इस्त्रायल आपल्याकडे येणारी रॉकेट हवेतच उडवून लावतय, कस तर असं…

मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये अल् अक्सा मशिदवरून वादाला तोंड फुटलय. इस्रायली आणि पॅलेस्टीनींच्या पाचवीला पुजलेला हा वाद दोन्ही देशांमध्ये एयर स्ट्राइक करण्यापर्यंत येऊन पोहोचला.

यात इस्त्रायलने केलेल्या एयरस्ट्राइकमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला. पलटवार म्हणून पॅलेस्टाइनने १५० पेक्षा अधिक रॉकेट इस्त्रायलवर डागले. पण हे रॉकेट हवेतच फुटले. जस हवेत फटाके फुटावेत अगदी तसे. याची एक झलक आपल्याला इस्त्रायलच्या IDF च्या ट्विटरवर अकाउंटवर दिसेल.

११ मे च्या रात्री IDF ने हा व्हिडिओ पोस्ट केलाय.

यात इस्त्रायलच्या क्षेत्रात रॉकेट येताना दिसत आहेत मात्र नंतर ते हवेतच नष्ट होताना दिसतय. एका खास यंत्रणेचा वापर करून इस्त्रायलने ही रॉकेट हवेतच नष्ट केली. ती यंत्रणा अर्थातच सेंटर पीस म्हणजे आयर्न डोम.

हा आयर्न डोम बनवण्यामागे एक भारी इतिहास आहे.

तर गोष्ट आहे २००१ सालची. इस्त्रायलच्या दक्षिण सीमेवर सेडरोट नावाचं शहर आहे. गाझा पट्टीजवळ असणाऱ्या या शहराची लोकसंख्या त्यावेळी २७ हजारांच्या घरात होती.

१६ एप्रिल २००१ च्या रात्री या शहरावर एक रॉकेट कोसळलं. या रॉकेटच नाव होत ‘कसाम’. हे एक होममेड टाईपच रॉकेट होत ज्याचा वापर कमी अंतरासाठी केला जातो. या रॉकेटमध्ये प्लम्बिंगच्या पाइपचा वापर करून दारुगोळा, विस्फोटक असे छर्रे भरले जात. जेणेकरून रॉकेट फुटणार तर निदान छर्रे उडून चारीबाजूला पडतील आणि आजूबाजूच्या परिसरात लोक जखमी होतील.

तर त्या रात्री हे कसाम रॉकेट गाझापट्टीतून सोडलं होत. आणि हा कार्यक्रम केला होता हमास नावाच्या पॅलेस्टाईन दहशतवादी संघटनेने. हे रॉकेट सोडलं हीच ठिणगी पडायची पहिली सुरवात होती. याआधी हमास सुसाईड बॉम्बर थ्रू इस्त्रायलवर अटॅक करायचं.

पण हमासने डोकं लढवून या कसामचा शोध लावला. आणि आपल्या घरात बसून (म्हणजे त्यावेळी गाझा पट्टीत हमासच वर्चस्व होत.) इस्त्रायली शहर टार्गेट करायला सुरवात केली.

सुरवातीच्या टप्प्यात म्हणजे साधारण २००१ ते २००५ च्या दरम्यान हमासने केवळ सीमेजवळील गाव टार्गेट केली. २००६ मध्ये हमासला अद्ययावत तंत्रज्ञान गवसले. त्यांनी लांब पल्ल्याची रॉकेट डागण्यास सुरुवात केली. यात त्यांनी पहिला मारा पश्चिमी तटावरच्या एस्क्लोन शहरावर केला.

२००१ नंतर ११ वर्षांनी म्हणजेच २०१२ पर्यंत हमासने इस्त्रायलची राजधानी तेल अवीव आणि जेरुसलेम पर्यंत रॉकेट डागण्याची क्षमता प्राप्त केली.

