पोलिओ लसीच्या पेटंट मधून तो सहज ७,००,००,००,००० डॉलर कमवू शकला असता, पण..

अनेक औषध कंपन्या लस बनविण्याचे अधिकार आपल्यालाच मिळावे म्हणून आग्रही होत्या मात्र जोनासने पेटंट घ्यायला नकार दिला. त्यावेळी त्याला ७,००,००,००,०००$ ची ऑफर देण्यात आली होती. (सात अब्ज… अंकी मुद्दाम दिले भारी वाटावे म्हणून) गरिबीत वाढलेल्या व्यक्तीने एवढी मोठी ऑफर नाकारली…

आज कोरोना विषाणूवरच्या लसीची आपण उत्कटतेने वाट पाहत आहोत.. जवळजवळ हे संपूर्ण वर्ष आपण कोरोना दहशतीखाली काढले आहे. विषाणू कसा रूप बदलत आहे हे तर पाहिले, आणि इंग्लंड अमेरिका सारख्या फाजील आत्मविश्वास दाखवणाऱ्या देशांना कसा धडा मिळाला आहे हे सुद्धा पाहत आहोत.

कोरोनासोबतचा लढा अजून किती दिवस, महिने चालेल माहीत नाही. मात्र काही रोगावर आपण निश्चितपणे कायमची मात केली आहे.

देवी, पोलिओ ही त्याची उदाहरणे..

देवीची लस शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरचे नाव आपल्याला शालेय पुस्तकातून माहिती असते….

मात्र पोलिओची लस सर्वप्रथम कोणी शोधली हे अनेक जणांना ठाऊक नसते. असं म्हणतात की,

१९४० च्या दशकात अमेरिका दोन महायुद्धांमध्ये सहभागी होती, जागतिक महायुद्ध आणि पोलिओ विरुद्धची लढाई. दरवर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त मुलांना पोलिओ होतं होता, त्यातील हजारो मुलांना अपंगत्व येत होते. उन्हाळा आला की पोलिओची साथ आलीच. आता कोरोनाकाळात आहे त्याप्रमाणे तेव्हादेखील स्विमिंगपूल बंद केले जायचे, सिनेमा हॉलमध्ये जागा मोकळ्या ठेवल्या जायच्या. दरवर्षी हाच सीन.

खुद्द राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट हे पोलिओचे बळी होते, त्यात त्यांना अपंगत्व आले होते. त्यामुळे त्यांची तर पोलिओच्या विषाणूशी पर्सनल खुन्नस.

National Foundation for Infantile Paralysis संस्था स्थापन करून त्यांनी या विषाणूच्या निर्मूलनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यासाठी संशोधकांना उद्युक्त केले होते. अनेक संशोधक यामध्ये गुंतले असताना १९५५ साली जोनास साक याला लस बनविण्यामध्ये यश आले…

“तुम्ही सूर्याचे पेटंट घेता का, नाही ना”

असे म्हणत पोलिओ लसचे पेटंट घ्यायला नकार देणारा हा वेडा..

पोलिओची लस ही किमान किमतीमध्ये सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावी ही त्यामागची त्याची भावना. देशाचा हिरो अशी प्रतिमा आणि अफाट प्रसिद्धी असताना स्वतचे पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवणारा जोनास साक.

२८ ऑक्टोबर १९१४ रोजी न्यूयॉर्क शहरात डॅनियल आणि डोरा साक या अशिक्षित ज्यु निर्वासित जोडप्याच्या पोटी जोनासचा जन्म झाला. पाठीवर अजून दोन भाऊ पाठलाग करत जन्मले..

आईवडील स्वतः अडाणी असले तरी तिन्ही मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे याकडे त्यांचे लक्ष होते. जोन्या अभासात अतिशय हुशार. वयाच्या तेराव्या वर्षी जोन्याला टाऊनसेंड हॅरिस या विद्यालयात प्रवेश मिळाला. ही हुशार मुलांची शाळा होती, फी नाही, मात्र दर्जा उच्च.

