दर रविवारी कोल्हापूरचे आयुक्त झाडू घेवून रस्त्यांवर उतरतात…

ते आले तेव्हा त्यांच्या उपस्थितीचा गाजावाजा झाला नाही. त्यांच्या मागे पुढे नॅपकिन, पाण्याची बाटली घेवून शिपाई नव्हते. स्वच्छ भारत अभियान राबवताना त्यांनी कधी हातात खराटा घेवून पोज दिली नाही. मात्र ते दर रविवारी हातात खराटा घेवून कोल्हापूरचे रस्ते स्वच्छ करतात. आपल्या कृतीतून ते भल्याभल्यांना लाजवतात कारण कोल्हापूरातले रस्ते स्वच्छ करणारा हा माणूस कोणी साधासुधा माणूस नसतो तर ते असतात,

कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी. 

आयुक्तपदावर रुजू झाल्यापासून एकही दिवस सुट्टी न घेतलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. रविवारी सुट्टी घ्यायची सोडून ते कोल्हापूरात श्रमदान करतात. रविवारची सुट्टी तर सोडाच पण या अधिकाऱ्यांनी कधी आपल्या सेवाकाळात आजतागायत एकही वैद्यकिय रजा घेतलेली नाही.

मलिन्नाथ कलशेट्टी मुळचे सोलापूरचे आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी विद्यापीठात झालय. ते त्यांच्या कॉलेज जीवनात एनएसएस मध्ये कार्यरत होते . 

त्यांनी स्वच्छतेचा उपक्रम चालू केला तेव्हा त्यांना नवीन आलेले अधिकारी आहेत. काहीतरी चमकोगिरी म्हणून ते स्वच्छता मोहीम घेत असतील. नव्याचे नऊ दिवस झाल्यावर आपोआप थांबतील, अशा त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया येत होत्या.

पण गेले ४३ रविवार झाले स्वच्छतेची सेवा अखंड चालूच आहे. 

मल्लिनाथ कलशेट्टी यांची स्वच्छतादूत म्हणून ओळख झाली आहे.

आपले घर स्वच्छ झाले की दार स्वच्छ होते. दार स्वच्छ झाले की गल्ली स्वच्छ होते. गल्ली स्वच्छ झाली की परिसर स्वच्छ होतो. परिसर स्वच्छ झाला की प्रभाग स्वच्छ होतो आणि प्रभाग स्वच्छ झाला की सारा गाव स्वच्छ होतो, अशी त्यांची स्वच्छतेमागील साधी-सोपी भूमिका आहे.

काही दिवसांपूर्वी ते सहज रंकाळा चौपाटीवर गेले आणि सर्वत्र पडलेले खाऊचे कागद, पिशव्या, कागदी कप, पाण्याच्या बाटल्या पाहून क्षणभर थांबले आणि त्यांनी स्वतःच ते उचलण्यास सुरुवात केली. मग बाकीचेही वाकले. काही नागरिकांनीही सहभाग घेतला.

महापालिकेतही कडक शिस्तीचे अधिकारी म्हणूनच त्याची ओळख आहे. ‘कधीही यावे आणि कधीही जावे’ अशी सवय झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोठा झटका दिलाय. आयुक्तांनी सकाळी सहा वाजता अचानक महापालिका इमारत तसेच शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन तेथे वेळेवर न आलेल्या सुमारे २४५ कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई का करू नये म्हणून नोटीसही बजावली. तेव्हापासून कर्मचारी वेळेवर कामावर हजर असतात.

अलिकडेच घडलेला एक किस्सा,

एका शिबीराचे उद्घाटन आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन करत असताना, आकाश मेडिकल मॉलमध्ये नॉन ओव्हन/प्लास्टिक बॅगचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तत्काळ मेडिकल मॉलला पाच हजार रूपयांचा दंड केला. ही बाब समजताच बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असणाऱ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांच्यात खळबळ उडाली.

डॉ. कलशेट्टी यांनी ३१ मार्च पर्यन्त कोल्हापूर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील प्लास्टिकमुक्त शहर हे कोल्हापूर एकमेव असणार आहे. आराखडा सोमवारी आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई येथे सादर केला आहे. या आराखड्यामध्ये ३१ मार्चपर्यंतचा कृती आराखडा सादर करण्यात आलाय.

त्यांनी कोल्हापूरात स्वच्छतेचा उपक्रम राबवून राज्यातील अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. कोल्हापूरातील विविध ठिकाणे त्यांनी स्वच्छ केलीत. तसेच त्यांच्या या उपक्रमात शहरातील तरुण उत्साहाने सहभागी होतात. सरकारी कर्मचारी तर प्रत्येक रविवार सुट्टीचा नसून तो श्रमदानासाठी घालवतात. आज या उपक्रमास ४३ रविवार झालेत. त्यांचा या कामाचे कोल्हापूरात नाहीतर सगळीकडे कौतुक होत आहे. अन् ते व्हावे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.