या मुस्लिम हिरोईनचं देऊळ बनवून लोकांनी खुशबूची “खिशाम्बिका देवी” केलीय

आपल्या देशात कोण कोणाची पूजा करील काय सांगता येत नाय. पूजा कुणाचीही होती, कशानेही होती. आपली पूजा ढिनच्यॅक पण असू शकतेय आणि ऑनलाईन सुद्धा. VIP असू शकतेय आणि सामूहिक सुद्धा…

हि स्टोरी अशाच एका हिरोईनची आहे जिने आपल्या दिलखेचक बहारदार अभिनयातून लोकांच्या मनावर राज्य केलं पण आपल्या तितक्याच सडेतोड बेबंद विचार आणि वक्तव्यांमधून लोकांना पिसळायलाही भाग पाडलं…

तिच्या ‘जुन्या नट्यांच्या फिगरसारखी अंगाअंगात गोलाई’ बघून एका गरमागरम गोल गरगरीत मऊशार इडलीचा ब्रॅण्डही तिच्या नावावरून आला आणि आता भाजपमध्ये गेल्यावर तिला ‘तामिळ संस्कृतला बट्टा’ म्हणूनही दाखवण्यात आलं.

तिचं नावच खुशबू…

तामिळनाडूमध्ये सगळेजण तिला खुशबू सुंदर नावानं ओळखतात. “मैं परियो की शेहजादी” ह्या ‘दर्द का रिश्ता’ गाण्यात नाचणारी क्युट बारीकशी पोरगी आठवत असेल. आजही शाळेत कितेक पोरी ह्याच गाण्यावर डान्स बसवतात. तीच ही खुशबु…

तिचा जन्म मुंबईच्या उच्चकुलीन खान कुटुंबात झाला होता. जन्माचं नाव नखत. आईवडिलांच्या लै मोठमोठ्या वळखीपाळखी होत्या. एकदा आईच्या नात्यातल्या एका हिंदी पिच्चर प्रोड्युसरने घरी आल्यावर ‘पोरीला एका गाण्यात काम करायला पाठवता का’ विचारलं.

१९७० चं दशक होतं. भारत बदलूही बघत होता पण जडपणा अंगातून जात नव्हता. एकतर अशी कामं करणं समाजात हराम. पण व्हयनाय व्हयनाय करत आईने परवानगी दिली आणि तिचा प्रवास सुरु झाला.

पण अभिनयात करियर करण्यासाठी तिने खुशबू हे नाव निवडलं आणि तिला कायमचंच हे नाव चिकटलं. इतका मोठा प्रवास आपण करू असं तिलाही कधीच वाटलं नसेल, आणि तिच्याएवढा मोठा प्रवास करणारी दुसरी अभिनेत्री सापडणंही अशक्य.

चाईल्ड आर्टिस्ट म्हणून तिला लोकांनी एवढा जीव लावला की तिने पुन्हा मागे वळूनही पाहिलं नाही.

अमीर खान, स्मिता पाटील अशा अनेक कलाकारांसोबत काम करत ती चांगलीच प्रसिद्ध झाली. नसीब, लावारीस, कालिया अशा कित्येक चित्रपटांत तिनं अमिताभ बच्चनसोबत लीलया काम केलं आणि खुशबूने आपल्या अभिनयाचा दरवळ लहानपणीच इंडस्ट्रीत पसरवायला सुरुवात केली.

ती एका चौकटीत राहिली नाही आणि १९८६ साली तिने चक्क तेलगू फिल्म स्वीकारल्या. त्या वेळी मराठी किंवा हिंदी चित्रपटांतील हिरोईन दक्षिणेत काम करायच्या नाहीत. स्मिता पाटीलने हा ट्रेंड तोडून काढला होताच पण खुशबूने एक पाऊल पुढं जात तिथं सुपरस्टार बनून दाखवण्याचा पराक्रम केला.

ती कायमची चेन्नईला शिफ्ट झाली आणि  तिने दीडशेहून अधिक तामिळ चित्रपटांत काम केलं.

व्यंकटेशपासून रजनीकांत, कमल हसन पासून टायगर प्रभाकर, प्रभुदेवा पासून ते सत्यराज… तिथल्या हरेक स्टार-सुपरस्टार-मेगास्टार-न्यूट्रॉनस्टार सोबत तिची किमान एक फिल्म तुम्हाला घावलंच घावल!

आणि दक्षिणेकडच्या – विशेषतः तामिळ अन मल्याळी लोकांची ही खासियत आहे. एकदा परक्या माणसाला आपली भाषा आली, की तो पार कुठलाही कोणत्याही गाव-कुळ-धर्माचा असू, ती त्याला कधीच परका ठेवत नाहीत. थेट आपल्या कुळातला माणूस म्हणून जीव लावतात. आजही ती तामिळ सिरीयल, शो होस्टिंग आणि मालिकांमध्ये काम करतेय. त्याच्यासोबत राजकारणात उतरूनही तिनं धुराळा गाजवलाय.

आजही तामिळनाडूच्या दर गावात वाफाळलेल्या इडल्यांचा हॉट खुशबू इडली ब्रॅण्ड फेमस आहे. लोकांनी तिच्यासारखी वाटणारी इडली कशी बनवावी ह्याचे युट्युब चॅनल सुरु केल्यात.

इथवर समजून घेईल कुनीपण. तिच्या अदांनी घायाळ; झालेल्या काहींनी तिच्या प्रेमात तिच्यावरून एक नव्या देवीची निर्मिती केली आणि तिचं नाव ठेवलं –

खुशाम्बिका! एका मुसलमान बाईवरून तिच्या हिंदू चाहत्यांनी नवीन देवी तयार करणं – भिडू, भारतात सिनेमा काहीही करू शकतोय…!