गरिबाच्या पोराला आयुष्यात काही तरी बनून दाखवायची संधी देणारी. टाऊनसेंड हॅरिस हा न्यूयॉर्क मधला शिक्षण क्षेत्रातील बाप माणूस, ज्याने न्यूयॉर्क सिटी कॉलेजची स्थापना केली होती, त्याच्या नावाची ही शाळा..

या शाळेत इतर शाळेत घेण्यात येणारा चार वर्षाचा अभ्यासक्रम तीन वर्षात पूर्ण करण्यात येई. हुशार मुलांची पण फेफे उडत असे, मात्र आपल्या मेहनतीवर जोन्याने शाळेत चांगले नाव कमावले. हातात पडेल ते वाचायचे हा त्याचा उद्योग. जोन्या अभ्यासाच्या पुस्तकापलीकडे जग पाहायला शिकला.

शाळेतील चांगल्या ग्रेड वर १५ वर्षांच्या जोनासला न्यूयॉर्क सिटी कॉलेज मध्ये सहज प्रवेश मिळाला. हे त्या काळातील नावाजलेले कॉलेज. मोफत शिक्षण देणारे. साहजिक पायाभूत सुविधा इतर महाविद्यालयापेक्षा दुय्यम तिय्यम दर्जाच्या. प्रयोगशाळा नाही की धडाचे वाचनालय नाही.

मात्र जवळपास सगळे विद्यार्थी गरीब घरातील होतकरू त्यामुळे कॉलेजमध्ये कायम स्पर्धेचे वातावरण असायचे त्यामुळेच अनेक नोबेल विजेते त्या महाविद्यालयाने दिले आहेत. जोनासने तेथून रसायनशास्त्र विषयाची पदवी मिळवली.

मोठा होत असतानाच जोनासचे समाजभान देखील जागृत होत होते. डाव्या विचारांचा अभ्यास करून चळवळीत सहभाग घेऊ लागला. ज्यूविरोधी विषमतेचा त्याला तिटकारा होता.( त्या काळात अमेरिकेतदेखील अनेक नामांकित विद्यापीठात ज्यू कोटा असायचा. त्यापेक्षा जास्त ज्यूधर्मियांना प्रवेश दिला जात नसे.)

खर तर जोनासची इच्छा होती की कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकील व्हावे. मात्र त्याच्या आईला वाटायचे आपली पोरं डॉक्टर व्हावीत. आईच्या इच्छेचा मान ठेवत त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले.

ज्यू कोटा सिस्टीम नसलेल्या न्यूयॉर्क विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला. सोबत छोटी मोठी part-time कामे करत १९३९ मध्ये वैद्यकिय पदवी प्राप्त केली.

याच वर्षात त्याने डोनासोबत लग्न केले. डोना ही त्याच्याच कॉलेजमध्ये msw शिकणारी, एक बडे बाप की लडकी.. दोघांच्या स्टेटसमध्ये एवढे अंतर होते जसे राजा हिंदुस्तानी मधील आमिर आणि करिश्मामध्ये.. डाव्या विचारांची दोस्ती झाली की व्यक्ती आहे त्यापेक्षा फाटका राहायला लागतो, आणि पोरींना तेच आवडते (असे माझे निरीक्षण बरं ) त्याप्रमाणे डोनादेखील या फाटक्या पण अँग्री यंग मॅनच्या प्रेमात पडली.

आपला कॉम्रेड “मधले” नाव लावत नव्हता. डोनाच्या बापाने अट घातली, जेव्हा तुला डॉक्टरची पदवी मिळेल तेव्हा आणि जेव्हा तुझा सडकछाप लूक बदलशील, मधले नाव लावशील तेव्हाच तुला माझ्या मुलीशी लग्न करता येईल.

अडला हरी गाढवाचे पाय धरी, त्याप्रमाणे सगळ्या अटी मान्य करून, एडवर्ड हे मधले नाव धारण करून जोनासचे डोनाशी “कल्यानम” झाले.. सुखी संसारात लवकरच तीन गुटगुटीत पोरांची पण भर पडली.

