आजपर्यन्त कैलास पर्वतावर एकही गिर्यारोहक चढाई करु शकला नाही कारण की…

जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एव्हरेस्ट. त्याची उंची आहे ८८४८ मीटर. या पर्वतावर आजपर्यन्त ७ हजाराहून अधिक गिर्यारोहक यशस्वी चढाई करु शकले आहेत. पण दूसरीकडे कैलास पर्वत ज्याची उंची आहे ६६३० मिटर. म्हणजे जगातील सर्वात उंच अशा माऊंट एव्हरेस्टहून २२१८ मीटर लहान आहे. मात्र या पर्वतावर आजपर्यन्त एकही गिर्यारोहक चढू शकलेला नाही.

कैलास पर्वतावर आजपर्यन्त कोणी जाण्याचा प्रयत्नच केला नाही, असही नाही. अनेकांनी हा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं. काहीजणांच म्हणणं होतं की, कैलास पर्वतावर चढाई करण्यास सुरवात केल्यानंतर नखं आणि केसांची वाढ दहापट अधिक वेगाने होवू लागली. काहीजण रस्ते विसरले. कैलास पर्वत चढण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्यांच्या काही निवडक कमेंट खाली देत आहोत,

कर्नल आर.सी. विल्सन यांच्या मते,

मला वाटलं की मी कैलास पर्वत चढून वरती जावू शकेल मात्र मी चढाईस सुरवात केली. पर्वताच्या पायथ्याला पोहचताच मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला. मोठ्या कष्टाने मी पर्वताच्या फक्त पायथ्यापर्यन्तचं पोहचू शकलो.

रशियन गिर्यारोहक सरगे सिस्टियाकोव्ह यांच्या मते,

मी पर्वताच्या पायथ्यापर्यन्त गेल्यानंतर माझ्या ह्रदयाचे ठोके जोरजोरात वाजू लागले. अगदी काही पावले पुढे टाकताच बी.पी मोठ्या प्रमाणात हाय झाला. मी काही क्षणात खाली उतरण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर कैलास पर्वतावर कधीच न जाण्याचा निश्चय केला.

कैलास पर्वतावर आजवर कोणी यशस्वी चढाई केली आहे का याचा शोध घेतल्यानंतर बौद्ध धर्मगुरू मिलारेपा यांनी ११ व्या शतकात या पर्वतावर यशस्वी चढाई केली असल्याचं सांगण्यात येतं. पण तो काळ ११ व्या शतकाचा आहे. ते एकटे या पर्वतावर जावून आले होते अशी आख्यायिकाच बौद्ध धर्मात प्रचलित आहे. त्यापलीकडे ते खरोखरच तिथे गेले होते का? याबाबतीत कोणतेच पुरावे नाहीत.

नेमकं अस का? आणि काय? याचा शोध घेण्यास सुरवात केल्यानंतर आम्हाला इंग्लीश आणि हिंदीमध्ये अनेक लेख मिळाले. पुस्तकांमध्ये संदर्भ मिळाले. हे संदर्भ आणि माहिती आम्ही काही यशस्वी गिर्यारोहकांसमोर मांडली. त्यांच्याकडून माहिती घेतली.

तीच ही माहिती खास बोलभिडूच्या वाचकांसाठी.

कैलास पर्वत हा भौगोलिकदृष्ट्या तिबेटचा भाग आहे. तिबेटवरती चीनची सत्ता असल्याने कैलास पर्वतावर चढाई करायची असल्यास चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते. हिंदू धर्मासोबत, जैन आणि बौद्ध समजासाठी देखील कैलास पर्वत हे धार्मिक स्थळ आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार शंकर अर्थात महादेव कैलास पर्वतावर राहतात. हे भगवान शंकराचे निवासस्थान आहे. जैन धर्माचे पहिले तिर्थकार ऋषभदेव अर्थात आदिनाथ यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ या ठिकाणी व्यतीत केला. त्यांना मोक्ष देखील याच ठिकाणी प्राप्त झाला.

साहजिक कैलास पर्वत आणि परिसरातील प्रत्येक गोष्ट ही अध्यात्मिक नजरेतून पाहिली जाते. कैलास पर्वताच्या पायथ्याला दोन तलाव आहेत. पैकी एका पर्वताचे नाव राक्षसतल आणि दूसऱ्याचे नाव मानससरोवर आहे. याच मानस सरोवरातून सिंधू, ब्रम्हपुत्रा, सतलज आणि घाग्रा नदीचा उगम होतो. भारतीय उपखंडातील दोन महत्वाच्या नद्या सिंधू आणि ब्रम्हपुत्रा या नद्यांचा उगम इथे होत असल्याने कैलास पर्वताप्रमाणे मानस सरोवरास देखील अध्यात्मिक महत्व आहे.

