कित्येक सत्ता आल्या मात्र तब्बल सहाशे वर्षे महाराष्ट्रातले हे संस्थान टिकून राहिलं..
भारताच्या इतिहासात अनेक राजघराण्यांनी आपली सत्ता स्थापन केली मात्र सर्वात जास्त काळ बहुजनांचे राज्य असलेली सलग चालत आलेली मोठी परंपरा असणारे एकमेव संस्थान म्हणजे,
पालघर जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच पठारावर एका आदिवासी राजाचे राज्य जव्हारचे संस्थान होय
या जव्हारला जुना आणि नवा राजवाडा, दीड हजार फूट उंचीवरील थंड हवेचे ठिकाण, चहूबाजूने तुटलेले कडे, दऱ्याखोरी, त्यात वाढलेले गच्च जंगल आणि दरीत कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे असल्याने अशी अनेक स्थळे पाहण्यासाठी पर्यटक दूरवरून येथे येतात.
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण वारली चित्रकलेची पंढरी म्हणून ओळखलं जातं.
जव्हार म्हणजे जुने संस्थानिकाचे राज्य ‘महिकावतीची बखर’ यामध्ये जी ग्रामनावे येतात त्यात जव्हारचा उल्लेख ‘यवसाहार प्रेक्षादिगण’ असा केला आहे. येथे कातकरी आणि डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे. जव्हारला आदिवासी राज्य कसे स्थापन झाले, याबद्दल दोन वेगवेगळ्या घटकांचा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केलेला आढळतो.
जव्हार संस्थान इ. स. १३४३ मध्ये ‘जयबा’ नावाच्या मूळ पुरुषाने स्थापन केले.
या मूळ पुरुषाचे पूर्वज राजस्थानमधून नाशिकजवळ पिंपेरा गावी स्थायिक झालेले. रजपुतांच्या चालीरीतीचे पालन करणारे क्षत्रिय कुटुंब होते, अशी माहिती संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांनी सन १९७०मध्ये ‘जयबा’ नावाच्या इंग्रजी पुस्तकात दिली आहे.
त्यात मूळ संस्थापकाने राज्य कसे स्थापन केले, याचे रसभरीत वर्णन करून इतिहास लिहिला आहे. जयबाने मोगलांच्या महाराष्ट्रात स्थिर होत असलेल्या सत्तेच्या जुलूमाविरुद्ध बंड करून इ. स. १३४३ मध्ये जव्हारचे स्वतंत्र राज्य स्थापले. याला ऐतिहासिक पुरावा वा सनद उपलब्ध नाही. शिवाय मोगल घराण्याची स्थापना दिल्लीत १५२६मध्ये झालेली आहे.
त्यामुळे ही माहिती कितपत विश्वासार्ह मानता येईल त्यामध्ये शंकाच आहे पण स्थानिक लोकांमध्ये एक वेगळी दंतकथा देखील आढळते-
इगतपुरीजवळच्या मुकणे गावातील जयबा नावाच्या इसमास सदानंदबाबा नावाच्या एका सत्पुरुषाचा सत्संग घडला. जयबांनी सदानंदबाबांना आपला गुरू मानले होते. ( सध्या या सदानंद बाबा यांना पहिला उद्दीन बाबा असेही नाव जव्हारचा लोकांमध्ये केलेले आढळते व ते नक्की हिंदू होते की मुसलमान यावरही सध्या झगडा चालू आहे.)
जयबांवर प्रसन्न झालेल्या सदानंदबाबांनी एकदा जयबांशी बोलताना जव्हारच्या दिशेने बोट दाखवले आणि ‘जेथे घोडा आणि ससा खेळताना दिसतील तेथे जाऊन राज्य स्थापन कर,’ असे सांगितले. जयबा मोहिमेवर निघाले, जव्हारला आले आणि त्यांनी हे ठिकाण ताब्यात घेऊन राजगादी स्थापन केली.
ही घटना १३०६ मधली. तेव्हापासून १९४७ पर्यंतच्या ६४१ वर्षांत जव्हारच्या गादीवर मुकणे घराण्याच्या १९ वंशजांनी राज्य केलेलं आहे.
याच्या पेक्षा वेगळी अशी एक इतिहासाची मांडणी ठाणे गॅझेटियरमध्ये आढळते ती अशी की,
मुहमद्दीनने इ. स. १२९४च्या सुमारास दख्खनवर स्वारी केली तेव्हा जव्हारला कातकरी, कोळी, नाईक इत्यादींच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या. आदिवासी समाज विस्कळीत होता. इ. स. १३४१ साली दिल्लीचा सुलतान महमंद तुघलक (इ. स. १३२६ ते १३४७) याने जव्हारच्या एका टोळी नायकाला राजा ही पदवी देऊन त्याला मांडलिक बनविले व त्याच्याकडून दरसाल नजराणा वसूल करू लागला.
