गुजराती व्यापारी नेहरूंना भेटल्यानेच टनाने ऊस ओढणारा हिंदूस्थानचा ट्रॅक्टर तयार होवू शकला

गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. इंग्रज येण्यापूर्वी भारताला सोने की चिडीया म्हणून ओळखलं जायचं. इथं तयार होणारी उत्पादने जगभरात निर्यात व्हायची. भारतीय कारागिरांच्या कौशल्याला जगभरात तोड नव्हती. समृद्ध भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. सुपीक समृद्ध देशाला उध्वस्त करण्यात आलं.

शेवटचं आक्रमण व्यापारी बनून आलेल्या इंग्रजांनी केले आणि भारतीय उद्योग बंद पाडले. असंख्य कारागीर देशोधडीला लागले. ब्रिटिशांची १५० वर्षांची गुलामी हे भारताच्या विनाशाचे प्रमुख कारण ठरले.

त्याकाळात देखील बहुसंख्य जनता शेतीवर अवलंबून होती. इंग्रजांनी भारताच्या शेतीला लुटीचे माध्यम म्हणूनच पाहिले होते. त्यात कोणतीही आधुनिकता यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. आधीच कोणते उद्योगधंदे नाहीत त्यात शेतीची बकाल अवस्था यामुळे आपला देश शेकडो वर्षांनी मागे पडला होता.

औद्योगिकीकरणामुळे आणि यांत्रिकीकरणामुळे जग वेगाने बदलत चाललं होतं. अगदी शेतीच्या क्षेत्रातही कमी कष्टात उत्पादन वाढीसाठी यांत्रिकीकरणाचा मोठा फायदा होत होता. भारतीय शेतकरी मात्र या सर्वापासून कित्येक मैल दूर होते. पण काही माणसं अशीही होती ज्यांना ही परिस्थिती बदलण्याची जिद्द होती.

यातच होते गुजरातचे पाशाभाई पटेल.

गुजरातच्या करमसाड गावचे. त्यांची मुंबई येथे एक इम्पोर्ट एक्स्पोर्टची फर्म होती. या निमित्ताने अनेक देश फिरून झालेलं. जगात होत असलेले बदल त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. भारतीय शेतीला आधुनिक बनवणाऱ्या यंत्राची आयात त्यांची कंपनी करायची.

विशेषतः अमेरिकेच्या Allis-Chalmers Manufacturing Company कडून ते ट्रॅक्टर व शेतीपयोगी यंत्रे मागवायचे.

या ट्रॅक्टरची विक्री, मेंटेनन्स व इतर सेवा त्यांच्याच पाशाभाई आणि कंपनी या फार्म कडून चालायच्या. अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच महत्व कळत नव्हतं पण हा गुजराती चिवट माणूस हार मानणाऱ्यातला नव्हता. गुजरातच्या खेड्यापाड्यात फिरून या यंत्रांचे महत्व पटवून देत होता.

एक चांगला सेल्समन असण्याबरोबर ते राष्ट्रभक्त देखील होते. पाशाभाई हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे दूरचे नातेवाईक होते. स्वातंत्र्यलढ्यात देखील त्यांचा सहभाग होता. गांधीवादी विचारांशी ते जोडले गेले होते. फक्त आपण आपला उद्योग एवढ्या पुरत त्यांनी स्वतःला सीमित ठेवलं नव्हतं.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश भारत सोडून गेले पण जाताना ते देशाला एक दुभंगलेला दरिद्री देश बनवून गेले होते.

भारताच्या नवनिर्मात्यांनी जिद्द केली होती,

“छोट्याशा सुई पासून ते अंतराळयाना पर्यंत प्रत्येक गोष्ट भारतात बनवायची, पुढच्या पिढ्यांना कोणापुढे हात पसरायला लागू नये.”

अनेक नवीन उद्योजकांना घडवण्यासाठी स्वतः पंतप्रधान उपपंतप्रधान पुढे आले. त्यांनी देशात कारखाने उभे राहावेत यासाठी शकत ती सगळी कडत या उद्योजकांना देऊ केली.

यातच पाशाभाईंची देखील नेहरूंशी भेट झाली. नेहरूंनी त्यांना सांगितलं परदेशातून ट्रॅक्टर मागवण्यापेक्षा तिथल्या कंपन्यांशी करार करून भारतात ट्रॅक्टर निर्माण करा. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला तर फायदा होईल शिवाय अनेकांना रोजगार देखील मिळेल.

