मराठी माणसाला धंदा जमत नाही असं कोणी म्हणालं, तर आम्ही “जोशी वडेवाल्यांकडे” बोट दाखवतो

पैसा कमवायला दोन नंबर करायला लागतं. दोन नंबर तर जमलं पाहीजे नाहीतर एखाद्या राजकारण्याशी घसट तरी पाहीजे. तरच पैसा कमावता येतो हे आपल्या माणसांच साधं गणित असतं. मुळात पैसा कमावणं म्हणजे काहीतरी पापं करण्याची कल्पना आपल्याकडे आहे.

ठेवले अनंत तैसेची रहावे वगैरे टाईप जोक मारून आपण आपल्या गरिबीला ग्लोरिफाय करण्यातच धन्यता मानत असतो. 

पण भिडूंनो तस नसतं, पैसा कमावणे हे पाप नसतं. कष्ट केले पाहीजेत, पैसे कमावले पाहीजेत. धंदा केला पाहीजे. हे आपण लक्षात घ्यायला हवं.

आत्ता धंद्याचा विषय आला की लगेच पुढचा म्हणतो मराठी माणसाला धंदा जमत नाही. आत्ता आपल्याच लोकांनी आपल्याचं लोकांना मागे खेचण्यासाठी हे वाक्य मुद्दामहून पसरवलं असावं अशी शक्यता येते. जरा डोळे उघडून पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात बाप असणारी मराठी माणसं तुम्हाला सहज दिसतात.

म्हणूनच मराठी माणसाला धंदा जमतो हे सांगण्यासाठी आज तुम्हाला “जोशी वडेवाल्यांची” गोष्ट सांगतो. 

धंदा करण्यासाठी पुरेसं भांडवल, राजकीय ओळख, दोन नंबरचे कनेक्शन, योग्य ती जात अशा गोष्टी लागतात असा तुमचा समज असेल तर “जोशी वडेवाले” तुमचे हे मत थेट फाट्यावर मारून टाकतात.

जोशी वडेवाल्यांकडे यापैकी काहीही नव्हतं. तरी ते टिकले. फक्त टिकलेच नाही तर आपल्या नावाचा देखील त्यांनी एक ब्रॅण्ड उभा केला. 

तशी ही गोष्ट सुरू झाली २ ऑक्टोंबर १९८९ रोजी.

या दिवशी जोशी वडेवाले चं पहिलं आऊटलेट निघालं. आजच्या सारखं मोठ्ठं,चकचकीत अस हे आऊटलेट नव्हतं. तसा तो साधा गाडाच होता. पण याच्याही अगोदर जोशी वडेवाल्यांचा प्रवास सुरू झालेला.

माया जोशी आणि शैलेश जोशी अशी ही नवराबायकोची जोडी. माया जोशी यांच्या घरची परिस्थिती उत्तम होती. पण शैलेश जोशी यांच्या घरात कमावणारे फक्त वडिलच होते. शैलैश मुळात कष्टाळू माणूस. पडेल ती कामे करुन काहीतरी चांगल करण्याचं स्वप्न पाहणारा.

इथं दूसरी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे.

आपल्या बुडाखाली ड्युक असेल, खिश्यात रेबॅन असेल किंवा हातात आयफोन असेल तरच मुली पटतात असा तुमचा गैरसमज असेल तर तो देखील दूर करा. कारण शैलेश गरिबीतून आलेला असला तरी प्रामाणिक होता. म्हणूनच माया जोशी यांनी घरचा विरोध असून देखील शैलेश सोबत लग्न केलं.

शैलेशच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक अशीच होती. आठवी-नववीत असल्यापासून तो माऊली बसस्टॅण्डवर काकडी आणि गजरे विकायचा. दिवाळी आणि की फटाके विकणे, किल्ल्यावरील पोस्टकार्ड विकणे असे वेगवेगळे व्यवसाय करुन पोटाची खळगी भरायचा.

पुढे पुण्याच्या कॉलेजमध्ये शैलेश रोज सकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यन्त लोकांच्या गाड्या धुवत असे. गाड्या धुण्यासाठी एका गाडीमागे त्याला महिना वीस रुपये मिळायचे. जास्तीत जास्त गाड्या धुवून पैसे मिळवण्याची त्याची कसरत चालू होती.

