सुशांतसिंग राजपूत मोठा होताच पण कांचन नायक कुठे छोटा होता

दिग्दर्शक कांचन नायक यांचे नुकतेच वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

याच काळात बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्याने माध्यमांमधून सुशांतसिंग राजपूतवर अन्याय झाल्याच्या चर्चा झडू लागल्या.

निश्चितच सुशांतसिंग राजपूत मोठा होता पण कांचन नायक हा माणूस कुठे छोटा होता. पण दूर्देवाने कांचन नायक गेल्यानंतरच्या बातम्या पाहिल्यावर अस वाटतं इथेही त्यांच्यांवर अन्याय झाला.

‘कळत नकळत’ या सिनेमापूरत मर्यादित राहणं, त्यानंतर तसं काही भरीव योगदान देण्याचा चान्स न मिळणं या संदर्भातून कांचन नायक या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा आढावा.

‘कळत नकळत’ प्रदर्शित झाला १९८९ साली म्हणजे ३२ वर्षांपूर्वी. इतका जुना सिनेमा एखाद्या दिग्दर्शकाची ओळख बनावा, हे कौतुकास्पदही आहे आणि आश्चर्यकारकही. अजूनही हा सिनेमा अनेकांच्या स्मरणात आहे आणि त्याच्या उल्लेखाने लोक हळवे होतात ही कौतुकाची गोष्ट आहे.

या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार पुरस्कार पटकावले होते. राज्य पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नऊ पुरस्कार पटकावले होते. मात्र, कलात्मकदृष्ट्या एवढ्या प्रचंड यशस्वी ठरलेल्या आणि प्रेक्षकांचीही पसंती कमावलेल्या सिनेमानंतर,

त्या दिग्दर्शकापुढे निर्मात्यांची रांग लागली नाही, दुसरा सिनेमा चटकन मिळाला नाही, दुसरी काहीच ओळख बनू शकली नाही, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.

‘कळत नकळत’च्या निर्मात्या स्मिता तळवलकर यांच्या ‘अस्मिता चित्र’ची ही पहिली निर्मिती होती. मराठी सिनेमा एकीकडे ग्रामीण बाजाचे जुनाट भाबडे सिनेमे आणि दुसरीकडे आचरट विनोदी लक्ष्या-अशोकपट अशा दुहेरी कात्रीत सापडलेले असताना ‘कळत नकळत’ने शहरी बाजाचा, नाटकी मराठी न बोलणारा, सिनेमाच्या भाषेचा वापर करणारा, संयत आणि भावपूर्ण सिनेमाची पायाभरणी केली. स्मिता तळवलकर यांच्या ‘अस्मिता चित्र’च्या पुढच्या वाटचालीची दिशादर्शक पायाभरणी या सिनेमाने केली होती. ‘अस्मिता चित्र’च्या पुढच्या सगळ्या सिनेमांचा बाज ‘कळत नकळत’ने आखून दिलेल्या चाकोरीने जाणाराच आहे.

तरीही, या निर्मितीसंस्थेला पदार्पणात इतकं घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कांचन नायक यांनी पुढे ‘अस्मिता चित्र’बरोबर काम केलेलं नाही, त्यांचं बॅटन संजय सूरकर यांनी पुढे नेलेलं दिसतं.

नायक यांनी ‘कळत नकळत’चा षटकार मारला त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीची पार दैना उडालेली होती. सचिन, महेश कोठारे आणि उतरणीला लागलेले दादा कोंडके यांच्याव्यतिरिक्त फारसं कोणाला यश मिळत नव्हतं. शिवाय ‘कळत नकळत’ हा शहरी भागांमध्येच चाललेला सिनेमा होता. त्यामुळे नायक यांच्याकडे निर्माते थैल्या घेऊन रांगा लावतील हे शक्यच नव्हतं.

