लोकांनी तुला काहीच जमणार नाही सांगितलं, त्यानं भारताचा कॅप्टन होऊन दाखवलं

स्टेडियम खचाखच भरलेलं, मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली. स्कोअरबोर्ड बघून लोकं अंदाज लावत होती, की बॉलिंग करणारी टीम सहज मॅच जिंकणार. कारण जिंकायला ६ बॉलमध्ये २३ रन्स हवे होते. बॅटिंग टीमला मात्र विजयाची आशा कायम होती, त्याचं कारण होतं स्ट्राईकवर असलेला बॅट्समन.

ओव्हरचा पहिलाच बॉल डॉट गेला. टार्गेट आणखी अवघड झालं. पण स्ट्राईकवरच्या बॅट्समनचा कॉन्फिडन्स जराही लूज झाला नाही आणि दुसऱ्याच बॉलला हेलिकॉप्टर शॉट मारुन सिक्स गेला. तिसऱ्या बॉलला एबीडीची आठवण यावी असा छकडा आणि पुढचा बॉल बॅट्समनच्या डोक्यावर आदळला.

एक रन काढायची पूर्ण संधी होती, पण हा बॅट्समन पळालाच नाही, कारण त्याचा त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. 

२ बॉलमध्ये ११ रन्स हवे होते आणि पुढच्या दोन्ही बॉलवर सिक्स मारत त्यानं टीमला मॅच जिंकून दिली होती. ग्राऊंडवरचं पब्लिक पागल झालं होतं. हा बॅट्समन होता कृष्णा सातपुते.

भारतातल्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला बादशाह, सचिन अशा नावानं ओळखलं जातो तो मराठमोळा कृष्णा सातपुते आगामी टेनिस बॉल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं नेतृत्व करणार आहे. ज्यानं कधी आपण भारतासाठी सोडा व्यावसायिक क्रिकेट खेळू असा विचारही केला नव्हता, तो पोरगा आता भारताचा कॅप्टन असेल. आपल्याला बघायला, ऐकायला भारी वाटत असलं, तरी कृष्णाचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.

माढा तालुक्यातल्या ढवळसमध्ये जन्मलेल्या कृष्णाचे वडील रेल्वे कर्मचारी होते, त्यांची बदली कुर्डुवाडीला झाली आणि शाळकरी वयातच त्याच्या आयुष्यात पहिला टर्निंग पॉईंट आला. गावातली मोठी पोरं मैदानात खेळायची आणि कृष्णा बाऊंड्री लाईनवर थांबून त्यांचं क्रिकेट बघायचा. मग कधी त्यांचा बाहेर आलेला बॉल आतमध्ये फेक, कधी रबरी बॉलवर क्रिकेट खेळ अशा गोष्टी करत करत कृष्णा त्या मोठ्या पोरांमध्ये क्रिकेट खेळू लागला.

त्याची खुंखार बॅटिंग बघून ही पोरंही येडी झाली.

गावच्या क्लबकडून खेळताना कृष्णाची मॅच एकदा टेनिस क्रिकेटमधली दादा टीम असणाऱ्या प्रतीक इलेव्हन टीमसोबत झाली. जशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन टीमची हवा आहे, अगदी तशीच टेनिस क्रिकेटमध्ये या प्रतीक इलेव्हनची.

त्यांच्या टीममध्ये सगळे बाप बॉलर्स भरलेले, मात्र नवख्या कृष्णानं या बाप बॉलर्सची धुलाई केली आणि प्रतीक इलेव्हनच्या टीमनं त्याला थेट ‘आमच्याकडून खेळशील का?’ अशी ऑफर दिली. त्या एका इनिंगमुळे कृष्णा टॉपच्या टीममध्ये गेला.

पण त्याही आधी त्याला एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. कृष्णाच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. त्यात वडिलांना कॅन्सरचं निदान झालं, उपचारांसाठी खर्च झाला, जीव तोडून प्रयत्न केले मात्र त्यांचं निधन झालं. या धक्क्यामुळे आजारानं अंथरुणाला खिळलेल्या आईनंही प्राण सोडले.

एका महिन्याच्या आत कृष्णाच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरवलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता, तो फेडायला कृष्णा पडेल ते काम करायचा, कधी बिगारी म्हणून, कधी एखाद्या मिस्त्रीच्या हाताखाली तर कधी रोजंदारीवर.

या सगळ्या कामात त्यानं एक गोष्ट मात्र सोडली नव्हती, ती म्हणजे क्रिकेट.

क्रिकेट खेळायला सुरुवात करुन वर्षच झालं होतं, अशात आई वडील गेले, बायको गरोदर होती आणि पैशांची भ्रांत होती. एका मुलाखतीत कृष्णानं एक किस्सा सांगितलेला, ‘गरोदरपणात बायकोला डॉक्टरकडे न्यायचं होतं. जवळ पैसे नव्हते. तेव्हा भंगार चोरुन विकलं आणि घरी पैसे आणले, ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक.’

