हिरामंडी.. सर्वात जुन्या आणि बदनाम वस्तीवर संजय लीला भन्साळी वेब सिरीज काढतोय

संजय लीला भन्साळीनं २०२१ मध्येच एक घोषणा केली होती. नेटफ्लिक्सवर एक वेबसिरीज घेऊन येण्याची. भन्साळीच्या पिक्चरमधले त्याचे सेट्स, गाणी, अभिनेत्यांचे कपडे हे सगळंच भव्य आणि येड लावणारं असतं. त्यात नेटफ्लिक्ससारख्या माध्यमावर भन्साळी येतोय म्हणजे राडा करणार, हा अंदाज अनेकांचा आहे.

त्यानं वेबसिरीजची घोषणा केली, नेटफ्लिक्सला मुलाखत दिली त्यानंतर मात्र हा विषय चर्चेत नव्हता. नुकतीच एक बातमी आली की, या सिरीजसाठी डिरेक्शन फी म्हणून भन्साळी तब्बल ६५ कोटी रुपये घेणार आहेत. या सिरीजमध्ये कोण असणार? यावर मनीषा कोईराला, ऐश्वर्या राय, हुमा कुरेशी, दीपिका पदुकोण अशी बरीच मत-मतांतरं आहेत. जेव्हा ट्रेलर येईल तेव्हा समजेलच…

पण ज्या विषयाला भन्साळीनं हात घातलाय, ती हिरा मंडी नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात…

“मैने अपने फरास रोड की खिडकी से उन औरतों को घटिया मर्दो कें साथ अपने कबुतर खाने में गुम हो जाते देखा हैं. तो क्यू न लिखू उनके बारे में? क्या वो अपने समाज का हिस्सा नहीं? ऊन रंडीयो के यहा मर्द नमाजें ए दुरूत तो पढनें नहीं जाते. अच्छा उन्हें वंहा जाने की खुली इजाजत है, लेकिन हमें उनके बारे में लिखने कीं नहीं?”

हसन मंटोचा लिखाणाचा अविष्कार ‘नया कानून’..

बेधडक आणि बंडखोरीने ओतप्रोत भरलेल त्याच ते वेश्यांवर आणि त्यांच्या वस्त्यांवर लिहिणं… मंटो जस त्याच्या कथेमध्ये वर्णन करतो तशीच एक वेश्यावस्ती आहे पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये.

हिरा मंडी.. सर्वात जुनी आणि बदनाम..

पाकिस्तानातल्या लाहोरच्या ऐतिहासिक बादशाही मस्जिद पासून ७०० मीटर अंतरावर असणारी हीरा मंडी म्हणजे पुरुषांसाठी आयुष्यभराची उधळपट्टी करण्याचं ठिकाण. हा भाग फाळणीपूर्वीच्या भारताला आणि आत्ताच्या पाकिस्तानातला सर्वात जुना रेड-लाईट एरिया आहे. तिथल्या रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या कोठ्यांमधून तुम्हाला बॉलिवूडची गाणी आणि तालात छमछम असा घुंगरांचा आवाज येईल.

मात्र कोठ्यांच्या आत डोकावल्यावर डोळ्यांना लुभावणारा शाही मुजरा थेट जुन्या राजेशाही दरबारांची आठवण करून देईल.

दर चोवीस तासांनी आपली ओळख बदलणारी, हीरा मंडी सकाळी धान्य बाजार असते. थंड रात्रीत मात्र ती मंडी गरम होऊ लागते. धान्य दुकानांच्या वरच्या मजल्यांच्या बोळांमध्ये प्रणयराधना सुरु होते.

आज बदनाम असणारी ही हिरा मंडी एकेकाळी लाहोर शहराचं शाही प्रतीक होत.

शाही प्रतीक असलेली हिरा मंडी एवढी बदनाम का झाली हे पाहण्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात डोकावलं पाहिजे. म्हणजे १६ व्या शतकात..

