हितेंद्र ठाकूर : मुंबईच्या आसपास राहून सेनेला नडत तीन आमदार निवडून आणणं कसं जमतं..

राज्यसभेच्या निवडणूकीवरून घोडेबाजार सुरू अशा बातम्या आज दिवसभर चालू आहेत. जरी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठींबा दिला असेल किंवा भाजपला पाठींबा दिला असेल तरीही छोटेमोठे पक्ष व अपक्ष आमदार आपलं मतदान कोणत्या उमेदवाराला करायचं हे स्वतंत्रपणे ठरवू शकतात.

त्यातूनच महाविकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर दिवसभर चर्चेत आहेत. आज भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेतली. दूसरीकडे हितेंद्र ठाकूरांनीच महाविकास आघाडीवर १०० % खूष नसून म्हणून आम्ही मतदानाबाबत सावध भूमिका घेत आहे. मतदानादिवशीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु अस वक्तव्य केल्याने हितेंद्र ठाकूर व त्यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष चर्चेत आला आहे.

बहुजन विकास आघाडीने २०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर भाजपला पाठींबा देवू केला होता. मात्र भाजपची सत्ता येत नाही हे स्पष्ट होताच त्यांनी आपली भूमिका बदलून आपल्या पक्षाच्या तीन आमदारांच मत महाविकास आघाडीच्या कोट्यात टाकलं होतं. 

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे स्वत: आमदार आहेतच पण त्यांचे दोन आमदार देखील क्षितीज ठाकूर व राजेश पाटील असे दोन जण आमदार आहेत.  हितेंद्र ठाकूर हे वसई मधून तर क्षितीज ठाकूर नालासोपारा तर राजेश पाटील भोईसर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

क्षितीज ठाकूर यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्यासोबत झाला होता. दूसरीकडे  २०२०-२१ त्यांच्याशी संबंधित विवा ग्रुप कंपनीवर ईडीच्या धाडी. त्याचसोबतीने मुंबईच्या वसई, विरार, नालासोपारा, भोईसर भागात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी शिवसेनेमार्फत एकनाथ शिंदे यांच्याद्वारे ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यामुळेच हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीवर विशेषत: शिवसेनेवर नाराज असल्याचं बोललं जातय.. 

पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हितेंद्र ठाकूर यांची इतकी ताकद कशी निर्माण झाली. त्यांच्या राजकारणाचा इतिहास काय आहे…

हितेंद्रजी ठाकूर यांचा जन्म ३ ओक्टॉबर १९६१ चा. विरारच्या मध्यमवर्गीय कुटुंबात ते जन्माला आहे. शालेय शिक्षण तिथेच घेतलं आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी वसईला आहे. त्यांना राजकारणात येण्याची आवड होती. त्यानुसार त्यांचे चुलते आणि जेष्ठ बंधूनी त्यांना सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रोत्साहन दिलं.

वसईच्या वर्तक महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी पदावर ते निवडून आले. त्यांचे नेतृत्व गुण आणि संघटना चातुर्य यांच्या जोरावर ते लवकरच आदर्श आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी झाले. मनमिळाउ, दिलदार, दानशूर आणि तितकाच स्पष्टवक्तेपणा या स्वभाव गुणांमुळे त्यांच्या नेतृत्वाने प्रभाव टाकायला सुरुवात केली होती. 

वसई-विरार पट्ट्यात जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर यांची मोठी दहशत होती. भाई ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे बंधू. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना राजकारणात सहज एंट्री मिळाली. 

१९८८ सालापासून ते सक्रिय राजकारणात आले. वसई तालुका युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. 

१९९० ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली होती. तेव्हा वसई इथल्या काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या सभांना हितेंद्र ठाकूरच्या बरोबर शेकडो तरुणांचे जथ्थे असत. तोपर्यंत ठाकूर आणि दहशत ही साथ साथ चालत होती.

तेव्हाच काँग्रेसचे तत्कालीन नेते शरद पवार यांनी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट देण्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा हितेंद्र ठाकूर यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. वयाच्या २९ व्या वर्षीच आमदार होत त्यांनी तरुण आमदार होण्याचा मान आपल्या नावे केला होता. वसई-विरारमध्ये ते इतके लोकप्रिय होते की, उमेदवारी जाहीर होताच तिथे दिवाळी सदृश स्थिती झाली होती.

अशाप्रकारे सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला विकासकामांकडे. 

वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत उत्कर्ष विद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वि.वा.ठाकूर पदवी महाविद्यालय सुरू केले. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी एस.एस.सी. नंतर पुढे काय? या विषयावरील पुस्तके, मार्गदर्शन आणि तज्ज्ञांच्या व्याख्यनांचं आयोजन केलं. वसई विरारसाठी उसगावं पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. तालुक्यातील  ४ नगरपरिषदा आणि ६४ गावांसाठी १०० द.ल क्षमतेची पाणीपुरवठा योजना आखली.