शिकत असतानाच त्याला संशोधनात रस निर्माण झाला होता.

त्यामुळे शिकत असताना मध्येच एक वर्ष सुट्टी जीवरसायनशास्त्र देखील शिकला होता, संशोधन केले होते. त्यातच phd करण्याचा मोह त्याला झाला मात्र घरची गरिबी त्याला आठवली, सेफ साईड म्हणून त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचे ठरवले (इस्कॉन पंथियामध्ये अनेक पोरं इंजिनियरिंग, मेडिकलचे लास्ट वर्ष असताना शिक्षण अर्धवट सोडून हरे रामा हरे कृष्णा करत बसतात राव.. त्यांच्या घरी किती वाईट वाटत असेल.)

शिक्षण पूर्ण झाल्यावर वैद्यकीचा व्यवसाय न करता विषाणू संशोधनावर त्याने लक्ष केंद्रीत केले. डॉक्टर होऊन एकेक रुग्ण नीट करण्यापेक्षा अखिल मानवजातीचे भले होईल असे काहीतरी शोधायचे त्याने ठरवले.

माऊंट सिनाई इस्पितळात त्याने संशोधक डॉक्टर म्हणून आपले कार्य सुरु केले. इथेच त्याची भेट झाली थॉमस फ्रान्सिस याच्याशी. इन्फ्ल्यूएन्झाच्या विषाणुवर त्यांचे संशोधन सुरू होते. त्यासाठी प्रयोगशाळा बनवली होती. चांगला मार्गदर्शक भेटल्यावर जोनासच्या आयुष्याला योग्य दिशा भेटली.

१९४२ मध्ये मिशिगन विद्यापीठात फ्रान्सिस सोबत इन्फ्ल्यूएन्झाच्या विषाणूंवर संशोधन करण्यासाठी त्याला शिष्यवृत्ती देखील मिळाली. (फ्रान्सिस ने शिफारस करताना ज्यू असला तरी हुशार आहे असा शेरा मारला होता राव)

तिथे संशोधन करत असताना फ्रान्सिस आणि जोनासने अनेक रुग्णांच्या नाकात इन्फ्ल्यूएन्झाचे विषाणू मुद्दाम सोडले होते असे प्रयोग करत असताना त्यांना इन्फ्ल्यूएन्झावर लस सापडली. इन्फ्ल्यूएन्झाचे मेलेले विषाणू जर शरीरात सोडले तर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन भविष्यात त्याची लागन होणे टाळता येते (काही काळापुरते… कारण त्याचा विषाणूदेखील रूप बदलत असतो.. दर वर्षी अद्ययावत लस घ्यावी लागते) या संशोधनामुळे फ्रान्सीसला प्राध्यापकीचा जॉब मिळाला आणि जोनासला देखील सहाय्यक प्राध्यापक म्हणून पोस्ट मिळाली.

इथे काम करत असताना मार्च ऑफ डाईम्स या संस्थेकडून पक्षाघाती पोलिओ यावर काम करण्यासाठी अनुदान मिळाले आणि इन्फ्ल्यूएन्झाची लस तयार करण्यात आली होती, त्याच पद्धतीने मेलेले विषाणू वापरून पोलिओची लस तयार करण्याचे काम १९४७ मध्ये सुरू झालं.

विषाणू मारायला फॉर्माल्डिहाइड द्रावणाचा वापर केला. १९५२मध्ये माकडांवर केलेले प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पोलिओ झालेल्या बालकांवर या लसीचा प्रयोग केला. किती अँटिबॉडी तयार होतात ते पाहिले. स्वतःला पत्नीला आणि तीन मुलांनासुद्धा ही लस टोचली. आणि पोलिओ विषाणूवर ही लस काम करत असल्याचे लक्षात आले.

इतिहासात पोलिओचा सर्वात जुना संदर्भ ३५०० वर्षापूर्वीच्या एका इजिप्शियन भित्तीचित्रात सापडतो.

