गांधी, पटेल, नेहरू, आंबेडकर हे सर्वजण वकील होते, इतिहासातील महिला वकील आठवतेय का?
महात्मा गांधी, वल्लभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सगळी माणसं वकील होती. भारताला स्वातंत्र मिळवून देण्यात व लोकशाही घटनेत हा संपुर्ण देश बांधून ठेवण्यात सर्वात महत्वाचा वाटा राहिला तो या वकिलांचाच.
पण तुम्ही विचार केलाय का,
वकिल असणारी स्त्री कोण होती? इतिहासाच्या पानांवर कधी एखाद्या महिलेचं नाव आलं आहे ती वकिल आहे अस सांगितलं आहे…
डोक्याला जास्त ताण देऊ नका. नाही आठवणार…
कारण त्या काळात कायद्यानेच स्रीयांना न्यायालयात काम करण्यास परवानगी नव्हती. स्वत:च्या न्यायासाठी लढण्याचा अधिकार महिलांना नव्हता तर न्यायदानाचा अधिकार कसा मिळेल भिडू. ना वकिल, ना जज.
न्यायालयाच्या इतिहासात महिलांच नाव कुठेच नव्हतं.
आत्ता एक गोष्ट सांगतो. खूप खूप जूनी अशी ही गोष्ट.
इसवी सन १८७४ चालू होतं. कंपनी सरकारची सत्ता जाऊन ब्रिटीशांच्या राणीचं साम्राज्य उभारलं होतं. कायदे कानून यांचं एक बेसिक स्ट्रक्चर उभारत होतं. अशा वेळी एका मोठ्या घराण्यातील एक स्त्री गुजरातहून आपल्या एका मैत्रीणीला भेटण्यासाठी नाशिकला आली.
स्टोरी अशी होती की या गुजराती बाईचा नवरा वारलेला. नवऱ्याच्या मागे अमाप संपत्ती होती व ती या संपत्तीची वारस होती. झालेलं अस की एका वकिलाने विधवा स्त्रीला सपशेल गंडवलेलं. तिच्या अमाप संपत्तीवर डल्ला मारलेला. ही विधवा स्त्री तर अडाणी होती. तिला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा हतबल होऊन ती आपल्या मैत्रीणीला नाशिकला भेटायला आली.
नाशिकच्या या मैत्रीणीचं नाव होतं फ्रांसिना फोर्ड. आपल्या मैत्रिणीची अशी अवस्था पाहून ती धीर देत होती. तिथे या दोघींशिवाय एक तिसरी व्यक्ती देखील होती. फ्रांसिना फोर्डची लहान मुलगी कोर्नेलिया.
कोर्नेलिया अगदी लहान होती, पण हा प्रसंग तिच्या आयुष्यावर नेहमीचा छापला गेला. तुम्हाला माहित आहे का, पुढे जाऊन काय झालं असेल,
ही लहान कोर्नेलिया मोठी होईन मुंबई विद्यापीठातून पास होणारी पहिली महिला ठरली. पुढे ती ऑक्सफर्डला गेली व तिथून कायदेशास्त्राचा रितसर शिक्षण घेणारी पहिली महिला झाली.
हीच ती लहान मुलगी जी पुढे जाऊन भारताची पहिली महिला वकिल झाली…
तिचं नाव कोर्नेलिया सोराबजी.
आपल्या आजीच्या म्हणजेच लेडी कोर्नेलिया मारिया फोर्ड यांच्यावरून कोर्नेलिया नाव देण्यात आलं होतं. तिचे वडील सोराबजीक र्सेदजी यांचे मुंबई विद्यापीठाच्या जडणघडणीत योगदान होते.
तसेच तिची आई फ्रांसिना फोर्ड या अनेक स्त्रियांना कायदेशीर सल्ला देण्याचे काम करत असत. पुण्यात मुलींच्या शाळा सुरु करण्यासाठी फ्रांसिना फोर्ड यांनी अनेकदा मदत केली होती. आपल्या आईच्या या कामाचा कोर्नेलिया सोराबजी यांच्या कामावर मोठा परिणाम होता.
