हिटलरच्या सैन्याकडून भारतीयांची एक तुकडी देखील मैदान गाजवत होती..

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीव मुठीत धरून महाराष्ट्रात परत येणाऱ्या चक्रधर आणि डॉक्टर शिंदेंची गोष्ट रणांगण कादंबरीत विश्राम बेडेकरांनी सांगितलीय. पण सगळेच भारतीय इतके भाग्यशाली नव्हते.

त्यामुळं घेणेदेणे नसलेल्या श्रीमंत देशांच्या युद्धात कित्येक गरीब मुलखातल्या लोकांना नाहक जीव गमवावा लागला होता.

ही कथा आहे अशाच भारतीय सैनिकांची ज्यांना दुसऱ्या देशाचं युद्ध स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढावं लागलं होतं. हे सैन्य काही हिटलरच्या प्रचाराला भुलून त्याच्या सैन्यात भरती झालं नव्हतं.

इतिहासाच्या तावडीत सापडलेली ही तुकडी म्हणजे युरोपात प्रचंड वेगानं घडणाऱ्या घटनांचा परिपाक होता.

इंग्लिश फौजेत कित्येक भारतीय सैनिक काम करत होते. काही गावांमध्ये तर जबरदस्तीच्या सैन्य भरतीने पोरं भरून युरोपात पाठवण्यात आली होती. गावची वेस न ओलांडलेले पैलवान फ्रान्सच्या जमिनीवर इंग्लंडसाठी जर्मनीच्या विरोधात लढत होते.

हळूहळू युध्दाचं लोण आफ्रिका खंडातही पसरलं. आजवर कधीही गुलामीत न जगलेल्या इथिओपिया राज्यातही इटलीने वेढा दिला. बावचळलेल्या ब्रिटिश सरकारने नाझी व फॅसिस्ट सैन्याची झेप लक्षात न घेता उत्तर आफ्रिकेच्या वसाहती वाचवण्यासाठी भारतातून मोठमोठ्या तुकड्या आफ्रिकेत उतरवल्या.

जर्मनीच्या तुकड्यांना तेव्हा ब्लिट्झक्रिग म्हणून संबोधले जाई- कारण ह्या तुकड्या वादळाच्या वेगाने झंझावातासारख्या येऊन शत्रूच्या जमिनीला पूर्णपणे उध्वस्त करून टाकत असत. आफ्रिकेतही हेच घडलं.

घाईघाईने सैन्य मागे घेतानाही जर्मनीच्या ताब्यात 30 हजार भारतीय सैन्य सापडले. त्यांना युद्धबंदी म्हणून ताब्यात घेतले गेले. त्यांच्याकडून जर्मन तुरुंगातून सक्तीचे काम करून घेतले जात असे.

भारतातील वातावरण तेव्हा इंग्रजांना अनुकूल होते. धर्माच्या नावाखाली युरोपात चाललेला नरसंहार बघून भारतीयांनी या युद्धात इंग्रजांची अतोनात मदत केली होती. युद्धाचा जवळपास सर्वच खर्च गरीब देशांमधून केला गेला.

ह्या गोष्टीशी संपूर्ण असहमती दाखवत एक माणूस युरोपात गेला आणि त्याने इंग्लंडच्या शत्रूंना जवळीक दाखवत भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले,

ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.

त्यांनी आझाद हिंद रेडिओची स्थापना केली आणि त्यावरून ब्रिटिशांच्या सैन्यात लढणाऱ्या भारतीयांना त्यांच्याविरुद्ध लढायचे आव्हान केलं. याकामी त्यांनी मुसोलिनी आणि हिटलरची मदत घेतली. रेडिओवर आधी हिंदी उर्दू गाणी लावली जायची.

त्यामुळं भारतीय सैनिक हा रेडिओ चॅनेल लावायचे. त्यानंतर मध्येच त्यांना इंग्लंडविरुद्ध लढण्याचं आवाहन केलं जायचं. (हीच आयडिया पुढं व्हिएतनामच्या सरकारने काळ्या अमेरिकन सैनिकांना गोऱ्या अमेरिकन सैन्याविरुद्ध भडकवण्यासाठी वापरली.)

पण ब्रिटिशांकडे तब्बल 25 लक्ष भारतीयांची फौज होती.

ही कोणत्याही एका देशाची युद्धात उतरलेली सर्वात मोठी फौज होती त्यामुळं जनमानसात भारताची ऑफिशियल फौज म्हणून ब्रिटिश सरकारच्या इंडियन आर्मीकडे पाहिलं जात असे. सुभाषबाबुंचे बरेचसे प्रयत्न त्यामुळे विफल ठरले.

जर्मन फौजांनी भारतात उतरून लढावे असा सल्ला हिटलरला सुभाषचंद्र बोस यांनी दिला मात्र जर्मनी आणि भारतातील अंतर लक्षात घेऊन हिटलरने ह्याला मंजुरी दिली नाही. उलट सुभाषबाबूनी पूर्व आशियात मोर्चा सांभाळावा अशी सूचना दिली.

“मी माझं सगळं आयुष्य राजकारणात घालवलं आहे, त्यामुळं दुसऱ्या कुणीही मला सूचना देण्याची गरज नाही”

असं तडकाफडकी उत्तर देऊन सुभाषचंद्र बोस परत आले. त्यांना स्वतः भारताच्या लढाईत शशस्त्र सैन्यानिशी उतरायचे होते, पण सैन्य कुठून आणणार?

