समस्त डॉग लव्हर्सचा पहिला आवडता पिक्चर म्हणजे “तेरी मेहेरबानिया”
बॉलिवुड म्हणल्यावर काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय आपल्याला इतक्या दिवसांपासून येतोच आहे. म्हणजे हेलिकॉप्टरला धरून टायगर श्रॉफचं उडणं असू दे किंवा वाघाशी फायटिंग करणारे हिरो असू दे किंवा रेस सिरीजमधला सल्लू भाऊ असू दे जे कधी आपण स्वप्नांत विचारही करू शकत नाही ते हे बॉलिवूडवाले सहज करून जातात. तर आता विषय निघालाय म्हणल्यावर सांगतो इतक्या वर्षांपासून हिंदी सिनेमात जनावर आणि माणसं यांच्यातील प्रेम, जिव्हाळा याविषयी दाखवलं गेलेलं आहे. 50 च्या दशकात दिलीप कुमार आणि देवानंद यांच्यासोबत इंसानियत सिनेमात दिसलेला चिंपाजी असो किंवा राजेश खन्नाचा हाथी मेरे साथी असो किंवा हम आपके है कौन मधला टफि असो असे अनेक सिनेमे झाले ज्यात प्राणी दाखवले गेले किंवा हिरोच्या दर्जाचं त्यांचं पात्रं होतं.
तसंच ऐंशीच्या दशकात मल्टिस्टारर सिनेमांचा काळ आला होता. एका सिनेमात दोन तीन हिरो असायचे तेव्हाच लोकं पिच्चर पाहायला जायची. 18 ऑक्टोबर 1985 रोजी एक सिनेमा रिलीज झाला नाव होतं ‘तेरी मेहेरबानिया. हिरो सिनेमातून धमाकेदार आगमन जॅकी श्रॉफने बॉलिवूडमध्ये केलं होतं. पण मध्ये तो फ्लॉप ठरत चालला होता. याच काळात भिडू जॅकी श्रॉफच्या करिअरला सावरणारी एक फिल्म आली आणि ती होती ‘तेरी मेहेरबानिया. दिग्दर्शक विजय रेड्डीने तामिळ सिनेमा तालिया भाग्य वरून ‘तेरी मेहेरबानियाचा रिमेक केला होता.
तालिया भाग्य हा सिनेमा तामिळमध्ये फ्लॉप ठरला होता पण जॅकी श्रॉफसाठी हा सिनेमा वरदान ठरला. या फिल्ममध्ये म्हणजे ‘तेरी मेहेरबानियामध्ये जे कुत्र दाखवण्यात आलेलं मोती त्याचं खरं नाव होतं ब्राऊनी. जग्गु दादाचं नाव राम आणि कुत्रा मोती.
सिनेमा पाहताना असं वाटायचं की जग्गु दादा आणि मोतीमध्ये लय भारी रिलेशन आहे दोघांचा एकमेकांवर जीव आहे पण याच मोती कुत्र्यानं जॅकी दादाला एक खत्री झटका दिला होता.
या मोती कुत्र्याचा इतका लवाजमा असायचा की त्याला आणि जॅकी श्रॉफला खास एसी बस असायची. एकदा हा मोती आपल्या बसमधून बाहेर येऊन खुर्चीवर ऊन खात बसला होता. आपल्या व्हॅनमधून जग्गु दादा मेकअप करून बाहेर आले आणि खुर्ची जरा सरकवून मोतीच्या खुर्चीला खेटून बसले. तसं ते मोती पेटलं आणि त्याने थेट जॅकी श्रॉफच्या हाताचा लचका तोडला. हा भीमपराक्रम मोतीने एकदा नाय तर दोनदा केला तेव्हापासून जग्गु दादा या मोती पासून फटकून राहू लागला.
हा मोती काय फक्त जग्गु दादा बरोबरच दिसला असं नाही तर त्याने अमिताभ बच्चन सोबतच अनेक मोठ्या सेलिब्रिटी सोबत काम केलंय. हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, बंगाली,मल्याळम मध्ये सुद्धा भरपूर सिनेमे केलेत. या ब्राऊनीला तेव्हा वंडर डॉग म्हणून ओळखलं जायचं. तीन हजार रुपयात या लॅब्राडोर मोतीला जेम्स नावाच्या व्यक्तीने ट्रेन केलेलं होतं. हा मोती वन टेक ऍक्टर असल्याचं दिग्दर्शक सांगायचे.
हे ही वाच भिडू :
- एकेकाळी ‘बिल्ला’ नावाने ओळखला जाणारा बॉलिवूडचा खलनायक अचानक कुठे गायब झाला?
- २०२१ सालातले ‘हे’ मोठे राजकीय भूकंप ज्यामुळे देशातील राजकीय समीकरणेच बदलून गेली.
- लिपस्टिकमुळे वडिलांचा बेदम मार खाणारी रिमा लांबा किसिंग क्विन मल्लिका शेरावत बनली..
- जॅकी श्रॉफचं नाव ऐकताच दाऊदची टरकली…