मुंबई विद्यापीठाची एक शाखा पुण्यात उघडण्यात अली होती. इथेच कोर्नेलिया सोराबजी यांनी इंग्रजी साहित्य शिकण्यासाठी प्रवेश घेतला. डेक्कन कॉलेजात हे वर्ग भरत. आपल्या वर्गात त्या शिकणाऱ्या एकमेव विद्यार्थिनी होत्या.
त्यामुळं त्यांना येथील सनातनी विचारांच्या लोकांकडून मोठा त्रास होत असे. ते लोक कोर्नेलिया सोराबजी याना वर्गात बसता येऊ नये म्हणून वर्ग खोल्यांची दारे बंद करून घेत असत. मात्र अशा विपरीत परिस्थितीवर मात करत त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
एवढंच नाही तर आपल्या कॉलेजात त्या इतर सर्व मुलांपेक्षा जास्त मार्क मिळवून पहिल्या आल्या. आपल्या गुणांच्या भरवश्यावर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज दाखल केला.
1888 साली त्या ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाऊन पोचल्या आणि त्यांना कायदेव्यवस्थेतील रूढींचा फटका बसला. त्यांना लॉ विषय शिकण्यासाठी स्कॉलरशिप नाकारण्यात आली. सुदैवाने ऑक्सफर्ड शहरात स्त्री शिक्षणाचा पुढाकार करणारे अनेक लोक होते. फ्लोरेन्स नाईटेन्गेल आणि इतर महिलांनी काही रक्कम जमा करून त्यांच्या शिक्षणाची सोय केली.
तोवर खुद्द इंग्लंडमधल्या कोणत्याही स्त्रीने ऑक्सफर्डमधून कायद्याची पदवी घेतली नव्हती.
ऑक्सफर्डमध्ये त्यांची मॅक्स म्युलर या तज्ज्ञांशी चांगली ओळख झाली. त्यांनीही कोर्नेलिया सोराबजी याना शिक्षणासाठी मदत केली.
ऑक्सफर्डमध्येही त्यांना पुण्यासारख्याच पुरुषी मानसिकतेचा सामना करायला लागला.
तेथे त्यांना इतर लोकांबरोबर परीक्षा केंद्रात जाण्यास मनाई करण्यात आली होती. ‘येथील शिक्षणगृहे पवित्र आहेत त्यामुळं एखाद्या स्त्रीने तिथं बसणं हा त्याचा अपमान ठरेल’ असे त्यांचे मत होते. पण तेथील एक वरिष्ठ प्राध्यापक बेंजामिन जॉवेट यांनी ऑक्सफर्डमध्ये कोर्नेलिया सोराबजी यांच्या बाजूने तगादा लावून धरला.
शेवटी विद्यापीठाची एक मोठी बैठक बोलावण्यात आली आणि त्यात या मुद्द्यावर मोठी चर्चा झाली. त्यानंतर निर्णय घेण्यात आला की
“कोर्नेलिया सोराबजी यांची परीक्षा ऑक्सफर्ड विद्यापीठात घेण्यात येईल.”
खरे पाहता कोर्नेलिया सोराबजी यांनीच ऑक्सफर्ड विद्यापीठाची परीक्षा घेतली होती. एकूणच पुण्याला पूर्वेकडचं ऑक्सफर्ड का म्हणतात याचा प्रत्यय तुम्हाला हे वाचताना आला असेल.
भारतात परतल्यानंतर त्यांनी येथील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले. ज्या महिला न्यायासाठी पुढे येऊ शकत नसत, अशा महिलांसाठी केस लढण्याचे आणि त्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.
२० वर्षे त्या अशा पर्दानशींन स्त्रिया आणि कोर्ट यांच्यामधील एकमेव दुवा म्हणून कार्यरत होत्या.