हे नायक म्हणजे आताचे मुकणे राजांचे पूर्वज होय.
जयाबानंतर त्यांचा मुलगा धुळबाराजे उर्फ नीमशाह हे पराक्रमी शासक झाले. नीमशाहांनी सैन्य उभे करून सध्याच्या नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील बराच मोठा प्रदेश घेऊन सुमारे २२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवले. १३४३ मध्ये दिल्लीच्या तुघलकांनी नीमशहांना राजा ही पदवी दिल्यावरून नवीन शक सुरू झाला (५ जून १३४३). तो अखेरपर्यंत जारी होता. जव्हार येथील भोपटगड (भूपतगड) किल्ला या कोळी साम्राज्याची राजधानी होती.
नीमशाहांनंतर सु. दोनशे वर्षांच्या काळातील इतिहास ज्ञात नाही. पोर्तुगीजांशी युद्धे करून कोळी राजांनी वसई ते डहाणू टापूवर अंमल बसवला होता. १७८२ पासून पेशव्यांनी दुसऱ्या पतंगशाहांवर १,००० रु. खंडणी बसवली.
पाचवे पतंगशहा म्हणजे यशवंतराव महाराज हे या गादीचे व आदिवासींच्या या संस्थानाचे अखेरचे राजे. लहान वयात एकटे पडल्याने इंग्रज सरकारने त्यांना देखभालीसाठी इंग्लंडला नेले व पंधरा-सोळा वर्षांचे होईपर्यंत त्यांचे पालनपोषण तेथेच झाले. त्यामुळे यशवंतरावांवर त्या काळात इंग्रजी संस्कृतीचे संस्कार झाले.
त्याआधीचे सारे राजे आदिवासी संस्कृतीत वावरले. यशवंतराव रॉयल एअर फोर्समध्ये पायलट होते. जतच्या राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. संस्थान खालसा झाल्यानंतर ते राजकारणात गेले. जव्हार-डहाणू लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून ते निवडून आले.
बाहेरच्या जगाचं शिक्षण घेतलेल्या आणि बडय़ा लोकांसोबत वावरलेल्या यशवंतराव महाराजांमुळे जव्हारला त्या काळात नगरपालिका झाली. आणि आज दिसणाऱ्या काही सुविधांची सुरुवात त्यांच्याच कारकीर्दीत झाली.
दरम्यान तीनशे वर्षे उलटून गेली आणि एक दिवस येथे इतिहास स्वतः चालून आला.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले. ५ जानेवारी इ. स. १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: जातीने सुरतेवर स्वारी करण्यास निघाले असता त्यांना कोळवणातून म्हणजे जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी जव्हारच्या राजाची सदिच्छा भेट घेतली.
जव्हारचा राजा विक्रमशहा पहिला याने या मराठा राजाचे जंगी स्वागत केले व त्यांना शिरपेच भेट दिला. त्यांच्या या भेटीची आठवण जव्हारपासून दीड किमी अंतरावरील मूरचूंडी गावाजवळ शिरपामाळ येथे एका कमानीच्या रूपाने जपून ठेवण्यात आली आहे. शिरपामाळ हे नावही शिरपेच दिल्याने पडले असल्याचे सांगतात.
जव्हारच्या राजाने शिवाजी राजांची भेट घेतली ही गोष्ट दिल्लीच्या औरंगजेब बादशहाला आवडली नाही. त्याने तुम्ही दिल्लीचे मांडलिक आहात असा सज्जड दम दिला, त्यामुळं जेव्हा पुन्हा एकदा इ. स. १६७० च्या ऑक्टोबरमध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सुरत लुटली तेव्हा मात्र जव्हारच्या राजाने मदत न करता तटस्थ राहणे पसंत केले.
त्यामुळे जव्हारला बगल देत आडमार्गाने शिवाजी महाराजांना स्वराज्यात यावे लागले.
जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच म्हणावे लागेल. किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देत अजूनही उभे आहेत.
जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांची मुलगी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना दिली होती.
त्यामुळेच सावरकर आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८ च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून निघून जावे लागले. इथल्या नागरिकांचे बाहेरही मोठे योगदान होते. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुण्यात येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास सापडत नसला तरी त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे या संस्थानातील लोकांची आणि राजाची कुणाचाही क्षेत्रात हस्तक्षेप न करण्याची वृत्ती.
भारतभर सत्ता संबंधांसाठी संघर्ष सुरू असताना मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले.
स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून येथील काही कार्यकर्त्यांना थोडा काळ संघर्ष करायला लागला होता.
२१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन ‘जव्हार लोकसेवा संघ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला.
हा लढा कशासाठी आहे हे ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले.
यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते.
शेवटी तडजोडी करण्यात आल्या आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.
हा सगळा इतिहास अनुभवण्यासाठी एकदातरी जव्हारला भेट दिलीच पाहिजे