आता तुम्ही म्हणाल हमास रॉकेट सोडतंय म्हणून इस्त्रायल शांत बसत होत का?

तर अजिबात नाही. दोन्ही बाजुंनी घमासान चालूच असायचं. असं म्हणतात कि दिवसाला निदान डझनभर रॉकेट तरी सोडलेच जायचे. उदाहरणा दाखल बघायचं झालंच तर २००१ पासून ते २००७ च्या दरम्यान हमासने सेडरोट या शहरावर २०० पेक्षा अधिक रॉकेट डागली होती. म्हणजे तुम्ही समजू शकता हमासने काय लेव्हलवर प्रगती केली होती. हे रॉकेट डागायला इराण, इराक सारख्या देशांकडून हमासला आर्थिक मदत मिळायची.

या सर्व रेट्यात इस्त्रायलने आपली २००६ पासून आपला एयर डिफेन्स वाढवायला सुरु केले. बर इथं असं पण नव्हतं कि, इस्त्रायलला फक्त हमासचाच धोका होता. तर लेबनॉन बरोबर झालेल्या युद्धामुळे हिजबुल या दहशतवादी संघटनेचाही धोका वाढू लागला. या युद्धात हिजबुलने ४००० रॉकेट्स सोडले होते. आणि यात इस्त्रायलचे ४४ नागरिक मारले गेले होते.

हा सगळा रॉकेट्स अटॅकचा मामला सिरीयस होता. इस्त्रायली नागरिकांचा सरकार आणि लष्करावरचा दबाव वाढत चालला होता. याच्यावर तोडगा काढण्यासाठी इस्त्रायलला ठोस रणनीतीची गरज होती.

यातूनच २००७ मध्ये इस्त्रायलींनी एक अवकाश सुरक्षा कवच विकसित करायला सुरुवात केली होती. याच नाव होत मिसाईल डिफेन्स सिस्टीम.

नाम में है दम

इस्त्रायलच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या नावातच सगळं काही होत. या मिसाईलच काम होत डिफेन्सिव्ह मूव्ह घेत शत्रूंच्या आलेल्या रॉकेट्सना हवेतच उडवून लावणं. बोलायला ऐकायला सोप्प वाटतंय. खर इस्त्रायलला या सिस्टीमसाठी खूप पापड बेलावे लागले.

याचाच एक किस्सा, 

१९९१ मध्ये पहिलं आखाती युद्ध भडकलं. युद्धाच्या काळात क्षेपणास्त्र, दारुगोळा निर्यात करणारा देश म्हणून अमेरिका एक नंबरला होती. या युद्धात अमेरिकेने आपली अशीच एक सिस्टीम इस्त्रायलच्या सीमेवर तैनात केली.(थोडक्यात विकली होती.)

त्या सिस्टीमच नाव होत पेट्रीयॉट मिसाईल डिफेन्स सिस्टीम. हे तैनात करण्याचं कारण इराकी मिसाईल्स पासून इस्त्रायलचे संरक्षण करणे. या युद्धात इराक कडे २ प्रकारची मिसाईल्स होती. यातलं एक होत ‘स्कग’ जे सोविएत संघाने कोल्ड वॉरच्या दरम्यान विकसित केलं होत. आणि दुसरं होत अल-हुसेन हे स्कगच अपग्रेडेड व्हर्जन होत.

या युद्धातली माहिती देण्यासाठी व्हाईट हाऊसने एका निवेदनाद्वारे आकडेवारी प्रसिद्ध केली. यात असं म्हंटल होत कि, अमेरिकेच्या पेट्रीयॉट मिसाईल डिफेन्स सिस्टीमने इराकच्या ९४ मिसाईल्सला नेस्तनाबूत केलं. आता तुम्ही म्हणाल काय भारी सिस्टीम होती.

पण इथं तर विषयच गंडला होता. अमेरिका धडधडीत खोटं बोलत होती. या युद्धात त्यांची सिस्टीम एकदम पोकळ ठरली होती.