त्यावेळी मुघल साम्राज्य लाहोर शहरासह उत्तर भारतावर आपले नियंत्रण मजबूत करू पाहत होते. अकबरच्या कारकिर्दीत, १५८४ ते १५९८ पर्यंत, लाहोर मुघल साम्राज्याची राजधानी होती. १२६७ मध्ये दिल्ली सल्तनतच्या सुलतान घिया-उद-बल्बन याने लाहोरच्या पुनरुज्जीवनाचा पाया घालून शहराभोवती तटबंदी बनवली.

या काळात संपूर्ण शहरात अनेक स्मारकेही बांधली गेली. लाहोर किल्ल्याच्या दक्षिणेकडील एक भाग शाहीदरबारातील नोकरांसाठी वसवला गेला. ही वसाहत किल्ल्याजवळच असल्याने त्याला ‘शाही मोहल्ला’ किंवा ‘शाही शेजार’ असेही म्हंटले जाई.

लवकरच हा परिसर शाही दरबारात करमणूक करणाऱ्या तवायफांचे घर म्हणून ओळखला जाऊ लागला. मुघल संस्कृतीतल्या ‘तवायफ’ म्हणजे मुजरा सादर करणाऱ्या प्रतिभावान महिला कलाकार होत्या. मध्ययुगीन भारतातल्या शाही दरबारात या महिला कामुक नृत्य करीत असत. तवायफांना त्या काळातील सर्वोत्कृष्ट उस्ताद (मास्टर्स) संगीत, शिष्टाचार आणि नृत्य यांच प्रशिक्षण देत असत.

शाही मोहल्लाच्या या तवायफ स्त्रियांना कार्यक्रमात नाचवणे उच्चवर्गासाठी श्रीमंतीचे प्रतीक होते. त्या काळात दरबारात करमणूक करणाऱ्या बहुतांशी स्त्रिया सेक्स वर्कर्स म्हणून काम करीत असल्या तरी शाही मोहल्लाच्या तवायफ तशा नव्हत्या. बऱ्याच शाही परिवारातील मुलांना शिष्टाचाराचे धडे गिरवण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले जाई.

लाहोरच्या तवायफांना कपोकल्पित कथेत आणि स्थानिक लोकप्रिय कथांमध्ये ही स्थान मिळाले आहे.

अशीच एक तवायफ.

तुम्हा-आम्हा सर्वाना माहित असलेली… अनारकली.

जी मुघल दरबारातली सुंदर तवायफ होती. मुघल सम्राट अकबरचा मुलगा राजपुत्र, सलीमच (जो सम्राट जहांगीर म्हणून प्रसिद्ध आहे) अनारकलीवर प्रेम होत. ‘जब प्यार किया तो डरना क्या’ म्हणत सलीम अनारकलीने प्रेमाच्या आणाभाका ही घेतल्या होत्या म्हणे. पण म्हाताऱ्या झालेल्या अकबराला आपल्या शाही वारसाने एका कमी दर्जाच्या स्त्रीच्या प्रेमात पडणं मान्य नव्हतं. त्यामुळ अनारकलीला लाहोरच्या किल्ल्यातील एका भिंतीत डांबून मारण्यात आलं.

आज जरी अनारकलीच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसला तरी तिच्यामुळे लाहोरच्या तवायफांना सिनेमा, पुस्तक आणि इतिहासाच्या काल्पनिक आवृत्तीत स्थान मिळालं हे मात्र निश्चित.

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, इराणचा अफशरीद शासक नादर शाह आणि त्यानंतर अहमदशाह अब्दालीने लाहोर शहरावर अनेक हल्ले केले. या हल्ल्यांमुळे पंजाबमधील मुघल शासन खिळखिळ झालं होत. या अफगाण हल्ल्यांदरम्यान लाहोरमध्ये पहिलं वहिलं वेश्यागृह उभं राहील.

१७४८ आणि १७६७ दरम्यान अफगाणांनी भारतीय उपखंडात आक्रमण करून पळवून आणलेल्या अनेक स्त्रियांना वेश्या व्यवसायात ढकलले. अब्दालीच्या सैन्याने सध्याच्या धोबी मंडीमध्ये व दारा शिकोह मोहल्ल्यात दोन वेश्यावस्त्या उभ्या केल्या.

