श्रेयवादापासून कायम लांब असला, तरी अजिंक्य रहाणे मिडलक्लास माणसांचा टिपिकल हिरोय
ॲडलेड टेस्टमध्ये ३६ वर ऑलआऊट झाल्यावर भारतीय संघाची मापं निघाली होती, त्यात उरलेल्या सिरीजसाठी कोहलीही नव्हता. मग दुखापतींची मालिका सुरू झाली आणि आहे नाही ती सगळी टीम भारतानं चौथ्या टेस्टसाठी उतरवली. भल्याभल्यांचा अंदाज चुकवत भारतानं ही सिरीज जिंकली.
या विजयाचं बीज कुठं रोवलं गेलं असेल, तर सिरीजमधल्या दुसऱ्या टेस्टमध्ये. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या टेस्टमध्ये भारतानं, ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं. फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियन बॉलिंगला तोंड देत सेंच्युरी मारणारा कॅप्टन अजिंक्य रहाणे त्या मॅचचा खरा हिरो होता. अजिंक्य लढला, तसंचा आता बाकीच्यांनाही लढायचं होतं.
अजिंक्यचं नेतृत्व, जिगर आणि त्याला इतर प्लेअर्सनी दिलेल्या साथीमुळं फक्त एका महिन्याच्या अंतरात भारतीय क्रिकेटनं खतरनाक कमबॅक केलं होतं.
एवढा मोठा विजय मिळवूनही अजिंक्यनं कधीच याचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा खटाटोप केला नाही. तो शांतपणे कॅप्टन झाला, यंगस्टर्सला घेऊन जिंकला आणि फ्रेममधून बाहेरही पडला.
अजिंक्यमध्ये हे साधेपण अगदी लहानपणापासूनच भिनलंय. याचं कारण सापडतं, त्याच्या स्ट्रगलमध्ये. हा लेख अजिंक्यच्या स्ट्रगलबद्दल आहे, पण यात त्याचे रन्सचे आकडे नाहीत, त्याच्या बॅटिंगचं वर्णन नाही,
तर काही किस्से आहेत… जे रहाणेचं ‘अजिंक्य’ असणं अधोरेखित करतात.
अजिंक्य सात वर्षांचा होता, तेव्हा त्यांच्या घरचे त्याला पहिल्यांदा क्रिकेट क्लबमध्ये घेऊन गेले. अजिंक्यनं फार मोठा क्रिकेटर व्हावं अशी त्यांची इच्छाही नव्हती, त्यांना एवढंच वाटायचं की शाळा सुटल्यानंतर याचा वेळ वाया जायला नको.
प्रॅक्टिसच्या पहिल्याच दिवशी कोचनं त्याला एका क्रिकेटरचा फोटो दाखवला आणि विचारलं, “याला ओळखतोस का?” अजिंक्य हो म्हणला.
पुढचा प्रश्न आला, ”याच्यासोबत खेळायला आवडेल का?” अजिंक्य पुन्हा हो म्हणला.
तो फोटो होता सचिन तेंडुलकरचा.
त्या कोचनं प्रॅक्टिसला येणाऱ्या कित्येक पोरांना हा फोटो दाखवत, हा प्रश्नही विचारला असेल. सगळे जण हो म्हणले असतील.
रहाणेनं मात्र सचिन सोबत खेळून दाखवलं!
रहाणे स्वतःच्या करिअरचं श्रेय कायम त्याच्या आईवडिलांना देतो. कारण त्यांच्या कष्टामुळंच तो घडलाय.
रहाणेनं सांगितलेले दोन किस्से फेमस आहेत, ”आमच्या घरची परिस्थिती बेताची होती. घरापासून ग्राउंड ७-८ किलोमीटर लांब होतं. मी आईसोबत चालत जायचो, माझं वय १० वर्षही नव्हतं. मला माझी किटबॅग झेपायची नाही, त्यामुळं आई एका खांद्यावर किटबॅग घ्यायची आणि दुसऱ्या खांद्यावर लहान भावाला. प्रॅक्टिस झाली की मी दमायचो आणि आईला म्हणायचो ‘आपण रिक्षानं जाऊ’ पण आमच्याकडे तेवढे पैसेच नसायचे. आठवड्यातून एकदाच आम्ही रिक्षानं प्रवास करू शकायचो.”
जेव्हा अजिंक्य आणखी थोडा मोठा झाला आणि त्याला मॅचेससाठी मुंबईच्या एका टोकापासुन दुसरं टोक गाठावं लागायचं. गर्दीच्या वेळेत लोकलनं जायचं म्हणजे फास्ट बॉलरला फेस करण्यापेक्षा मोठा टास्क होता.
पहिले दोन दिवस अजिंक्यचे वडील त्याच्यासोबत आले आणि नंतर त्याला सांगितलं की, ‘आता तुझा तू प्रवास कर.’
अजिंक्यनं लोकलमधून एकट्यानं दबकत दबकत प्रवास केला, उतरल्यावर त्याला समजलं की आपले वडील आपल्या मागच्याच कम्पार्टमेन्टमध्ये आहेत. त्यांनी अजिंक्य व्यवस्थित पोहोचेपर्यंत नकळत काळजी घेतली होती.
मुंबईसाठी सगळ्या वयोगटातून खेळल्यानंतर त्याची मुंबईच्या स्टार-स्टडेड टीममध्ये निवड झाली. तिथं त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. खोऱ्यानं रन्स केले. भारतीय संघात निवड झाली तेव्हा कित्येक महिने, रहाणेनं बेंचवर बसूनच काढले.