परिणामी त्यांना त्यांचा मतदारसंघ कायम राखता आला. एवढेच नव्हे तर विकासकामांच्या माध्यमातून वसई-विरार पट्ट्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवरही त्यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. वसई मतदारसंघ हा जनता दलाचा बालेकिल्ला होता. मात्र, हितेंद्र ठाकूर यांचा राजकीय उदय होताच दोन ते तीन वर्षांत त्यांनी जनता दलाचा बालेकिल्ला पोखरून काढला होता.

२०१४ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत वसईमधून विजय मिळवून ठाकूर पुन्हा विधानसभा सदस्य बनले.

पुढे हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसमधून बाहरे पडले. २०१७ मध्ये त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा आपला राजकीय पक्ष स्थापन केला, जो पुढे ‘बहुजन विकासात आघाडी’त बदलला गेला. या आघाडीच्या स्थापनेनंतर त्यांनी ३ निवडणुका देखील जिंकल्या.

सगळं सुरळीत सुरु असताना २०१९ मध्ये त्यांनी एक घोषणा केली. “मी राजकारणातून बाहेर पडणार नाही, पण यापुढे एकही निवडणूक लढणार नाही”, असं त्यांनी जाहीर केलं.

सध्या बहुजन विकास आघाडीकडे वसई-विरार महानगरपालिका, वसई तालुका पंचायत समिती आणि या भागातील विविध ग्रामपंचायतींमध्ये बहुमत आहे.

आता राजकारणात आहेत आणि वादात नाही, हे समीकरण कधी शक्य झालंय का? मग हितेंद्र ठाकूर तरी याला कसे अपवाद ठरतील.

२००९ मध्ये महाराष्ट्र सरकारने ५३ गावांचा वसई-विरार महापालिकेत समावेश करण्यासाठी एक नोटीफिकेशन जारी केलं होतं. या नोटिफिकेशनला मात्र ५३ पैकी ४९ गावांनी विरोध केला होता. पर्यावरण आणि ऐतिहासिक वास्तूंचा हवाला देत या विलनिकरणाला विरोध केला होता. 

ठाकूर यांचे राजकीय विरोधक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बचाव समिती स्थापन करून सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. पंडित यांना तेव्हा अटक झाली होती आणि मारहाणही झाली होती. 

मात्र त्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांच्यावर करण्या आला होता. 

वसई आरटीओमध्ये इंडियन कंपनीची एक बाईक रजिस्ट्रेशनसाठी आली होती. ‘इंडियन शेफ क्लासिक’  असं त्या क्रुझर बाईकचं नाव होतं आणि ती अमेरिकन ब्रँडची होती. ही बाईक हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा मुलगा उतंग ठाकूरसाठी घेतल्याचं संगितलं जात होतं. या बाईकची किंमत २३ लाख रुपये होती. 

जेव्हा या बाईकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा ठाकूर यांनी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत खूप टीका करण्यात आली होती.

राजकारणात बऱ्यापैकी स्थिर झाल्यानंतर ठाकूर यांनी बांधकाम व्यवसायात प्रवेश केला होता. 

वसई-विरार पट्ट्यात त्यांनी शेकडो बांधकामं केली. यात त्यांच्या काही अनधिकृत बांधकामांमुळे ते चर्चेत आले होते, जेव्हा ही अनधिकृत बांधकामं तोडण्याचे कोर्टाने आदेशही दिले होते.

अलीकडेच २०२१-२१ मध्ये ईडीने ठाकूर यांच्याशी संबंधित विवा ग्रुपच्या कार्यालयावर छापे मारले होते.

४३०० कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण होतं. या घोटाळ्यात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी प्रवीण राऊत आणि ठाकूर कुटुंबीय यांच्यात पैशांची अफरातफर झाल्याचे पुरावे ईडीला मिळाले होते. हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या मेहुल ठाकूर आणि सल्लागार मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही ईडीने अटक केली होती. 

यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी ते स्वतः आणि आमदार क्षितीज ठाकूर विवा ग्रुपचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर आणि इतर या ग्रुपचं काम पाहत असल्याचं सांगितलं होतं.

अशाप्रकारे बहुजन विकास आघाडीचं वसई ते विरार पट्ट्यातील वर्चस्व, अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं ते वाद आणि गुन्हे असा हितेंद्र ठाकूर यांचा प्रवास आहे. 

हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीतील इतर क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या दोन आमदारांवर सध्या राज्यातील पक्ष बोली लावत आहेत.

क्षितिज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत. नाला सोपारा या मतदारसंघासाठी विधानसभा सदस्याचं पद सांभाळतात. वसईचे चार वेळा आमदार देखील ते राहिलेले आहेत. तर राजेश पाटील भोईसर मतदार संघातील आमदार आहेत. 

बहुजन विकास आघाडी व्यतिरिक्त समाजवादी पार्टी, एमआयएम, प्रहार जनशक्ती पक्ष, मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष या पक्षांच्या आमदारांकडे देखील मोर्चा वळवला गेला असून १३ अपक्ष आमदारांसाठी देखील झटापट सुरु असल्याचं दिसत आहे.

म्हणून आता हे आमदार कुणाला मत देतायेत आणि किती पळवापळव होतेय हे येत्या दिवसांत बघायला मिळणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.