पाशाभाईंनी त्यांना ५०० ट्रॅक्टर बनवून देतो असे आश्वासन दिले. 

हे एक आव्हानचं होतं. पण पाशाभाई यांनी ते धाडस केलं. १९५९ साली चेकोस्लोव्हाकिया इथल्या मोटोकॉव्ह प्रहा म्हणजेच आजची झेटोर या कंपनीशी त्यांचा तंत्रज्ञान सहकार्याचा करार झाला. बडोद्याजवळच्या विश्वामित्री येथे कारखाना सुरु झाला. कंपनीचे नाव देण्यात आले हिंदुस्थान ट्रॅक्टर अँड बुलडोझर लिमिटेड.

 १९६३ साली पहिले ट्रॅक्टर या कारखान्यातून बाहेर आले. पहिले भारतीय ट्रॅक्टर म्हणून या हिंदुस्थान ट्रॅक्टरला ओळखलं गेलं.

तस बघायला गेलं तर पुढच्या काळात भारत सरकारने देखील स्वतःचे एचएमटी ट्रॅक्टर बनवण्यास सुरवात केली होती मात्र हे ट्रॅक्टर छोटे होते. हिंदुस्थान ट्रॅक्टर मात्र दमदार होते. शेतातल्या प्रत्येक कामात त्याचा उपयोग केला जाऊ शकत होता.

पुढच्याच वर्षी पाशाभाईनी या कंपनीचे शेअर्स पब्लिक केले. ट्रॅक्टरची मागणी वाढली होती, मात्र त्या प्रमाणात पुरवठा करण्याची पाशा पटेलांची ताकद कमी पडत होती. 

दरम्यानच्या काळात पाशाभाई पटेल यांनी खासदारकीची निवडणूक देखील लढवली होती. यात त्यांचा काँग्रेस कडून लढणाऱ्या राजघराण्यातील फत्तेसिंह गायकवाड यांनी पराभव केला होता. पण १९६७ साली पाशाभाई पटेल स्वतंत्रता पार्टीकडून जोरदार मतांनी निवडून आले.

याच काळात देशाची आर्थिक धोरणे बदलू लागली. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे बंद करणे असे समाजवादी निर्णय घेतले होते. त्यांच्या सरकारने ट्रॅक्टरचा समावेश कृषीसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून केला. त्यांनी ट्रॅक्टरचे दर वाढवण्यास बंदी घातली. मोठे ट्रॅक्टर बनवण्यासाठी लागणार खर्च, कामगारांचे पगार याचा ताळमेळ घालणे पाशाभाईंना जमेनासे झाले.

काँग्रेसच्या विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवलया मुळे सरकारी अधिकारी त्यांना आडकाठी करत होते असा अंदाज काहीजण लावतात. अशात कारखान्यात झालेल्या मोठ्या संपामुळे पाशाभाईंचे कंबरडे मोडून गेले. अखेर केंद्र सरकारने त्यांच्या कारखान्याचे राष्ट्रीयीकरण केले. 

१९७८ साली गुजरात ट्रॅक्टर्स कॉर्पोरेशन लिमिटेडने या कारखान्याची जबाबदारी उचलली. पुढचे जवळपास वीस वर्षे गुजरात सरकार तर्फे या ट्रॅक्टर्सची निर्मिती होत राहिली. त्यांनी देखील पाशाभाईंनी सेट केलेला ट्रॅक्टरचा दर्जा सांभाळला.

हिंदुस्थान ट्रॅक्टर प्रत्येक गावात शेतातल्या बांधावर दिसू लागले. भारतीय शेतीची ओळख म्हणून हिंदुस्थान ट्रॅक्टरच नाव जगभरात पोहचलं. मध्यंतरीच्या काळात याच्या ६०% शेअर्स महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने घेतली. २००१ पासून पूर्णपणे मालकी महिंद्राकडे आली होती.

आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऐंशीच्या दशकापासून विशेषतः ऊस वाहतुकीसाठी हिंदुस्थानचा पिवळा दणकट ट्रॅक्टर खेड्यापाड्यातून धावतोय हे गेली अनेक वर्षे दिसणारे चित्र आहे.

हे ही वाच भिडू,

Leave A Reply

Your email address will not be published.