ह्या खुशाम्बिका देवीच्या नावानं लोकं नवस करायला लागले, तिच्यासाठी दक्षिण, पैसे,आरत्या आणि भक्तिपर भजनं सुरु झालं. बास – खुशबूनं भडका घेतला आणि तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली शहरात तिच्या नावाचं देऊळ उभारलं गेलं… दत्त-दत्त!

आजपर्यंत भारतीय सिनेमाच्या इतिहासात देऊळ उभारली गेलेली पहिली आणि एकमेव हिरोईन आहे खुशबू… दस्तुरखुद्द जयललिता ह्यांनाही हे सौभाग्य लाभलेलं नाही.

जेव्हा हि गोष्ट कळली तेव्हा खुशाम्बिका देवींची प्रतिक्रिया होती,

” हे एकूण सगळं बघून जास्त भीती वाटली. मला आश्चर्य वाटलं तर खरं पण भीतीच लै वाटली.”

ह्या देवळात तिची रोजच्या रोज अभिषेक घालून पूजा होते. दुपारची आणि संध्याकाळची आरती घ्यायला वेगळी वर्गणी जमा करायला लागते. देवळाबाहेर तिच्या नावाच्या दीपमाळा लागतात, नारळ फोडले जातात आणि नवस चढवला जातो.

रीतसर आरतीनंतर तिच्या नावाने प्रसाद वाटलं जातो आणि त्यासाठी भक्तांची झुंबड उडते. “खुशबू फॅन असोसिएशन” चे अध्यक्ष आणि ट्रस्टी आपल्या संस्थेकडून देवळाबाहेर अनेक उपक्रमांचे आयोजनही करतात… दत्त-दत्त!

ती स्वतः आपल्या ह्या खुशाम्बिका मंदिरात कधीच अली नाही कारण ती नास्तिक आहे.

अल्लाहची प्रार्थना करतांना आपलं देऊळ होईल हे तिला माहित नव्हतं, पण तिनं नंतर कुठलाच धर्म मानायला नकार दिला आणि आता ती कट्टर नास्तिक आहे. ती स्वतः एका देवळात चप्पल घालून देवीशेजारी खुर्चीवर बसली होती त्यामुळं मोठा वाद उद्भवला होता.

असंच राम-हनुमान ह्यांचे फोटो असलेली साडी घालून आल्यानं तिला जीवे मारून टाकण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. साक्षात खुशाम्बिका देवीला दुसऱ्या देवाचे भक्त धमक्या देताना बघून तिच्या फॅन आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये मारामाऱ्या झाल्या होत्या. दरवेळी “मला खुशबू साडी घ्यायची” म्हणणाऱ्या पोरीही आता तिला टरकून असतात.

तिनं धर्म सोडूनही अनेक मुस्लिम संस्था तिला इफ्तार पार्ट्यांमध्ये बोलवत असतात. एड्स विषयी जनजागृती करणाऱ्या एका कार्यक्रमातही “लग्नाआधी संबंध असण्यात काहीच वाईट नाही फक्त मुलींनी योग्य ती सुरक्षितता बाळगली पाहिजे” असं तिनं म्हणताच तिचे खुशाम्बिका देवीचे भक्तही खवळले आणि काहींकनी तिच्या मंदिराचीही तोडफोड केली.

जयललिता यांनीही “हा तामिळ संस्कृतीच्या विरोधातला कट” म्हणून तिच्यावर हमला केला. लोकांनी रस्त्यावर तिचे पुतळे जाळले.

तिच्याविरुद्ध डजनांनी पोलीस केसेस नोंदवण्यात आल्या. तिने ह्या केसेस काढून घेण्यासाठी केलेलं अपिलही कोर्टाने फेटाळलं आणि मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश केजी बाळकृष्णन ह्यांनी तर तिच्यावर थेट निशाणा साधला

“तिनं बोललेलं वाक्य सहन करणं अवघड आहे. तिनं कोणताच गुन्हा केला नाही, हे आम्ही कधीच मान्य करणार नाही.”
शेवटी सुप्रीम कोर्टाने ह्यात हस्तक्षेप केला आणि तिला सगळ्या गुन्ह्यांमधून मुक्त करण्यात आलं.

ह्या सगळ्या लव्ह-हेटशी तिला काहीच देणंघेणं नव्हतं. तिनं मिळालं तेव्हडंही फेम कधी अपेक्षित ठेवलं नव्हतं, त्याच्यामुळं ह्या  सगळ्याचाच तिच्यावर शून्य परिणाम झाला. आपली घोडदौड तिनं सुरूच ठेवली. लोकांच्या नजरेत गुड गर्ल – बॅड गर्ल खेळणं तिला कधीच जमत नाही. ती सगळं काही आपल्या मर्जीनं करत असते.

फिल्मी करियर उतरणीला लागल्यावर 2010 साली तिनं करुणानिधी यांच्या डीएमके पक्षात प्रवेश केला. 2014 साली तिनं द्रमुक सोडताच राहुल गांधी यांची भेट घेतली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आत्ता 12 ऑक्टोबर 2020 ला तिनं अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्याच दिवशी आश्चर्यकारकरित्या भाजपात प्रवेश केला.
येत्या निवडणुकीत त्या आमदार होतील का, बघू तेव्हाच. पण आज ह्या खुशबूचा परिमळ भारतखंडात बहरत चाललाय हे नाकारण्यात पॉईंट नाय!
Leave A Reply

Your email address will not be published.