त्याला व्हायरल फोटोमुळं ओळखत असाल, पण ॲटलीनं थलपती विजयचं करिअर वाचवलंय

साधारण दोन-तीन वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. फेसबुक, व्हॉटसअपवर एका कपलचा फोटो खतरनाक व्हायरल झालेला. फोटो तसा साधाच होता, पण पोराचा रंग काळा आणि पोरगी एकदम गोरी या फालतू कारणामुळं त्यांचं लय घाण ट्रोलिंग झालं. पार हा बघा सरकारी नोकरीचा इफेक्ट, पैसा असला की सगळं होतंय… अशा लय गोष्टी मिम्समध्ये आल्या.

त्यानंतर लोकांनी ती फोटोतली जोडी कोण आहे आणि त्यातलं पोरगं नेमकं काय करतं हे शोधून काढलं आणि ट्रोलिंग थंड झालं.

दुसरी गोष्ट म्हणजे, शाहरुख खानच्या नव्या पिक्चरचा टिझर नुकताच आलाय. यात शाहरूख दिसतोय एकदम खतरा. नेमकी स्टोरी काय असणार याबाबतचे लय अंदाज तुमच्या कानावर आले असतील. पण २०१८ मध्ये आलेल्या ‘झिरो’नंतर शाहरुख मोठ्या स्क्रीनवरुन गायब होता. आता लागोपाठ पठाण, डंकी आणि नव्याकोऱ्या ‘जवान’ची अनाउन्समेंट करत, शाहरुख मी पुन्हा येईन म्हणतोय.

एवढं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हायरल फोटो आणि शाहरुखचा काय संबंध

तर गोष्ट सिम्पल आहे, तो व्हायरल झालेला फोटो होता ॲटली म्हणजेच अरुण कुमारचा. हाच ॲटली शाहरुखच्या जवानचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. ज्याच्या रंगावरुन लोकांनी त्याची मापं काढली होती, तोच किंग खानला घेऊन बॉलिवूडमध्ये एंट्री मारतोय. ज्याचे पिक्चर बघत मोठा झाला, त्याच शाहरुखला डायरेक्ट करणाऱ्या ॲटलीच्या प्रवासाची गोष्ट जाणून घेऊयात.

मदुराईमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या ॲटलीनं तिथंच आपलं शिक्षण पूर्ण केलं. चेन्नईत जाऊन व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये डिग्री घेतल्यानंतर, त्याला पहिला ब्रेक दिला सुप्रसिद्ध डायरेक्टर शंकर यांनी. 

जवळपास ५ वर्ष शंकर यांच्यासोबत काम करत त्यानं रजनीकांतच्या एंथिरन आणि विजयच्या नानबनसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याच्यातल्या गुणवत्तेला पैलू पडत गेले.

दोनच वर्षांनी २०१४ मध्ये ॲटलीनं स्वतः पिक्चर लिहिला आणि डायरेक्टही केला, या पिक्चरचं नाव होतं राजा-रानी. 

यातल्या लव्हस्टोऱ्या चांगल्याच गाजल्या. पिक्चरनं कमाईही मजबूत केली. ॲटलीच्या नावाची आणि त्याच्या कामाची चर्चा होऊ लागली. पण जे ॲटलीला मोठ्या पडद्यावर दाखवायचं होतं, त्यासाठी त्याला एक मोठा स्टार हवा होता आणि कोणता स्टार हे त्याच्या डोक्यात फिट होतं.

नानबनसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतानाच त्याची या स्टारसोबत ओळख झाली होती. राजा-रानीमुळं ॲटली भोवतीही एक वलय तयार झालं होतं, ज्यामुळं या स्टारसोबत त्याची मिटिंग झाली आणि २०१६ मध्ये या जोडीनं पहिला पिक्चर केला, तो म्हणजे थेरी.

 हा स्टार म्हणजे दुसरा तिसरा कोण नाय, तर थलपती विजय!

 

थेरीच्या आधी विजयनं पुली पिक्चरमध्ये काम केलेलं. बाहुबलीच्याच धर्तीवर आलेल्या पुलीनं पैसे कमावले खरे, पण लोकांना हा पिक्चर लय पानचट वाटला. थलपती विजयच्या फॅन्सची तर पार तोंडं आंबली. लोकं म्हणायला लागली हा डबड्यात जाणार, हा कसला थलपती, हा तर संपला, पण थेरीमध्ये ॲटलीनं अशी जादू केली की पुन्हा एकदा विजयला त्याचं मार्केट मिळवून दिलं. 

त्याच्या एंट्रीला शिट्ट्या पडल्या, त्याच्या फायटिंगला थिएटर उसळलं, एकदम प्रॉपर विषय. थेरीनं जवळपास १५० कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं, विजयची गाडी रुळावर आली आणि ॲटलीच्या विमानानं टेकऑफ केलं.

 

या जोडीचा पुढचा पिक्चर आला मर्सल. 

याचंही लेखन आणि दिग्दर्शन ॲटलीचंच होतं, बापाच्या हत्येचा बदला दोन पोरं कसा घेतात, अशी साधी स्टोरीलाईन. विशेष म्हणजे यात बापाचं आणि दोन्ही मुलांचं काम थलपती विजयनंच केलं होतं. त्याच्या ट्रिपल रोलला लोकांनी जितकं डोक्यावर घेतलं, तितकंच ॲटलीच्या दिग्दर्शनालाही. कारण प्रत्येक सिनमध्ये ॲटलीचा टच होता, सगळं कसं रावडी आणि अंगावर काटा आणणारं. 