अफगाणांच्या रोजच्या हल्ल्यांमुळे लाहोर शहरात अराजक माजले होते. १७६२ मध्ये अफगाण सैन्याने श्री हरमंदिर साहिब हे शिखांचे पवित्र मंदिर उद्ध्वस्त केले. या हल्ल्यामुळे शीख समाज एकत्र आला. आणि त्यांनी अफगाण सैन्याला पंजाबमधून पळवून लावले. या दरम्यान अफगाणांनी लाहोरमध्ये उभारलेल्या वेश्यावस्त्या ही बंद पडल्या.

त्यानंतर १७९९ मध्ये, रणजितसिंह नावाच्या एका तरुण सुकरचकिया मिस्लच्या प्रमुखाने, लाहोर शहर भंगी मिस्लकडून ताब्यात घेतले. १८०१ मध्ये रणजित सिंह पंजाबचा स्वघोषित महाराज झाला. आणि त्याने सर्व पंजाब एकत्र करण्याचे वचन दिले. महाराजा रणजितसिंगाने मुघलांच्या अनेक शाही चालीरिती पुनरुज्जीवित केल्या, त्यापैकी एक होती, तवायफ संस्कृती…

रणजितसिंगाचे दरबार मुघलांच्या दरबाराइतके भव्यदिव्य नसले तरी शाही मोहल्लाच्या तवायफांना रणजितसिंगाचे संरक्षण मिळाले.

असं म्हणतात १८०२ मध्ये, स्वतः २२ वर्षीय महाराजा रणजितसिंग ‘मोरन’ नावाच्या मुस्लिम तवायफीच्या प्रेमात पडला. ती तवायफ होती काश्मीरची. पण अमृतसर जवळच्या माखनपूर नावाच्या खेड्यात ती वास्तव्याला होती. कंजार जातीतल्या मनोरंजन करणाऱ्या तवायफीशी लग्न करण्याचा निर्णय रणजितसिंगाने घेतला. मात्र तवायफीशी राजाने लग्न करणे लाहोरच्या दरबारातल्या धार्मिक गुरूंना नापसंत होते. परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या रणजितसिंगने कोणाच्याही नापसंतीची चिंता केली नाही. आणि लग्न केले.

त्याने मोरनसाठी एक वेगळी हवेली बांधली. रणजितसिंगाच्या दरबारातल्या तवायफ ज्या ठिकाणी राहत असत त्या शाही मोहल्ल्यापासून ही हवेली फार दूर नव्हती. आत्ता ती हवेली लाहोरच्या पापड मंडीच्या परिसरात आहे.

थोडक्यात रणजितसिंग- मोरन यांच्या प्रेमकथेचा शेवट सलीम-अनारकली सारखा दुःखद झाला नाही.

हिरा मंडी .. ते ‘बाजार-ए-हुस्न’

काही दशकांनंतर शीख साम्राज्याचे पंतप्रधान हिरासिंग डोगरा यांनी महाराजा रणजितसिंगच्या मृत्यूनंतर शेजारच्या शाही मोहल्ल्याच्या ठिकाणी धान्य बाजारपेठ वसवली. त्यामुळे त्या भागाला ‘हीरा सिंग दी मंडी’ किंवा ‘हीरा मंडी’ असे नाव पडले. विशेष म्हणजे काही लोकांच अस म्हणणं आहे की हिरा हा शब्द हिऱ्यासारख्या सुंदर दिसणाऱ्या तवायफिंसाठी वापरण्यात आला आणि त्यावरूनच हीरा मंडी नाव पडले.

पण हीरा मंडीची ही ओळख जास्त दिवस टिकली नाही. इंग्रज – शीख युद्धानंतर (१८४५-४९) शीख साम्राज्याचा अंत झाला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने हा प्रदेश ताब्यात घेतला. तवायफांच्या दरबारी संगीत आणि कामुक नृत्यात ब्रिटिशांना रस नव्हता. त्यांनी मुजरा संस्कृती वेश्या व्यवसायाशी जोडली. इंग्रजांच्या दंडुकशाहीमुळे रोजीरोटी गमावलेल्या बर्‍याच तवायफी इंग्रज सैनिकांसाठी आता सेक्स वर्कर बनल्या होत्या.