एखादा माणूस त्या चुकीनंतर वाईट मार्गाला लागला असता, सोप्या पद्धतीनं मिळणाऱ्या पैशाच्या मागे लागला असता, पण कृष्णाचं क्रिकेटवेड त्याला स्वस्थ बसू देणारं नव्हतं.

प्रतीक इलेव्हनकडून खेळायला लागल्यावर त्यानं पिंपरी चिंचवडच्या एका कंपनीत काम करायला सुरुवात केली. क्रिकेट तेव्हाही सुरू होतंच.

एकदा बॉसनं कृष्णाला चिडून सांगितलं, ‘कृष्णा आप क्रिकेटही खेलो, आप काम नही कर सकते.’ जिद्दीला पेटलेल्या या गड्यानं ही गोष्ट मनावर घेतली आणि क्रिकेटमध्येच करिअर करायचं ठरवलं.

ओपनिंग बॅट्समन म्हणून क्रीझवर येत त्यानं किरकोळीत शतकं ठोकली, अशक्य वाटतील अशी आव्हानं चेस केली. मोठमोठ्या बॉलर्सला लांबलांब छकडे हाणले. काहीच वर्षात त्याची लोकप्रियता इतकी वाढली, की एखाद्या टेनिस क्रिकेटच्या मॅचमध्ये कृष्णा खेळतोय म्हणल्यावर स्टेडियम हाऊसफुल होतं. लोकं त्याला भेटायला, त्याची बॅटिंग बघायला गर्दी करतात.

२०१९ मध्ये गोव्यातल्या एका मोठ्या टूर्नामेंटमध्ये प्रतीक इलेव्हननं फायनल गाठली, समोर होती रायगडची टीम. आता प्रतीक इलेव्हन विरुद्ध रायगड म्हणजे काटे की टक्कर, भारत पाकिस्तानच्या मॅचला गर्दी होते, तशी गर्दी टेनिस क्रिकेटचे शौकीन या मॅचला करतात. प्रतीक इलेव्हनला ८ ओव्हर्समध्ये ८८ रन्स करायचे होते, मात्र त्यांचा स्कोअर झाला होता १७ वर ५ आऊट.

कृष्णा टीमचा शेवटचा आधार होता, त्यानं सनाट बॅटिंग करत ६० रन्स चोपले आणि १ ओव्हर राखून टीमला मॅच जिंकून दिली. आपल्या आवडत्या इनिंगपैकी ही इनिंग असल्याचं कृष्णा आजही सांगतो.

कृष्णाला सोशल मीडियावर भरपूर फॉलोवर्स आहेत, मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत, त्यानं बक्षिस म्हणून गाड्या, पैसे अशी चांगली कमाईही केली. पण त्याचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे त्यानं लोकांचा टेनिस क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

बोल भिडूशी बोलताना कृष्णा सांगतो, ‘सुरुवातीला लोकं टेनिस क्रिकेटकडे टाइमपास म्हणून बघायची, आता हे प्रमाण अत्यंत कमी झालंय. खेळाडू असतील किंवा प्रेक्षक टेनिस क्रिकेटला सिरीयसली घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं की लवकरच टेनिस क्रिकेटला एखादा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल आणि खेळाच्या अर्थव्यवस्थेपासून सगळ्याच गोष्टी बदलतील. त्यामुळं प्रयत्न सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे.’

कृष्णाच्या लोकप्रियतेचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा हेलिकॉप्टर शॉट. धोनीची आठवण यावी असा हेलिकॉप्टर शॉट कृष्णा हाणतो. कृष्णा सांगतो, ‘भारताचे माजी खेळाडू हरभजन सिंग यांना जेव्हा माझ्या बॅटिंगचे व्हिडीओ दाखवले होते, तेव्हा त्यांनीही हेलिकॉप्टर शॉटचं कौतुक केलं होतं.’

आजवर त्यानं इंग्लंडला झालेली क्रिओ कपमध्ये, दुबईमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. पण आता सहा संघाचा समावेश असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारतीय संघाचा कॅप्टन असेल.

कधीकाळी बिगारी काम करणारा, उद्याचा दिवस कसा ढकलायचा याचा विचार करणारा आणि क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा मुलगा, भारताचा कॅप्टन म्हणून मैदानात उतरेल. 

कुर्डुवाडीतल्या या पोरानं फक्त महाराष्ट्रातल्याच नाही, तर देशातल्या कित्येक पोरांना एका गोष्टीची जाणीव करुन दिलीये, ती म्हणजे कितीही संकटं आली, तरी स्वप्न पूर्ण करता येतात, फक्त जिद्द सोडता कामा नये, कृष्णा सातपुतेसारखीच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.