मर्सलसुद्धा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि कमाईच्या आकड्यानं २५० कोटींना मागं टाकलं.

जेव्हा याच जोडीच्या बिगीलची अनाऊन्समेन्ट झाली, तेव्हा लोकांना वाटलेलं सारखंसारखं कोण बघणार? पण भारतात तरी स्पोर्ट्स ड्रामाला मरण नसतंय, हेच बिगीलनं दाखवून दिलं. 

एक गँगस्टरचं पोरगं पुढं जाऊन फुटबॉल कोच बनतं आणि टीम बिल्ड करतं इतकी साधी स्टोरी. यात पोरगं पण थलपती विजय आणि गँगस्टरही तोच. वरकरणी स्टोरी चक दे इंडियासारखी वाटते, पण बिगील खतरनाक हिट झाला, ३०० कोटी कलेक्शन झालं आणि थलपती विजय आणि ॲटली या जोडीनं हॅटट्रिक मारली.

बिगीलमध्ये एक सीन आहे, सेम चकदे तारखा. जेव्हा कोच मॅचच्या आधी टीमला डोस भरत असतो. शाहरुखनं चकदेत भरलेला डोस एकदम पॉझिटिव्ह होता, इथं मात्र मायकेल टीममधल्या पोरींना डिवचतो, त्यांना नाही नाही त्या गोष्टी बोलतो आणि टीम जिंकते. 

शाहरुखचा सत्तर मिनिटवाला सिन ड्रेसिंग रूममध्ये खरंच घडेल असं वाटत नाही, पण चिडलेला कोच मायकेलसारखं खरंच वागू शकतो, राडा घालू शकतो.

हेच ॲटलीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्या सिनेमातल्या गोष्टी बघायला भारी वाटतात, ज्यात प्युअर टॉलिवूड टच असतोय आणि नाद मजा येते.

त्याच्या डायरेक्शनमधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो विजय स्टारडमचा पुरेपूर वापर करुन घेतो. त्याच्या ४ पिक्चरपैकी ३ पिक्चरमध्ये विजय आहे आणि एकात ट्रिपल रोल, तर एकात डबल. लोकं विजयचा पिक्चर बघायला येतानाच कायतर लार्जर दॅन लाईफ बघायचंय हे डोक्यात ठेऊन येतात. बाहेरच्या आयुष्यात झालेल्या लडतरी, अडचणी या गोष्टी काही तासांसाठी का होईना त्यांना विसरायच्या असतात. ॲटलीनं हे ओळखलंय, तो त्यांना एंटरटेन्मेन्टचं प्रॉपर मास पॅकेज देतो. 

त्याच्या पिक्चरमध्ये हाणामारी असते, स्क्रीनवर पैशे फेकावेत असे सीन्स असतात आणि पुढं काय होणार हे माहित असूनही थलपती विजयला जिंकताना बघण्यात एक वेगळीच नशा असते.

कुणी म्हणतं विजयमुळं ॲटलीचं करिअर तरलं, तर कुणी म्हणतं ॲटलीमुळं विजयचं. दोघं एकमेकांना पूरक आहेत, एवढं खरं. 

त्यांच्या मास मुव्हीजनं लोकांना खुश केलं आणि आता हीच स्कीम शाहरुखच्या जवानमुळं हिट होऊ शकतेय. थोडं आठवून सांगा ज्या मास पिक्चर्ससाठी आधी बॉलिवूड ओळखलं जायचं, तसा मास बॉलिवूड पिक्चर शेवटचा कुठला पाहिला होता? पटकन आठवणार नाही. 

मेंदू आणि त्यातलं टेन्शन बाहेर ठेऊन आपण पिक्चर बघायला जातो, येताना आपली छाती काही इंच पुढं असावी असं आपल्याला वाटत असतं, हे असलं मटरेल सध्या आपल्याला साऊथवाले देतायत. 

आता कदाचित शाहरुख देईल. त्यात जवानमध्ये शाहरुखचा डबल रोल आहे अशी चर्चाय. हा पिक्चर सगळ्या भारतात वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीझ होतोय. त्यामुळं कित्येक वर्षांनी शाहरुखच्या पिक्चरला पुन्हा खुर्चीवर उभं रहावसं वाटेल, बॅकग्राउंड म्युझिक रिंगटोनला बसेल, शाहरुखची काहीशी गंडलेली लाईन मार्गावर लागेल आणि ॲटली आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये हसत असेल.. पुढच्या सुपरहिटची तयारी करत.

त्याचा काळा रंग, हडकुळी शरीरयष्टी आणि अभिनेत्री असलेल्या बायकोवरुन मापं काढणं सोप्पय, लोकांना तीन-साडेतीन तास पडद्यावरच्या हिरोओबत स्वतःशी तुलना करायला लाऊन खिळवून ठेवणं अवघड…

…हेच ॲटलीला परफेक्ट जमतं आणि म्हणूनच तो भारीये.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.