असा होता गांधीजींचा पाचवा मुलगा, “जमनलाल बजाज”…

महात्मा गांधीजी म्हणजे अनेकांना न उलगडलेलं कोड. हातात काठी आणि अंगावर फक्त पंचा अशा वेशातला हा माणूस जगातल्या सर्वशक्तीशाली ब्रिटीश साम्राज्याला आव्हान देत होता. हातात कोणत शस्त्र न घेता ही लढाई लढत होता. अहिंसा सत्याग्रह उपोषण हे त्यांचे हत्यार होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लढ्यात पूर्ण देशातला गरीबातला गरीब ते श्रीमंतातला श्रीमंत प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभा होतं.

यातच होते शेठ जमनालाल बजाज.

जमनालाल बजाज यांचा जन्म राजस्थान मधल्या एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला होता. कनीराम आणि बिर्डीबाई यांचे ते तृतीय सुपुत्र. घरात कमालीच दारिद्र्य. त्यांच्याच नात्यातल एक कुटुंब दूर महाराष्ट्रात वर्ध्याला राहात होते. त्यांच्याकडे पैसा तर भरपूर होता पण त्यांना संतान नव्हती. त्यांनी जमनालालचा चूणचुणीतपणा पाहून त्याला दत्तक घेतले.

जमनालाल वर्ध्याला आला. त्याच शिक्षण फक्त चौथी पर्यंत झालं होत. इंग्रजी येत नव्हती. सेठ बचराज यांनी त्याला दत्तक घेतल होत पण वयाने ते त्याच्या आजोबांएवढे होते. त्यांनी जमनालालला धंद्याची सगळी गणिते शिकवली. त्याचे लग्न लावून दिले. घरचा व्यवसाय पुढे तोच यशस्वीपणे सांभाळणार त्यांना खात्री होती. पण नियतीच्या मनात काही वेगळच होत.

जमनालाल सतरा वर्षाचे होते. त्यांना एकदा पाहुण्याच्या एका लग्नसमारंभाला जायचं होत. बचराज यांच्या पत्नीने जमनालालना लग्नाला जाताना हिऱ्याचा हार गळ्यात घालायला दिला. पण त्यांना अशा कार्यक्रमात जाण्याचा आणि तिथे आपल्या संपत्तीच ओंगळवाणे प्रदर्शन करण्याचा भयंकर राग होता. त्यांनी लग्नाला जाण्यास नकार दिला. यावरून वडिलांशी त्याचा वाद झाला. जमनालाल घरातून पळून गेले.

आपण संपत्तीसाठी बचराज यांना दत्तक आलो नाही हे त्यांना सांगायचे होते. जमनालाल नी आपल्या दत्तक आईवडिलाना पत्र लिहिले ,

” मुझे आपके पैसों से कोई लोभ-लालच नहीं. मैं धन की परवाह ही नहीं करता. मैं घर से कुछ भी लेकर नहीं जा रहा हूं. जो कपड़ा तन पर था केवल वही पहने जा रहा हूं. प्रार्थना करता हूं कि मेरे जाने पर दुखी मत होइयेगा और सदा प्रसन्नचित्त रहिएगा.  “

यापत्रासोबत एका स्टँप पेपरवर बचराज यांच्या सगळ्या संपत्तीवर आपला हक्क असणार नाही हे लिहून दिले. त्यांचे हे पत्र वाचून सगळ्यांना धक्का बसला. बचराजनी कसे तरी त्यांना शोधून काढले आणि समजूत काढून त्यांना परत घरी आणण्यात आले.

जमनालाल बजाज यांना विरक्तीचे आकर्षण होते. सामाजिक जीवनात आध्यात्मिक अनुभूतीसाठी एखाद्या गुरूचा शोध ते घेत होते. यासाठी ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यापासून लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत अनेक विचारवंताच्या कडे गेले.