मानस सरोवर व राक्षसतल हे शेजारी शेजारी आहेत. मात्र राक्षसतलातील पाणी हे खारे असून त्याठिकाणी कोणीही जात नाही. तिथे मानवी सांगाडे असल्याचं सांगण्यात येत. राक्षसतल हे दैत्यांच तळं असून तिथेच रावणाने शंकरची पूजा केली असल्याची आख्यायिका आहे.

त्याचसोबतीने कैलास पर्वतांच्या प्रदक्षिणेस अन्यसाधारण महत्व देण्यात येते. अस सांगतात की पर्वताला प्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी साधारण दोन महिन्यांचा कालखंड लागतो. एकूण ५० ते ६० किलोमीटरची ही प्रदक्षिणा हिंदू, बौद्ध व जैन धर्मात महत्वाची मानली जाते. एक प्रदक्षिणा पुर्ण केल्यानंतर सर्व पापांतून मुक्ती मिळते तर १०८ प्रदिक्षणा पुर्ण केल्यास जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त करतो. ही प्रदक्षिणा देखील कठिण असून आजपर्यन्त १०८ प्रदिक्षणा पुर्ण केल्याचे नोंद नाही.

त्याचसोबत काहीठिकाणी असही सांगण्यात आलं आहे की कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्य आहे. धार्मिक ग्रॅंथात पृथ्वीचा डोलारा संभाळून ठेवणारी जागा म्हणून कैलास पर्वताचा उल्लेख करण्यात येतो. एक्सिस मुंडी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या थेअरीत कैलास पर्वत हा चुंबकिय क्षेत्राच्या मध्यावर असल्याचं सांगण्यात येत.

या दंतकथेनुसार सर्व विश्वाचा भार कैलास पर्वतावर सांभाळण्यात आला असून स्वर्ग आणि जमीन यांना जोडणारा हा दूवा आहे.

कैलास पर्वताच्या दिशेने जाण्यासाठी  उत्तराखंड राज्यातल्या पिथौरागढ जिल्ह्यातून अस्कोट, धारचूला, खेत, गब्यॉंग, कालापानी, लिपूलेख, तकलाकोट मार्ग आहे. ५४४ किलोमीटर असणारा हा रस्ता डोंगराळ आहे. या मार्गातील शेवटचा प्रवास याक,खेचर यांच्यावरुन पुर्ण करावा लागतो. तकलाकोट पासून पुढे तारचेन मार्गे तुम्ही पायथ्याला असणाऱ्या मानससरोवरापर्यन्त पोहचू शकता. पण तिथून पुढे असणाऱ्या कैलास पर्वतावर मात्र जावू शकत नाही. भक्त इथल्याच मानस सरोवरापर्यन्त पोहचतात व स्नान करतात.

आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा कैलास पर्वतावर आजपर्यन्त कोणी जावू शकलं नाही याला शास्त्रीय आधार काय असू शकतो..?

गिर्यारोहक श्रीकांत जाधव यांना आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं,

कोणता पर्वत किती उंच आहे यावरुन तो चढण्यास किती कठिण असू शकतो हे कारण आहेच पण त्याचसोबत पर्वताची रचना हे मुख्य कारण आहे. माऊंट एव्हरेस्ट चा उतार साधारण ४५ अंशाचा आहे. हाच मार्ग गिर्यारोहक पर्वत चढण्यासाठी वापरतात. मात्र कैलास पर्वत खडा आहे. याचा उतार ६० अंशाहून अधिकचा आहे. अशा वेळी इथे चढाई करणं अशक्यकोटीतील गोष्ट ठरते.

शिवाय या पर्वतावर बर्फाचे प्रमाण जास्त आहे. आजवर कोणीच चढाई न केल्याने रस्त्यांची माहिती नाही. पर्वत व पायथा या भागाबद्दल स्थानिकांना देखील अधिक माहिती नाही. साधारण कोणत्याही पर्वतावर चढाई करायची असल्यास स्थानिक लोकांची मदत महत्वाची असते. उदाहरणार्थ माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी शेर्पा समुदाय महत्वाची जबाबदारी पार पाडतात. कैलास पर्वताच्या परिसरात मात्र लोकसंख्याच नाममात्र आहे. इथला समाज बौद्ध आहे व त्यांच्यामते कैलास पर्वतावर जाणं निषिद्ध आहे. त्यामुळे स्थानिकांची मदत देखील मिळत नाही.

२००१ साली चीन सरकारने कैलास पर्वतावर चढाई करण्यासाठी स्पेनच्या टिमला निमंत्रण दिले होते. मात्र बौद्ध समाजासोबतच हिंदू समाजातून यास प्रखर विरोध करण्यात आला. त्यानंतर सरकारने ही भूमिका मागे घेतली व त्या टिमला थांबवण्यात आले.

या घटनेनंतर मात्र कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न देखील कोणी केलेला दिसून येत नाही.

हे ही वाच भिडू.