त्यादिवशी दिलीप कुमारांच्या स्टारडमला टाटांचा स्वॅग भारी पडला होता…

आता कल्पना करा की, आपण एका विमानात बसलोय… फक्त कल्पना करा लगेच विमान तुझा भाऊ चालवणार अशी कॉमेडी करू नका. तर विमानात बसलोय आणि तुमचा आवडता हिरो तुमच्या शेजारच्या सीटवर बसला आहे, तर तुमची रिॲक्शन काय असेल ?

एकतर आपल्याला हिरो लोकं म्हणजे दुसरे देवच वाटत असतात, कारण आपल्याला ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात करता येत नाही त्या गोष्टी हे हिरो लोकं एकदम सहज करून जातात म्हणून आपल्याला ते भयंकर आवडतात. आपला आवडता हिरो आणि थेट शेजारी म्हणल्यावर आपण राडा करणार हे तर फिक्सय.

चला आता किस्सा काय आहे तिकडं वळू….

तर तो काळ होता भारताच्या लिजेंड हीरोचा म्हणजे दिलीप कुमार यांचा. दिलीप कुमार तेव्हा इतके फेमस झालेले होते की लोकं त्यांच्यासाठी अक्षरशः वेडे झाले होते. हा तो काळ होता जेव्हा सेल्फी वैगरे अशा भानगडी नव्हत्या.

ह्या अँगलने एक सेल्फी घेतो, त्या अँगलने एक घेतो जो बेस्ट वाटेल तो इंस्टाग्रामला सोडतो आणि हवा करतो असा प्रकार तेव्हा नव्हता. 

लोकं दिलीप कुमार यांच्या सहीसाठी हाणामाऱ्या करायचे, दिलीप कुमार यांचा हात हातात धरण्यासाठी लोकं जीव मुठीत घेऊन गर्दीत घुसायचे असे सगळे वाढीव फॅन्स त्याकाळी होते. (आता तर इंस्टाग्रामवर सगळेच हिरो आहेत त्यामुळं टीव्हीवर दिसणारे जवळून गेले तरी कोणाला काही फरक पडत नाही.)

तर दिलीप कुमार विमानातून प्रवास करत होते, प्रवास करणाऱ्या लोकांना कळलं की आपल्या फ्लाईट मध्ये चक्क दिलीप कुमार आहेत, तेव्हा लोकांच्या तिथं उड्या पडल्या. लोकांनी दिलीप कुमारांभोवती गर्दी केली पण एक माणूस आपल्या जागी शांत बसून होता म्हणजे… जसं काय त्याला दिलीप कुमार आलाय याचं काही विशेष वाटत नव्हतं.

दिलीप कुमारांचं लक्ष सारखं त्या माणसाकडे जात होतं की,

तेरे में किस बात का attitude है भाई..!

दिलीप कुमारांना हा प्रकार खटकला की, मी इतका मोठा सुपरस्टार आहे, लोकं माझ्यासाठी वेडे झालेले आहेत आणि हा कोण आहे ज्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. एका बाजूला दिलीप कुमार यांच्या भोवती गराडा होता तर तो माणूस एकटा असूनही स्वॅगमध्ये होता.

स्टारडम विरुद्ध स्वॅग ही जुगलबंदी कधीही बेस्ट असते.

दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘The substance and the shadow’ मध्ये हा किस्सा लिहीलाय.

त्या काळात आपल्या करीअरच्या पीक पॉइंटवर दिलीप कुमार होते. सगळा भारत त्यांना ओळखत होता पण विमानात एक साधा शर्ट पँट घातलेला आणि मध्यमवर्गीय कुटुंबातला वाटणारा एक किंचित वयस्कर व्यक्ती शांत बसलेला होता. चाहत्यांचा गराडा कमी झाला आणि त्या व्यक्तीच्या बाजूला जाऊन दिलीप कुमार बसले.

ती व्यक्ती पेपर वाचत होती. जेव्हा चहाचा ब्रेक झाला तेव्हा त्या व्यक्तीने पटकन चहा संपवला. दिलीप कुमारांनी त्यांच्याकडे बघून स्माईल केलं.

दिलीप कुमारांनी त्या व्यक्तीला विचारलं तुम्ही सिनेमे बघता का ?

तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ‘हो. पण कधी कधी’

दिलीप कुमार म्हणाले, ‘मी सिनेमात काम करतो, हिरो आहे.’

त्या व्यक्तीनं दिलीप कुमार यांचं कौतुक केलं. पुन्हा नॉर्मल गप्पा झाल्या. पण दिलीप कुमारांना राहवलं नाही, प्रवास संपत आला आणि मोठ्या स्टारडम स्टाईलनं त्या व्यक्तीला दिलीप कुमार म्हणाले, “मी दिलीप कुमार.” आणि त्या व्यक्तीने अत्यंत शांतपणे सांगितलं…

मी जे. आर. डी. टाटा…

हे ऐकून दिलीप कुमार यांचा सगळं स्टारडम टाटांच्या स्वॅगपुढे गळून पडला.

दिलीप कुमार आपल्या आत्मचरित्रात म्हणतात की, ‘त्या व्यक्तीने आपली ओळख जेव्हा सांगितली तेव्हा मी सुन्न झालो आणि माझा स्टारडम झिरो आहे याची मला जाणीव झाली.’

विनम्रता किती मोठी गोष्ट आहे हे मला त्या दिवशी कळलं. भारतात औद्योगिक क्रांती आणणारे टाटा इतकं साधं राहतात यावर माझा विश्वास बसत नव्हता. तेव्हापासून एक कळलं की आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षाही मोठी माणसं वावरत असतात तेही शून्य स्टारडम ठेवून.

टाटांच्या विनम्रतेतसुद्धा एक स्वॅग होता आणि त्यापुढे माझा स्टारडम काहीच नाही..!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.