या चित्रात पोलिओमुळे अधू झालेला पाय घेऊन, काठीच्या आधारे चालणारा माणूस आढळतो. विसाव्या शतकापूर्वी हा रोग खूप दुर्मिळ होता. मात्र आधुनिक काळात स्वच्छता वाढली, त्यामुळे मेंदुज्वर, क्षय यासारखे रोग कमी झाले तरी पोलिओ रुग्णांचे प्रमाण लक्षणीय वाढले. लहानपणी जेव्हा आईकडून मिळालेल्या अँटिबॉडी शरीरात असताना पोलिओ विषाणूचा हल्ला झाला तर तो सहज आणि कायमचा परतवून लावता येतो, मात्र थोडे मोठे झाल्यावर अँटिबॉडी नसताना पोलिओ विषाणू ने हल्ला केला की त्यात विषाणूचा विजय व्हायचा..

दरवर्षी पोलिओ विषाणूमुळे जगभरात सुमारे सहा लाख मृत्यू व्हायचे.

पोलिओचा विषाणू तोंडावाटे, बहुतेक वेळा दूषित पाण्यामुळे शरीरात प्रवेश करतो आणि मज्जासंस्थेवर हल्ला करतो. स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या पेशींना मारून टाकतो. स्नायूंच्या हालचाली कमी होत जातात, लकवा बसून कायमचे अपंगत्व येते. स्नायुंची ताकद संपली तर श्वास देखील घेता येत नाही, अशा वेळी रुग्ण मरूसुद्धा शकतो. शरीरात प्रवेश केलेला पोलिओचा विषाणू सक्रिय झाला की त्याला नंतर कोणी अडवू शकत नाही.

त्यावर काहीच इलाज नाही. मात्र मूल पाच वर्षाचे होईपर्यंत वारंवार पोलिओचा डोस दिला तर त्या मुलाचे शरीर आयुष्यभर पोलिओ विषाणूला “नो म्हणजे नो” म्हणण्याची क्षमता मिळवते.

लस बनवताना दोन प्रकार असतात.

मेलेल्या विषाणूचा वापर किंवा जिवंत पण अशक्त विषाणूचा वापर. इन्फ्ल्यूएन्झाची लस शोधताना केला तसाच मेलेल्या विषाणूचा वापर पोलिओ लस शोधताना जोनासने केला. लस गुणकारी आहे की नाही हे सिद्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात याची ट्रायल होणे गरजेचे होते. त्यासाठी मेलेले खूप विषाणू आवश्यक होते.

खूप विषाणू मारायचे असतील तर ते खूप तयार करायला लागणार. मात्र यावर उपाय उपलब्ध झाला होता.. १९४९ मध्ये वेल्लर, रॉबिन्स आणि एंडर यांनी पोलिओ विषाणू प्रयोगशाळेत टिश्यू कल्चर मध्ये तयार करण्यात यश मिळवले होते. (ज्यासाठी त्यांना नोबेल देखील मिळाले आहे) त्यामुळे विषाणूचा पुरवठा कुठून होणार हा प्रश्न तर मिटला गेला.

१९५४ मध्ये मार्च ऑफ डाईम्स संस्थेने चाचणीसाठी आर्थिक सहयोग दिला.

६ ते ९ वय वर्षे गटातील २० लाख बालकांनी स्वयंसेवक म्हणून लस प्रयोगासाठी नाव नोंदवले. पालकांनी यासाठी अतिशय उत्साह दाखवला. लस यशस्वी होईल की नाही याची त्यांना खात्री नव्हती, मात्र पोलिओची दहशत त्यांनी अनुभवली होती. जो होगा देखा जायेगा या मानसिकतेतून त्यांनी अनुमती दिली होती.