खुद ही की रक्षा..

हे सगळे पोकळ प्रकार बघून इस्त्रायलने आपली डिफेन्स सिस्टीम स्वतःच विकसित करण्याचा निर्णय घेतला. पण सर्वात मोठी अडचण होती पैशांची. हि सिस्टीम विकसित करण्यासाठी प्रचंड पैश्याची आवश्यकता होती. म्हणजे शत्रूच एक मिसाईल उडवून लावण्यासाठी ३० ते ६५ लाखांपर्यंत खर्च करावा लागणार होता. आणि एवढं करून तेल ही गेले तूप ही गेले हाती धुपाटणे राहिले अशी गत झाल्यावर करायचं काय असा प्रश्न इस्त्रायलसमोर होता.

त्यावेळी दादा असणाऱ्या अमेरिकेने इस्त्रायलला सुचविले की, एखादा स्वस्त पर्याय शोधा. पण इस्त्रायल ऐकले नाही. त्यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले. त्यांच्या या कामात मुख्य भूमिका बजावली राफेल ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीम या कंपनीने.

या प्रोजेक्टसाठी इस्त्रायलला जवळजवळ ७ हजार कोटींची गरज होती. त्यावेळी अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामांनी इस्त्रायलला मदत करायचे ठरवले. २०१० साली ओबामांनी इस्त्रायलला अमेरिकन काँग्रेसतर्फे १५०० हजार कोटी मान्य करवून दिले. हा फंड म्हणजे एक प्रकारची सबसिडीच होती.

ओबामांच्या मते इस्त्रायल एका सिक्युर फेज मध्ये येणे गरजेचं होत. त्यांची डिफेन्स सिस्टीम चांगली असणं आवश्यक होत जेणेकरून हमास किंवा हिजबुल सारख्या दहशतवादी संघटना वारंवार हल्ले करणार नाहीत. ओबामांना असे ही वाटले की, यामुळे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन शांत राहील.

फायनल रिजल्ट

एप्रिल २०११ मध्ये हमासने गाझा पट्टीवरून रॉकेट सोडले. इस्त्रायलने तात्काळ हे रॉकेट हवेत नष्ट करून टाकले. आणि ज्यामुळे हे सर्व शक्य झालं ती सिस्टीम होती ‘आयर्न डोम’ इस्त्रायलचा मास्टर आणि सेंटर पीस..

आयर्न डोममध्ये तीन मुख्य सिस्टीम आहेत. ज्या तैनात करण्यात आलेल्या धोक्यांपासून वाचण्यासाठी जागेवर कवच निर्माण करतात. यामध्ये व्हेपन कंन्ट्रोल सिस्टिम (बीएमसी) आणि मिसाईल फायरिंग युनिट, ट्रॅकिंग रडार आहे. बीएमसी मुळात रडार आणि इंटरसेप्टर रॉकेट दरम्यान संपर्क साधतो. सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये या यंत्रणेचा वापर करता येतो.

ही एक शॉर्ट रेंज, ग्राउंड-टू-एयर, एअर डिफेन्स सिस्टम होती. ज्यात एक रडार आणि तामिर इंटरसेप्टर मिसाईल्सचा समावेश आहे. याचा वापर रॉकेट, तोफ (सी-रॅम) तसेच विमान, हेलिकॉप्टरचा प्रतिकार करण्यासाठी केला जातो.

राफेलच्या मते आयर्न डोम हे ९० टक्के तर इतर तज्ञांच्या मते हे ८० टक्के यशस्वी झालं आहे. पण आपल्या सारख्या सामान्य नागरिकांच्या मते, हवेत फटाके फुटले ना मग १०० टक्के कार्यक्रम झाला. थोडक्यात काय तर हा कार्यक्रम खाली फोटो आहे ना तसाय…

Screenshot 2021 05 14 at 2.14.52 PM

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.