पदार्पण झाल्यावर पुन्हा जागा गेली, पण अस्सल मुंबईकर गर्दीनं खच्चून भरलेल्या लोकलमध्ये जितका शांत उभा राहू शकतो, तसाच अजिंक्यही राहिला!
२०१४ मध्ये भारतानं लॉर्ड्सवर इंग्लंडला हरवण्याची किमया केली. तेव्हा खतरनाक सेंच्युरी मारत रहाणेचं नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर झळकलं. डर्बन टेस्टमध्ये जेव्हा बॉल कसा बाऊन्स होतोय, हे कुणालाही झेपत नव्हतं तेव्हा रहाणेनं फिफ्टी मारली. हा काय टी२० खेळणार म्हणून त्याची मापं काढली जात होती, तेव्हा त्यानं आयपीएल गाजवून दाखवली.
भारताच्या कसोटी टीमसाठी कधी पाचव्या नंबरवर बॅटिंग केली, कधी ओपनिंग केली आणि कधी चौथ्या नंबरवरही खेळला.
रहाणेच्या नावावर आज लॉर्ड्सवर शतक आहे, यंगस्टर्सला घेऊन जिंकलेली ऐतिहासिक बॉर्डर गावसकर ट्रॉफी आहे, पण आजवर एकदाही त्याला ग्राऊंडवर चिडलेलं, रागानं सेलिब्रेशन केलेलं किंवा कुणाला शिवी देतानाही पाहिलं नाही.
त्याचं नाव चर्चेत, कोटींच्या मानधनाच्या आकड्यांमध्ये फारसं नसतं. पण जेव्हा जेव्हा टीम संकटात येते, तेव्हा मात्र अजिंक्य आठवतो. तोही शांतपणे क्रीझवर येतो, आपलं हेल्मेट नीट करत गार्ड घेतो, टिपिकल क्रिकेट शॉट्स खेळतो, त्याची बॅटलिफ्ट स्लिपमधूनच येते आणि रन्स मारल्यावरही तो फक्त बॅट उंचावून हसतो.
रहाणे आपण वाढलो तशाच मिडलक्लास घरामध्ये वाढला. आपल्यासारखीच त्यानंही लहानपणी क्रिकेट बॅट हातात धरली. भारतासाठी खेळण्याच्या स्वप्नाचा पाठलाग आपणही करायला घेतला होता, पण तो अर्ध्यात सुटला. रहाणेनं तो पूर्ण करुन दाखवला. लोकलचं वेळापत्रक, चार पैसे वाचवण्यासाठी केलेली तंगडतोड त्यानंही केली… आज तो क्रिकेट जगतातला सुपरस्टार आहे, पण तरीही लोकलमध्ये दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.
मिडलक्लास घरातून आलेल्या माणसांचं मिडलक्लास पण, त्यांच्या सोबत कायम राहतं, पाय जमिनीवर ठेवायला. अर्थात या गोष्टीला अपवाद असतील, पण अजिंक्य रहाणे मात्र याचं उदाहरण आहे म्हणून तो आपला हिरो आहे.
द क्रिकेट मंथलीच्या एका लेखात एक किस्सा लिहिलाय,
साऊथ मुंबईच्या मैदानावर एक क्रिकेट मॅच सुरू होती, पहिलीच ओव्हर टाकत होता ‘अण्णा.’ अण्णाचं वय साधारण २५ च्या आसपास असेल. तो काय प्रोफेशनल क्रिकेटर नव्हता, तर जवळच्याच एका हॉटेलमध्ये वेटर होता. पण हाच अण्णा जेव्हा बॉलिंग करायला उभा राहायचा, तेव्हा भलेभले ठसायचे. त्यात नवीन बॉलवर तर अण्णा कर्दनकाळ होता.
त्यादिवशी अण्णाला फेस करत होता, एक ९ वर्षांचा पोरगा. ज्याच्या बारक्या उंचीला आणि शरीराला ते हेल्मेट अवाढव्य वाटत होतं. पण तरीही तो उभा होता. पहिलाच बॉल आला बाउन्सर आणि येऊन त्या बारक्या पोराच्या डोक्यावर आदळला. पोरगं खाली पडलं, आजूबाजूला टीममेट्स जमा झाले.
तेवढ्यात अण्णा त्याला म्हणाला, ‘तुला माझी बॉलिंग फेस करता येणार नाही, त्यापेक्षा तू ड्रेसिंग रुममध्ये जा.’ पुढची पंधरा मिनिटं तो पोरगा ग्राऊंडवर बसून रडत होता. शेवटी अंपायर म्हणाले, ‘एकतर खेळ किंवा जा.’
त्या पोरानं तोंड धुतलं, शर्टाच्या बाहीनं ते पुसलं आणि पुन्हा बॅटिंगला उभा राहिला. पुढच्या पाचही बॉलला त्यानं अण्णाला फोर मारली होती.
हा अजिंक्य रहाणेचा उदय होता आणि ही त्याच्यातली जिद्द. जी आजही कायम आहे, जमिनीवर असलेल्या पायांसकट.
हे ही वाच भिडू:
- चिडकेपणात स्टीव्ह वॉ पॉन्टिंगचा गुरू होता आणि हीच गोष्ट त्याला भारी ठरवते…
- विराट कोहलीच्या आधीही ऑस्ट्रेलियाला नडणारा एक बादशहा होऊन गेलाय…
- अनिल कुंबळेची स्लेजिंग करणारा मुरली कार्तिक क्रिकेटचा बॅड बॉय म्हणून प्रसिद्ध होता…