पण, त्यांना पुढचा सिनेमा बनवायला वेळ लागला आणि नंतरची कोणतीही निर्मिती ‘कळत नकळत’ची कलात्मक उंचीही गाठू शकली नाही किंवा खणखणीत व्यावसायिक यशही मिळवू शकली नाही, याचं एक कारण ‘कळत नकळत’च्या उंचीतच शोधावं लागेल.

असं म्हणतात की, कोणाही कलावंताचा किंवा दिग्दर्शकाचा प्रवास टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा व्हावा. त्याने पहिल्याच फटक्यात प्रचंड यशस्वी काम केलं तर त्याच्या पुढच्या सगळ्याच कामाची या पहिल्या कामाशी तुलना होत राहते आणि त्या अतिउंच फुटपट्टीपुढे त्याचं पुढचं सगळं काम फिकं पडतं. राजकुमार संतोषीचा ‘घायल’ पाहिल्यानंतर म्हणे महेश भट त्याला म्हणाला होता की तू हे काय करून ठेवलंस? आता आयुष्यभर तुला ‘घायल’चा दिग्दर्शक बनून राहावं लागेल आणि लोक तुझ्या प्रत्येक कामाची तुलना या सिनेमाशी करणार आहेत, याचं भान ठेवून काम करावं लागेल. हा मोठा ताप आहे.

सत्यजित राय यांनाही ‘पथेर पांचाली’नंतर ती उंची (काहीजणांच्या आणि खुद्द राय यांच्या मते ‘चारूलता’ हा त्यांचा सर्वात चांगला सिनेमा होता) त्यांना गाठताच आली नाही, असं मानणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय होतं.

कांचन यांच्यावर अशा प्रकारचा स्वनिर्मित दबाव आला होता का, हे छातीठोकपणे सांगणं कठीण आहे.

पण, ‘कळत नकळत’नंतर त्यांच्याबरोबर काम करू पाहणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या परफेक्शनच्या अट्टहासाचं वर्णन केलेलं आहे. ज्या काळात तीन महिन्यांत सिनेमा बनून तयार होत होता, त्या काळात सहा महिने पटकथेवर काम करण्यासाठी देण्याची कोणत्या निर्मात्याची ऐपत असेल? ‘कळत नकळत’ने मिळवून दिलेला लौकिक पुढच्या सिनेमाने धुळीला मिळवायला नको किंवा तसूभरही उणावायला नको, हे अदृश्य ओझं बाळगण्यापेक्षा पुन्हा दत्ताजी म्हणजे राजदत्त आणि डाॅ. जब्बार पटेल यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणं कांचन यांनी पसंत केलं असावं.

जब्बारांकडे तर ते सहदिग्दर्शकही बनले म्हणजे दिग्दर्शनातला केवढा मोठा वाटा उचलला असेल, मात्र त्या कलाकृतींच्या श्रेयापश्रेयाचे धनी डाॅ. पटेलच राहतील, हे कांचन यांना सोयीचं वाटलं असावं.

‘कळत नकळत’च्या त्या दबावातून कांचन बाहेर आले, तोवर चित्रपटसृष्टी फार पुढे गेली होती. आपले हट्ट बाजूला ठेवून त्यांनी ‘राजू,’ ‘दणक्यावर दणका’ यांसारखे मराठी सिनेमे तर केलेच, शिवाय ‘पिंजरेवाली मुनिया’ हा भोजपुरी सिनेमा ‘इंट्रोड्युसिंग मकरंद अनासपुरे इन भोजपुरी’ अशा पद्धतीने केला.

हे सगळे सिनेमे त्या त्या बाजाचे होते, काहीसे ओल्ड स्कूलच होते. त्यांच्यावर किंवा नंतर दिग्दर्शित केलेल्या मालिकांवर कांचन यांचा ‘कळत नकळत’चा शिक्का उमटू शकला नाही. ते ओझं त्यांनी वेळेवर भिरकावलं असतं तर?

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.