56 वेळा नापास झाल्यानंतर 57व्या प्रयत्नात 10वी उत्तीर्ण झाले….
शिकण्याचे वय नसते असे म्हणतात, माणूस प्रत्येक क्षणी काही ना काही शिकतच असतो. माणूस हा आजन्म विद्यार्थीच असतो. आपण एखाद्या वर्गात वा विषयात नापास झाल्यावर आतून पूर्णपणे खचून जातो पण काही माणसं जिद्दी असतात आणि ते राडा करण्यासाठीचं फेमस असतात. असाच एक वाढीव पराक्रम एका 77 वर्षाच्या वृद्धाने केलाय. शिक्षणाला वय नसतं असं म्हणतात आणि एका वृद्धाने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
राजस्थानच्या सरदारगड येथील रहिवासी 77 वर्षीय हुकुमदास वैषव यांनी हे सिद्ध केलं आहे. आजवर हुकुमदास यांनी दोन सरकारी विभागात काम केले आहे तेही आपल्या तोकड्या शिक्षणाच्या बळावर..!
हुकुमदास यांच्याशी संबंधित सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांनी 57 व्या प्रयत्नात 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली. 56 वेळा अपयशी होऊनही त्यांनी हार मानली नाही. मागच्या काही दिवसात हुकुमदास यांनी राज्य ओपनमधून बारावी परीक्षेचा फॉर्म भरला. हुकुमदास यांचा प्रवास तसा प्रेरणादायी आहे.
हुकुमदास यांचा जन्म 1945 साली सरदारगड, जालोर येथे झाला. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तिखी गावातून घेतले. सर्वप्रथम त्यांनी 1962 मध्ये मोकळसर येथून 10वीची परीक्षा दिली. त्याच्या मित्रांनी तर ते कधीच पास होणार नाही अशी पैज लावली. मग काय होतं हुकुमदासांनी शपथ घेतली की काहीही झालं तरी दहावी पास होऊन दाखवणारच. पहिल्यांदा दहावी नापास झाल्यावर सरकारी नोकरी हुकूमदास यांना मिळाली.
हुकुमदास पहिल्याच प्रयत्नात 10वी पास होऊ शकले नाहीत पण वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली. भूजल कार्यालयात चौथ्या संवर्गातील नोकरीसाठी साक्षर असणे बंधनकारक होते आणि हुकुमदास हे आठवी पास होते. हुकुमदास यांनी नोकरीबरोबरच खासगी परीक्षाही देण्यास सुरुवात केली. त्यांचा विभाग बदलला आणि त्यांना कोषागारात नोकरी मिळाली. हुकुमदास देखील 2005 मध्ये वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाले आणि तोपर्यंत त्यांनी 43 वेळा 10वीची परीक्षा दिली होती.
2010 पर्यंत त्यांनी माध्यमिक परीक्षा मंडळाकडून 48 वेळा खाजगी परीक्षा दिली पण ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. 2011 मध्ये त्यांनी स्टेट ओपनमधून प्रवेश घेतला आणि 8 वर्षांनंतर 2019 मध्ये ते द्वितीय विभागातून 10वी उत्तीर्ण झाले. हुकुमदास आता 12वी उत्तीर्ण होण्याच्या तयारीत आहे आणि ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शेवटपर्यंत हार मानायची हा या हुकूमदास यांचा swag आहे.
विद्यार्थी दशेत असताना नापास झाल्यावर विद्यार्थी भविष्याची काळजी करू लागतात, प्रसंगी आत्महत्या करू लागतात हे किती दुर्दैवी आहे मात्र हुकूमदास यांच्यासारख्या जिद्दी माणसाने पराभव न मानता जोमाने परीक्षेची तयारी केलीय…
हे ही वाच भिडू :
- निवडणुकांचा निकाल काहीही असो राज ठाकरेंची मराठवाड्यातील क्रेझ कमी होत नसते
- एका माजी पाकिस्तानी सैनिकाला भारताने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय.
- जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये घराणेशाहीच्या भावी पिढ्यांचा निकाल काय लागला?
- मृत्युपूर्वी तिचे वडील म्हणाले होते, “माझं काम ऐकलं नाहीस. तुझं सुवर्ण चुकेल, तुला रौप्य मिळेल”