आणि दुसऱ्या बाजूला युद्धकैदी बनलेल्या भारतीयांना ब्रिटिश सैन्यमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले जात होते. जर्मन सैनिक त्यांना बंधुभावाने वागवत आणि त्यांना जर्मन सैनिकाएवढाच पगार मिळे. त्यांनाच घेऊन सैन्य बनवावे असा विचार सुभाषबाबूंच्या मनात आला. पण त्यांच्या शस्त्रांचा आणि रसदीचा खर्च कसा करणार?

म्हणून ह्या सैनिकांना थेट जर्मन सैन्यात सामील केले गेले व हिटलरची एक तुकडी म्हणून त्यांना वागवले गेले. त्यांना इंडिश लिजन हे नाव दिले गेले व नाझी सैन्यात सामील करण्यात आले. त्यांना जर्मन राईश आणि हिटलरच्या नेतृत्वाची शपथ घ्यावी लागे.

देवाला स्मरून मी ही शपथ घेतो की मी जर्मन साम्राज्य व सैन्याचे एकमेब नेते एडॉल्फ हिटलर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढेन.

ह्या लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तुकडीत एक प्रामाणिक सैनिक म्हणून मरेपर्यंत लढण्याची मी शपथ घेत आहे.

स्वतः हिटलरने ह्या तुकडीला भेटून त्यांच्याशी संवाद साधला होता. ह्या तुकडीतील सैन्याला पूर्णपणे ब्रिटिश पद्धतीच्या व्यवहाराची सवय होती. त्यांच्या पलटणी जातीनिहाय असत, त्यांना दुसऱ्या रेजिमेंटसोबत लढायची सवय नसे व त्यांच्यात घोषणाही वेगवेगळ्या होत्या. तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना पहिल्यांदा “जय हिंद” ही एकमात्र सारखी घोषणा दिली.

जे सैन्य भारतात कधी लढेल ह्याचा काहीच अंदाज लोकांना नव्हता. हिटलर ए सैन्य ग्रीसच्या सीमेवर उतरवू पाहत होता त्याला सुभाषचंद्र बोस यांनी कडाडून विरोध केला.

१९३० पासून भारताचे सव्वीस जानेवारी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात असे. १९४३ सालच्या ह्या दिवसाच्या उत्सवानंतर सुभाषबाबू यांनी आपल्या सैन्याला उद्देशून शेवटचे भाषण केले. टोकियोमध्ये त्यांना नव्या दमाच्या सैन्याशी भेटून पुढच्या लढाईसाठी तयार व्हायचे होते.

सुभाषचंद्र बोस जर्मनी सोडणार आहेत ह्याची कल्पना कुणालाही नव्हती. आणि एकदिवस ते टोकियोत गेल्याची बातमी ह्या सैनिकांना समजली. ह्या बातमीने त्यांचा धीरच खचला. आता आपल्या देशाचे सैनिक म्हणून नव्हे तर पुन्हा युद्धकैदी म्हणून त्यांना वागवले जाऊ लागले.

रेड क्रॉस या युद्धकाळात मदत करणाऱ्या ब्रिटिश संघटनेकडून त्यांना सिगारेट आणि महाभारत ग्रंथाच्या प्रति वाटल्या जात.

भारतात पाठवण्याच्या आशा धुळीस मिळाल्यावर त्यांना जर्मन सेनापती फिल्ड मार्शल रोमेलच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडील सरहद्दीवर जर्मन सैन्यासोबत लढण्यासाठी पाठवण्यात आले. ह्या सैन्याने वॉफन एसएस ह्या इतिहासात कुप्रसिद्ध झालेल्या नाझी टोळीतही काम केले.

काही दिवसात युद्धच बदलून गेले आणि जर्मन सैन्याला माघार घ्यावी लागली. फ्रान्समध्ये असणाऱ्या सर्व तुकड्या ताबडतोब जर्मनीत परत बोलवण्यात आल्या. इंडिश लिजनलाही आता दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढून जर्मनीचे संरक्षण करायचे होते. जर्मन सैन्याने केलेली युरोपची वाताहत, अत्याचार, बलात्कार या सर्वांचा ठपका ह्या तुकडीवरही ठेवण्यात आला त्यामुळे कुणीही सैनिक तुकडी सोडून गेला तरी त्याला जीवन जगणे अवघड होऊन बसले होते, म्हणून दुसऱ्यासाठी लढत राहण्यावाचून ह्या सैन्याला पर्याय नव्हता.

तुकडी सोडून पळलेल्या 25 जर्मनभारतीय सैनिकांना फ्रेंच सैन्याने गाठले आणि सगळ्यांना कंठस्नान घालून उरलेल्या टोळीचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. काही सैनिकांना इटलीतही पाठवण्यात आले. तिथेही त्यांचा सामना दोस्त राष्ट्रांशी झाला.

शेवटी अमेरिका ह्या युद्धात उतरली आणि यूरोपभर दिशाहीन धावत सुटलेल्या ह्या इंडिश लिजनला मायदेशी भारतात पाठवण्यात आले. लाल किल्ल्यात विशेष कोर्टाने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला, मात्र देशाचे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात असल्याने सर्वांनाच सोडून दिले गेले.

ह्या सर्व सैनिकांना जर्मन तुरुंगात खितपत पडण्यापासून वाचवण्यात सुभाषचंद्र बोस यशस्वी झाले व या सैन्याने स्वतंत्र भारतात तिरंगा फडकवताना पाहिला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.