त्यांनी या काळात जवळपास २०० स्त्रिया आणि मुलांच्या केसेस कोणतेही शुल्क न घेता लढण्याचे काम केले .
अलाहाबाद हायकोर्टात तर मोठाच किस्सा घडला.
मी तुम्हाला कोर्टात प्रॅक्टिस करण्याची परमिशन देऊ शकत नाही कारण तुम्हाला मी खडसावू शकत नाही असं कोर्टाच्या चीफ जस्टीसने कारण दिलं.
एकदा त्यांची बदनामी करण्यासाठी पंचमहालच्या महाराजांच्या हत्तींसाठी केस लढायला त्यांना बोलवण्यात आलं. हत्तींना महाराज खाऊ घालत नाहीत म्हणून हत्तीच्या बाजूने केस लढावी अशी मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूंचा खर्च महाराज स्वतः करणार होते.
त्यांना फक्त एक स्त्री-वकील केस कशी लढते हे बघायचं होतं.
बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम या कोर्टांमध्ये त्या पर्दानशींन स्त्रियांच्या केसेस लढण्यासाठी खास नियुक्त केलेल्या वकील म्हणून कार्यरत होत्या. या सर्व कोर्टात काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या हे सांगायला नकोच..!
त्यांच्या या कामासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना १९०८ साली “कैसर-ए-हिंद” पुरस्काराने सन्मानित केले.
भारतात इंग्रजांनी कोर्टाची पद्धत आणल्यानंतरही इथं स्त्रियांच्या कोर्टात असण्यावर बंधने होती.
पुढे डॉ. हरिसिंग गौर यांनी भारताच्या केंद्रीय कायदेमंडळात १ फेब्रुवारी १९२२ रोजी भारताच्या न्यायालयातून लैंगिक भेदभाव संपवण्यात यावा अशी मागणी केली. त्यांच्या या प्रस्तावाला केंद्रीय सरकारने हिरवा कंदील दाखवला.
त्यावेळी निर्णय घेण्यात आला,
“स्त्रियांना न्यायालयात कायदेशीर विषयांत काम करण्यापासून रोखणारे कायदे रद्द करत आहोत. आता स्त्रियांना या देशातील न्यायालयांत प्रॅक्टिस करता येईल.”
यामागे कोर्नेलिया सोराबजी यांच्या कामाचा मोठा वाटा होता.
लंडनचा लिंकन इन म्हणजे जगप्रसिद्ध किंवा पृथ्वीवरील मोठ्या वकिलांची मांदियाळी असणारा बार..!
१९२२ साली लंडनच्या लिंकन इन मध्ये त्यांना केसेस लढण्यासाठी संधी मिळाली.
आपल्या अनुभवांवर आधारित “द पर्दानशींन” हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकात त्यांनी स्त्रियांसाठी काम केले त्यांची माहिती होती. पण लाईफ अँड लव्ह बिहाइंड परदा हे पुस्तक त्या स्त्रियांची खरी कहाणी आणि त्यांची वास्तवीक कथा सांगणारे पुस्तक ठरले.
त्यांनी १९२९ साली आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणि त्या इंग्लंडला स्थायिक झाल्या. आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर विजय मिळवून त्या यशस्वी झाल्या. आपल्या आईला दिलेलं वाचन त्यांनी पूर्ण करून दाखवलं.
लंडनच्या लिंकन-इन मध्ये फार कमी व्यक्तींचे आदराने नाव घेतले जाते. त्याहून कमी लोकांची स्मृती जतन केली जाते, त्रोटक लोकांचे पुतळे तेथे उभारले आहेत. त्यापैकी एकमेव भारतीय स्त्री म्हणजे कोर्नेलिया सोराबजी होत.
हे ही वाच भिडू
- एक दिवसाचा वकील.
- पोलीसांनी दाढी ठेवणं योग्य आहे की अयोग्य, कायदा काय सांगतो..?
- या आहेत भारतातल्या पहिल्या महिला आमदार