१० लाख बालकांना लस आणि १० लाख बालकांना प्लासिबो देण्यात आला. आणि पुढील काही महिने त्यांचे निरीक्षण करण्यात आले. आणि १२ एप्रिल १९५५ रोजी पत्रकार परिषद घेऊन हे घोषित करण्यात आले की पोलिओची लस सापडली आहे. त्या दिवशी अमेरिकन रेडिओ आणि टीव्हीवर पोलिओवर विजय मिळवल्याची बातमी लोक एवढ्या उत्सुकतेने पाहत होती, जसे भारतात पाकिस्तान सोबतची क्रिकेट मॅच पाहतात.

४० वर्षाचा जोनास साक हा रातोरात देशाचा हिरो झाला होता अगदी तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी देखील भरल्या डोळ्याने त्याचे आभार मानले होते..

अनेक औषध कंपन्या लस बनविण्याचे अधिकार आपल्यालाच मिळावे म्हणून आग्रही होत्या मात्र जोनासने पेटंट घ्यायला नकार दिला. त्यावेळी त्याला ७,००,००,००,०००$ ची ऑफर देण्यात आली होती. (सात अब्ज… अंकी मुद्दाम दिले भारी वाटावे म्हणून) गरिबीत वाढलेल्या व्यक्तीने एवढी मोठी ऑफर नाकारावी..

यातच जोनासचे मोठेपण आहे. थोडी प्रसिद्धी मिळाली की चीलट देखील स्वताला हत्ती समजतो याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. जोनास साकचा पॅटर्न वेगळा होता, त्याला प्रसिद्धीचा त्रास व्हायला लागला. प्रसिद्धीचा झोत शक्य तेव्हढा टाळून त्याने प्रयोगशाळेत पुढील संशोधनावर लक्ष केंद्रीत केले.

ज्यावेळी त्याचे संशोधन सुरू होते, त्याचवेळी त्याचे साम्यवादी चळवळीसोबतचे संबंध देखील वाढले होते. त्याच्याविरुद्ध एफबीआयने भली मोठी फाईल देखील तयार केली होती. इतकंच नाही, जेव्हा राष्ट्राध्यक्षांनी त्याला भेटायला बोलावले तेव्हा त्याला भेटू नये असा लेखी सल्ला एफबीआयने दिला होता.

मात्र जोनासचे काम एवढे तोलामोलाचे होते की राष्ट्राध्यक्षांनी एफबीआयचा सल्ला नाकारला होता. १९६२ मध्ये जोनास साकने स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन केली, जिथं अनेक नामवंत शास्त्रज्ञ संशोधन करू लागले. प्रयोगशाळेसाठी देखील साक हवे तेवढे पैसे जमा करू शकला असता, मात्र त्याने जाणीवपूर्वक टाळले.

आज आपण जी तोंडावाटे लस घेतो ती साकने निर्माण केलेली नाही. साकने तयार केलेली लस इंजेक्शनद्वारे दिली जायची आणि आपल्या तर माहीतच आहे “दो बूंद जिंदगी की” आपण कसे तोंडावाटे घेतो.

१९६१ मध्ये डॉ. अल्बर्ट साबिन यांनी जिवंत अशक्त विषाणूचा वापर करून तोंडावाटे घेण्याची लस विकसित केली. आज प्रामुख्याने तिचाच वापर केला जातो. आज जवळजवळ संपूर्ण जग पोलिओ मुक्त झाले आहे, केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया आणि काही आफ्रिकी देशांमध्ये पोलिओचे रुग्ण नवीन रुग्ण आढळत आहेत.

भारतात एकेकाळी वर्षाला दोन लाख बालके पोलिओची शिकार बनत होते.

१९९५ पासून पल्स पोलिओ अभियान जोरात राबवले गेले. स्वयंसेवकांच्या मोठ्या फळीने चांगले काम केले. पश्चिम बंगाल मध्ये २०११ मध्ये आढळलेली रुक्सार ही बालिका शेवटची पोलिओ बाधित केस आढळली आहे.

२७ मार्च २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून भारत पोलिओमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.

