हृतिकने सिनेमात येण्याआधी प्रचंड कष्ट केले आणि मग कहो ना प्यार है सुपरहिट झाला …

कहो ना प्यार है….हा सिनेमा अनेकांना आठवत असेल. त्यावेळी मार्केटमध्ये येत असलेल्या नवीन फळीपैकी एक नव्या दमाचा हिरो त्यात होता नाव होतं हृतिक रोशन. राकेश रोशन यांनी आपल्या डुग्गूला मोठ्या रिस्कवर इंडस्ट्रीत उतरवलं होतं. सिनेमा कसा चालतो आणि त्यात असे काय काय एलमेंट टाकता येईल याचं चांगलं नॉलेज राकेश रोशन यांच्याकडे होतं. गाणी वैगरे सगळं एकदम जबऱ्या विषय झालेला होता. राकेश रोशन हे एकदम उत्तम पठडीतल्या दिग्दर्शक लोकांपैकी एक होते. आणि कामावर एकदम फोकस असलेले व्यक्ती होते पण बापापेक्षा पोरगं कसं सवाई निपजलं याचा हा भन्नाट किस्सा.

तर कहो ना प्यार सिनेमा शूट झाला होता आणि सगळीकडेच या सिनेमाची चर्चा होती. टायटल सॉंग तर मार्केटमध्ये धुमाकूळ घालत होतं. या सिनेमात हृतिक रोशनसोबत झळकत होती त्या काळातली आघाडीची अभिनेत्री अमिषा पटेल. म्हणजे तशी तीही नवखीच होती पण हृतिक रोशनच्या तुलनेत जरा सरस होती. सिनेमाचं एडिटिंग सुरू झालं होतं आणि परफेक्ट सीन बसवायचं काम सुरू होतं. एडिटिंग रूममध्ये मात्र वेगळीच गोची होती.

एडिटिंग रूममध्ये एडिटर, राकेश रोशन आणि हृतिक रोशन असे तिघेजण बसलेले असायचे. एडिटरच्या जवळ बसून राकेश रोशन जे नको होते ते सिन उडवायला सांगायचे. आता यात बरेच सीन्स चांगले असायचे आणि राकेश रोशन असही मानायचे नाहीत की माझा पोरगा आहे आणि या सीनमध्ये तो भारी दिसतोय म्हणून हाच कट अजून दोन तीन फ्रेम ठेवू ते सरळ फोकस दिग्दर्शक असल्यासारखे वागायचे आणि नको ते सीन्स उडवायचे. आणि हे काटाकाटीचे प्रकरणं हृतिक रोशनला असह्य व्हायचं.

जेव्हा राकेश रोशन सिन उडवायचे तेव्हा हृतिक रोशन मनातल्या मनात कष्टी व्हायचा अरे यार हा सिन चांगला होता, उडवायला नको होता आता जगात हा सिन कुठेही दिसणार नाही, देवा काहितरी जादू कर आणि हा सिन ठेव…अशा सगळ्या वल्गना करून झाल्यावर त्याचं काहीच व्हायचं नाही.

मग दोघे बाप बेटे तिथून घरी जायला निघायचे. मग राकेश रोशन आपल्या खोलीत जायचे ,हळूच हृतिक रोशन दरवाजाला कान लावायचा ,अंदाज घ्यायचा आणि आतमध्ये सगळं सामसूम असेल तर मग तो एडिटिंग रूमची चावी घरून न्यायचा आणि परत तिथं रिक्षा करून पोहचायचा.

एडिटिंग रूममध्ये आल्यावर मग हृतिक रोशन काय करायचा जे जे त्याच्या दृष्टीने चांगले सीन्स वडिलांनी उडवले होते ते तो परत ऍड करायचा आणि एडिटरला विचारायचा की खरं बोल तुला काय वाटतं हा सिन चांगला होता की नव्हता आणि अशा प्रकारे हृतिक रोशन मध्यरात्री एडिटर बनून आपले सीन्स लावून परत घरी जायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश रोशन परत एकदा एडिटिंग बघायचे आणि त्यांना अंदाज यायचा की पोराने रात्री येऊन कांड केलेलं आहे पण ते काही बोलायचे नाही. बापापेक्षा पोरगं कसं वाढीव होतं याचं हे उदाहरण.

पुढं कहो ना प्यार है सुपरहिट झाला. गाणी भरपूर गाजली, हृतिकच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि बॉलीवूडला एक जबऱ्या डान्सर आणि अभिनेता मिळाला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.