना त्यांच्या समर्थकांकडूनही मोठा दिलासा मिळाला. या प्रोत्साहनामुळे हरेंद्र ताऊ यांच्यासारखा सामान्य शेतकरीही लोकप्रिय चेहरा बनला. शेतकरी आंदोलनात हरेंद्र ताऊ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाले. त्यांनी अनेकदा मीडियासमोर आपले म्हणणे मांडले. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले की त्यांना एक नवी ओळख मिळाली. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांनी सरकारला ज्या पद्धतीने टोमणे मारले ते लोकांना आवडले. यामुळेच लोकांनी त्याचे व्हिडिओ लाखो वेळा पाहिले. प्रत्येक व्हिडिओला मिलियन मध्ये व्हिवज असणे म्हणजे चेष्टा नाही. लोकप्रियता असावी तर अशी.

शेतकरी चळवळीमुळेच आज हरेंद्र ताऊ यांना कुठल्या परिचयाची गरज नाही. तुम्ही सोशल मीडिया आणि गुगलवर त्यांचे नाव टाइप करा, तुम्हाला त्यांचे अनेक व्हिडिओ मिळतील. या व्हायरल व्हिडिओंमुळे हरेंद्र ताऊ यांना सेलिब्रिटीसारखी ओळख मिळाली आहे. त्याच्या भाषणांनी लोकांना अशा प्रकारे वेड लावले की लोक आंदोलनस्थळी येऊन त्याच्यासोबत सेल्फी घेऊ लागले. एका बाजूला शेतकरी आंदोलनातून हरेंद्र ताऊ आपलं म्हणनही मांडत होते आणि हवाही करत होते.

हरेंद्र ताऊ हे मेरठचे रहिवासी आहेत. हे फार मोठे जमीन मालक नसून फक्त एक बिघा जमीन असलेले साधे शेतकरी आहेत. पण त्यांच्या भाषण आणि भाषणाच्या शैलीमुळे ते आता सोशल मीडियाचे सुपरस्टार बनले आहे. लोकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. एखाद्या हिरोपेक्षाही शेतकऱ्याची अशी क्रेझ लोकांमध्ये निर्माण होणं म्हणजे विषय खोल.

आश्‍चर्याची बाब म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या हरेंद्र ताऊ यांना काही काळापूर्वी मोबाइल कसा चालवावा याचीसुद्धा काडीमात्र आयडिया नव्हते.पण मग जसं जसे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले तसे तसे मोबाईलचे फंक्शन हरेंद्र ताऊ यांना कळत गेले. पण जोवर त्यांच्या आंदोलनातून ते व्हायरल होत होते तेव्हा लोकं त्यांच्याकडे येऊन सेल्फी काढत होते पण हरेंद्र ताऊ यांना याबद्दल कल्पनाच नव्हती मग हळूहळू त्यांना त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येत गेला.

एखाद्या रांगड्या शेतकऱ्याचा असा स्वॅग क्वचितच कधीतरी पाहायला मिळतो पण जेव्हा दिसतो तेव्हा विषय खोल असतो…!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.