साबिन यांची लस आज जगभर वापरली जात असली तरी सुरुवातीची लस बनवण्याचे श्रेय जोनास साकलाच जाते. त्याचा जन्मदिवस २४ ऑक्टोबर हा विश्व पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. साकने पुढील आयुष्य कॅन्सर, एडस् यावर संशोधन करण्यात व्यतीत केले. मानवाची दुःखे हलकी करण्याचं त्याच व्रत त्याने आयुष्यभर जपले.

२३ जून १९९५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला.

आयुष्याच्या उत्तरार्धात जोनास साकच्या आयुष्यात रंग भरायला गिलोट नावाची चित्रकार आली. साक १९६८ मध्ये डोना पासून वेगळा झाला होता. (अर्थात त्याचे तरीही डोना आणि मुलांसोबत चांगले संबंध होते.) गिलोट ही जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो याची एक्स साकशी तिची एका डीनरच्या भेट झाली, सहा महिन्याने साकने तिला प्रपोज केलं.

ती बोलली लिव्ह इन मध्ये राहू.. लग्न नको. आपल्या साध्या सरळ सभ्य माणसाला लग्नच करायचे होते.. तो बोलला तुझ्या काय अटी असतील लिहून दे.. (पहिल्या लग्नाच्या वेळी पण अटी होत्या राव, भाऊच्या कुंडलीत दोष होता की काय)

गिलोटने अटी लिहून दिल्या त्या सर्वच साकला मान्य होत्या..

१९७० मध्ये यांचे पण झाले कल्यानम. यावेळी यांच्या लग्नाला जोनासची तीन आणि गिलोटची पिकासो पासून झालेली तीन पोरं हजर होती.  निम्मे आयुष्य एकमेकांपासून १०००० किमी दूरवर काढलेले हे दोन जीव, एक ४८ वर्षाची कलाकार आणि ५५ वर्षाचा शास्त्रज्ञ, एकत्र आले. पुढे त्यांचा संसार छान झाला कारण तिला बायोलॉजी मधलं काही कळत नव्हतं आणि त्याला चित्रकले मधलं

साक जेव्हढा महान शास्त्रज्ञ होता तेवढाच मोठा मानवतावादी देखील..

किंबहुना जिवंत विषाणू ऐवजी प्रयोग करण्यामध्ये देखील त्याचा मानवतावादी दृष्टिकोन होता. जिवंत विषाणूचा प्रयोग म्हणजे व्यक्तीच्या जीवाशी खेळणे असे त्याला वाटायचे. त्याकाळात यावरून दोन गट देखील पडले होते. शास्त्रज्ञ आणि मानवतावादी यांच्यात असलेली ही दरी कमी करण्यासाठी तो आणि त्याची संस्था कार्यरत होती.

त्याच्या दृष्टीने मानवता हा विषय विज्ञानापेक्षा महत्वाचा होता. तो म्हणायचा,

“बायोलॉजी हे माझे अर्धे स्वप्न होते आणि मानवता हे अर्धे. दुर्दैवाने दुसरे स्वप्न साकार होताना दिसत नाही.”

१९९९ मध्ये टाइम्स पत्रिकेत मुखपृष्ठावर शतकातील १०० लोकांचे फोटो छापले होते, त्यात आइन्स्टाइन सारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञासोबत जोनास साकचा देखील फोटो होता. यातून साकने केलेल्या कामाची पावती मिळते.

आज पोलिओची लस नसते तर जगभरात किमान पावणे दोन कोटी लोकांना पोलिओने ग्रासलं असतं. एवढे मोठे काम करून देखील त्याचे नाव इतिहासात लुप्त व्हायला लागले आहे म्हणूनच या मानव वंशावरील उपकारकर्त्याच्या आठवणींना आज उजाळा देत आहे.

त्याचे मानवतेचे स्वप्न पूर्ण करायला आपण पण हातभार लावू आपल्या आपल्यात जाती धर्म प्रांत वंश यावरून द्वेष करण्याचे विषाणू जे लोक पसरवत आहेत, त्यांचे प्रयत्न हाणून पाडू… मानवतेचा विजय करू..

  • डावकिनाचा रिच्या

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.