गांधींच्या आवडत्या नेत्याला काँग्रेस अध्यक्ष होता आलं नाही, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला…

भारतात अनेक गांधीवादी लोक आहेत आणि यापूर्वी सुद्धा होऊन गेलेत. पण त्यात एक व्यक्ती होती जी महात्मा गांधींच्या विचारांपासून प्रेरित होती पण त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. ती व्यक्ती आहे जयप्रकाश नारायण.

ज्यांना कधीच गांधीवादी म्हटले गेले नाही, पण गांधींच्या आदर्शांचा त्यांच्या विचारसरणीवर आणि आचरणावर नक्कीच परिणाम झाला. 

१९४२ पर्यंत जयप्रकाश नारायण हे मातृभूमीसाठीच्या चळवळीत सक्रीय होते. त्यांच्या या आघाडीच्या भूमिकेमुळे महात्मा गांधी प्रभावित झाले होते. याचमुळं गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी जयप्रकाश नारायण यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, पण गांधीजींचा हा प्रस्ताव त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला होता असे म्हटले जाते.

गांधीजींनी जयप्रकाश नारायण यांचं नाव अध्यक्ष पदासाठी घेतलं असल्याचं अनेक ठिकाणी सांगितलं जात.

जयप्रकाश नारायण यांचा जन्म बिहार मधल्या सिताबदियाराचा. लहानपणीच त्यांना स्वावलंबी व्हायचे होते. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी पुढील शिक्षणासाठी आपले घर आणि गाव दोन्ही सोडले आणि पटना येथे ते स्थायिक झाले आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तिथेच पूर्ण केले.

परीक्षेला अवघे २० दिवस पूर्ण असताना जयप्रकाश नारायण यांनी असहकार आंदोलनात भाग घेण्यासाठी बिहार नॅशनल कॉलेज सोडले.

पण तरीही त्यांनी अभ्यास सुरु ठेवला. आर्थिक परिस्थिती नसताना देखील वयाच्या २० व्या वर्षी ते अभ्यासासाठी अमेरिकेत गेले. अमेरिकेत गेल्यानंतर शिक्षणादरम्यान त्यांनी कामगार आणि मजुरांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या.

तिथे असताना त्यांच्यावर कार्ल मार्क्सच्या समाजवादाचा आणि रशियन क्रांतीचा खूप प्रभाव पडला, पण तरीही गांधीजींचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला. १९२९ मध्ये जयप्रकाश नारायण भारतात परतले तेव्हा असहकार आंदोलन शिगेला पोहोचले होते.

जवाहरलाल नेहरूंच्या सांगण्यावरून ते स्वातंत्र्यलढ्यात सामील झालेच पण त्यांनी कॉंग्रेसमध्ये सुद्धा प्रवेश केला. 1932 मध्ये भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

सुटकेनंतर त्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या स्थापनेत भाग घेतला आणि काँग्रेसमध्येच समाजवादी विचार असलेल्या अनेक लोकांना एकत्र करून काँग्रेस सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली.

जो पक्ष कॉंग्रेसमधील समाजवादी विचारांच्या लोकांचा होता.

१९३९ मध्ये ब्रिटनच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहभागाला विरोध केल्याबद्दल त्यांना ब्रिटीशांनी पुन्हा तुरुंगात टाकले, परंतु काही दिवसातच त्यांची सुटका करण्यात आली आणि १९४३ मध्ये त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यापूर्वी ब्रिटीश सरकारला हिंसक प्रतिकार केला आणि त्यानंतर १९४६ मध्ये पुन्हा त्यांची सुटका झाली.

नंतर १९४८ मध्ये त्यांनी बहुतांश कॉंग्रेस समाजवाद्यांसोबत कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे सोडला आणि १९५२ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली. 

त्यानंतर पक्षीय राजकारणात असंतुष्ट झाल्याने,  १९५४ मध्ये त्यांनी जाहीर केले की ते यापुढे आपले जीवन केवळ भूदान यज्ञ चळवळीला समर्पित करणार, ज्याची स्थापना विनोबा भावे यांनी केली होती.  भूदान आणि ग्रामदान यांसारख्या चळवळींद्वारे सामाजिक पुनर्रचनेच्या प्रयत्नांमध्ये जयप्रकाश नारायण यांचे मोठे योगदान राहिले त्यात त्यांनी अहिंसेला खूप महत्व दिले.

१९७५ ते १९७७ दरम्यानच्या आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी अहिंसेला महत्व दिले. त्यांच्यात अहिंसेची भावना रुजवण्यात गांधीजींचे योगदान असल्याचेही त्यांनी वेळोवेळी म्हटले. गांधींच्या अहिंसेतून कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो, असे ते म्हणायचे.

जयप्रकाश नारायण यांनी अहिंसेच्या दृष्टीनं केलेल्या कामाबद्दल सांगायचं तर, त्यांच्या आग्रहामुळं ८० गुंडांनी शस्त्र खाली ठेवली. राजकारण आणि समाजकारणात आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या जयप्रकाश नारायण यांचं ऑक्टोबर १९७९ मध्ये निधन झालं. पण त्यांनी काँग्रेस प्रचंड फॉर्मात असताना वेगळा पक्ष काढण्याची दाखवलेली हिंमत आजही अनेकांच्या लक्षात आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.