१९०६ साली त्यांनी त्यांना रोज मिळणाऱ्या पॉकेटमनी मधून पैसे साठवून टिळकांच्या केसरी वर्तमानपत्रासाठी शंभर रुपयांची देणगी दिली होती. ते म्हणतात,

“त्या दिवशी मला देशसेवेसाठी ते पैसे देऊन जे समाधान मिळाले ते पुढे लाखो रुपये दान देऊन ही मिळाले नाही”

साधारण १९१५ साली गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. त्यांच्याबद्दलची चर्चा जमनालाल बजाज यांनी खूप ऐकली होती. हा नेमका माणूस तरी कसा आहे हे पाहण्यासाठी ते साबरमती आश्रमात गेले. तिथे काही दिवस राहिल्यावर त्याच्या लक्षात आले की गांधीजीच्या कथनी आणि करनी मध्ये काहीही अंतर नाही. त्यांनी त्याचं शिष्यत्व स्वीकारलं.

गांधीजी हे गोरगरिबांच्या पाठीशी होते मात्र याचा अर्थ श्रीमंतीचा ते द्वेष करत नसत. त्यांचा देशाला संदेश होता,

राष्ट्रउभारणीसाठी धनाची आवश्यकता आहे फक्त ते कमावणाऱ्याने इतर देशबांधवांच्या प्रती आपली जबाबदारी लक्षात घेऊन संपतीचा मालक न बनता त्याचे ट्रस्टी व्हावे.

गांधीजीच्या सहवासातल्या प्रत्येक क्षणात जमनालाल बजाज यांना काही तरी नवे ज्ञान गवसत होते. त्यांनी आपल्या घरच्या व्यवसायाची जबाबदारी उचलली पण यापूर्वी या संपत्तीवर आपण पाणी सोडले आहे हे लक्षात घेऊन त्याच्या अनेकपट पैसे देशकार्यासाठी खर्च केले.

त्यांनी १९२० साली गांधीजीना एक पत्र पाठवले.

या पत्रात जमनालाल बजाज नी महात्मा गांधीना आपल्याला दत्तक घेऊन पाचवा पुत्र मानण्याची अनोखी मागणी केली होती. गांधीजींना आश्चर्य वाटलं पण जमनालाल बजाज यांचा जिद्दी स्वभाव आणि त्यांच्या मनातला आपल्या बद्दलचा भक्तीभाव त्यांना ठाऊक होता. त्यांनी त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.

गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात जमनालाल बजाजनी पुढे उभे राहून पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. त्यांच्याच आग्रहामुळे दांडी मार्च नंतर गांधीजी वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात राहण्यासाठी आले. जो पर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तो पर्यंत साबरमती आश्रमात पाउल ठेवणार नाही असा संकल्प त्यांनी केला होता.

जमनालाल बजाज यांनी स्वातंत्र्यलढयाबरोबरच समाजोद्धाराची ही कामे केली. अस्पृश्यता निवारण आणि खादीचा प्रसार हे त्यांनी ध्येय मानून त्या कार्यात स्वतःला झोकून दिले. वर्ध्यामध्ये विनोबा भावे यांच्यासोबत त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिर सर्वाना खुले व्हावे यासाठी आंदोलन केले. गांधीजीनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करताना कोणतीही तडजोड केली नाही .

गांधीजीनी त्यांना आपले मानसपुत्र मानले होते याचा अर्थ गांधीजींशी त्यांचे कोणतेच वाद नव्हते असे नाही. १९३५ सालच्या गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया अॅक्टनुसार कॉंग्रेसने निवडणुका लढवण्याला जमनालाल बजाज यांनी जाहीर विरोध केला होतं. शिवाय हरिपूराच्या कॉंग्रेस अधिवेशनात गांधीजीनी त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्या विरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास सांगितले होते ज्याला त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

११ फेब्रुवारी १९४२ रोजी त्यांचे निधन झाले. जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेल्या बजाज ग्रुपने स्वातंत्र्यानंतरही देश उभारणीसाठी सक्रीय सहभाग नोंदवला. आज बजाज रिक्षा पासून मोटारसायकल पर्यंत अनेक उद्योगात आहेत पण गांधीजीनी सांगितलेला संपत्तीचे मालक न होता ट्रस्टी व्हा या आदर्शांनुसार ते आजही जगत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.