तेव्हापासूनच हिरा मंडी वेश्यावस्ती बनायला खरी सुरुवात झाली.

१८५० च्या दशकाच्या सुरुवातीला, या जुन्या शहरात प्लेग पसरला. स्थानिक ब्रिटीश प्रशासनाने त्यांची छावणी अनारकलीहून जुन्या शहराबाहेर धरमपुरा येथे हलविली. यावेळी सेक्स वर्कर्सनाही हलविण्याचा प्रयत्न झाला. पण त्यातल्या बऱ्याच स्त्रियांनी शाही मोहल्ल्यात राहणेच पसंत केले.

या भागात वेश्या व्यवसाय सुरु होऊनही हीरा मंडीने आपली मुजरा संस्कृती आणि प्रतिष्ठा कायम राखली. फरक एवढाच होता की तवायफांचे दर्दी आणि संरक्षक आता कोणी सम्राट नव्हते तर त्या शहरातील खास आणि श्रीमंत माणसे होती. अशाप्रकारे हीरा मंडीला अजून एक टोपण नाव मिळाले…

‘बाजार-ए-हुस्न’

तवायफिंच्या अस्मितेमध्ये बदल झाला तरी, शाही मोहल्ल्यात एक गोष्ट कायम राहिली – ती म्हणजे कला सादर करण्याची प्रथा. याचा परिणाम म्हणून, हीरा मंडीने काही उत्कृष्ट कलाकार समाजाला दिले.

ज्यात प्रसिद्ध नूरजहां, खुर्शीद बेगम, मुमताज शांती आणि इतर अनेक कलाकार आहेत. योगायोगाने, ‘आधुनिक लाहोरचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे सर गंगा राम यांचे घर ही याच भागात आहे. प्रख्यात उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी आपल्या नया कानून (नवीन राज्यघटना) या कथेत हीरा मंडीचा थोडासा संदर्भ दिला आहे.

हीरा मंडी आज स्वातंत्र्यानंतरही वेश्याव्यवसाय आणि करमणुकीचे केंद्र म्हणून सुरूच आहे. बहुतेक तवायफी, ज्या सेक्स वर्कर आहेत त्या कंजर जातीतल्या आहेत. तर बाकी सेक्स वर्कर्स या गरिबीमुळे किंवा पूर्व पाकिस्तानातून बेकायदेशीररित्या तस्करी करून आणण्यात आल्या आहेत.१९७८ ते १९८८ पर्यंत पाकिस्तानचे अध्यक्ष असलेले मुहम्मद झिया-उल-हक यांनी हीरा मंडीतील मुजरा आणि वेश्या व्यवसाय संपुष्टात आणण्यासाठी कठोर प्रयत्न केले.

पण ते यशस्वी झाले नाहीत. उलट अनेक वेश्यागृह लाहोरच्या इतर भागात गेली. इंटरनेटच्या युगात, हीरा मंडीच्या सेक्स वर्कर सोशल मीडियाकडे वळल्या आणि बर्‍याच सॉफ्टवेअर अ‍ॅप्सद्वारे त्यांनी ‘एस्कॉर्ट सेवा’ देण्यास सुरवात केली.

शीख साम्राज्याने सुरु केलेले धान्य बाजार ही आता येथून हलविण्यात आले आहे. शिवाय हीरा मंडीला वेश्याव्यवसाय सोडून इतरही काही वेगळी ओळख राहिली नाही. मुजरा आणि संगीताची संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वीचा शाही मोहल्ला, शहराचा शाही प्रतीक, आता एका गडद व्यवसायाच्या सावलीत अडकतच चाललाय.

भन्साळी या सगळ्या इतिहासाला, मंडीच्या पोटात दडलेल्या रहस्यांना कसा न्याय देतो, हे मात्र पाहावं लागणार आहे…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.