याच काळात शिक्षण देखील चालू होतं. कॉलेजच्या जीवनातच त्यांची गाठ घरची श्रीमंत असणाऱ्या शैलेश यांच्यासोबत पडली. घरचा विरोध असताना देखील दोघांनी आतंरजातीय विवाह केला. 

दोघांनी मिळून संसार उभा करण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात पुण्यात रहायला देखील जागा नव्हती. तेव्हा शैलेशने आपले झेरॉक्सचे दुकान सुरू केले होते. दिवसभर वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जाऊन झेरॉक्सचे पेपर घेऊन येणे आणि झेरॉक्स काढून पुन्हा पोहचवणे असा दिनक्रम चालायचा.

या काळात त्यांनी डेक्कन जवळच्या एका इमारतीच्या गच्चीवर दहा बाय दहाची खोली मिळवली. खोली म्हणजे तिन्ही बाजूला पत्रे टाकून भितींच्या आधारावर तयार केलेला छोटासा भाग होता.

झेरॉक्स मशीनचा धंदा फक्त पोट भरण्यासाठी चालू होता. पण कधीकधी पोट भरण्यासाठी देखील पैसे मिळायचे नाहीत. दोन दोन दिवस उपाशी राहून हे नवराबायको चांगल्याची अपेक्षा ठेवून काम करायचे.

याच दरम्यान म्हणजे १९८६ च्या काळात शैलेशला जपानला जायची संधी मिळाली. 

शैलैश ज्युडो खेळायचा. या खेळासाठी त्याला तीन महिने जपानला जायला मिळणार होतं. शैलेशकडे पैसे नव्हती पण त्याने आत्तापर्यन्त एक गोष्ट चांगली जमवली होती, ती म्हणजे दुनियादारी. याच दुनियादारीचा त्याला फायदा झाला. मित्रपरिवार त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्यांच्या मदतीने शैलेश जपानला गेला.

जपानवरून परत आल्यानंतर शैलेशकडे दोन गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक बेल्ट आणि दूसरी गोष्ट म्हणजे जपानी माणसांची कष्ट करण्याची वृत्ती. 

माया जोशी यांच्या मनात त्यानंतर वडापाव विक्रीचा व्यवसाय करावा असं मनात आलं. सुरवातीला या व्यवसायास शैलेश यांनी विरोध केला पण सारसबाग येथे भरलेल्या डिस्नेलॅंड नंतर हा विरोध कुठल्याकुठे गेला. दोघांनी सारसबाग येथे काही दिवसांसाठी डिस्नेलॅंड पहायला येणाऱ्या माणसांना वडापाव विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला.

चांगली विक्री झाली जपानला जाऊन आल्यानंतर धंद्याचं कष्ट शैलेश यांच्या मनावर चांगलच. कोरलं होतं. यातूनच डोसा विक्री सह स्नॅक विक्रीसाठी आपल्या मुलाच्या नावाने त्यांनी विकी स्नॅक सेंटर नावाची टपरी सुरू केली.  पण या धंद्यात म्हणावा तसा जम बसला नाही. दरम्यान आपण फक्त वडापाव विकावा हेच माया जोशी यांच्या मनात आलं.

त्यातूनच २ ऑक्टोंबर १९८९ साली पुण्यात डेक्कन परिसरात “जोशी वडेवाले” ची पाटी झळकली. या पाटीचं वैशिष्ट म्हणजे पहिल्या दिवसापासून जोशी वडेवाले येथे गर्दी होऊ लागली.

चविष्ट गरमागरम वडापाव, स्वच्छता, ग्राहकांना आपलंसे करण्याची वृत्ती व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी पुणेकरांना आपलेसे केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपतीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी ‘जोशी वडेवाले’ हे क्षणभर विश्रांतीचं ठिकाण बनले.

पुढे इतर ठिकाणीही शाखा सुरू झाल्या. जशी प्रगती होत गेली तसे स्वत:चं घर, पहिली गाडी घेतली.  पुण्यातल्या ‘जोशी वडेवाले’ या एका आऊटलेटपासून झालेली सुरुवात हळूहळू ३० आऊटलेटपर्यंत वाढत गेली.

इथे ना कोणता राजकारणी पाठीमागे होता ना धंद्यात गुंतवण्यासाठी बक्कळ पैसा मागे होता. कष्ट करण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा आणि संयम, नियोजन या गोष्टीतूनच “जोशी वडेवाले” सारखा ब्रॅण्ड जन्माला आला.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.