केईएम हॉस्पीटलला ज्या ब्रिटीश राजाचे नाव आहे त्याला भारतात विष्णूचा अवतार मानायचे..

एडवर्डियन म्हणून ब्रिटनच्या इतिहासात सर्वात मोठा सुवर्णकाळ येऊन गेला. या काळात ब्रिटिश साम्राज्याचा जगभरातला पाया पक्का झाला. सर्वदूर ब्रिटिश साम्राज्याची कीर्ती पसरली. कोणत्याही लढाईत ब्रिटिशांचं नुकसान झालं नाही आणि समृद्धी भरभराटीस लागली.

तरीही या राजाला मानणारे ब्रिटिश नागरिक क्वचितच असतात.

भारतीयांनी मात्र एकेकाळी आपला सम्राट असणाऱ्या या राजाला कधीच पारखं केलं नाही आणि अजूनही त्याच्या स्मृती जपून ठेवल्या आहेत.

इंग्लंडमध्ये प्लेबॉय म्हणजेच विषयलंपट म्हणून हिणवला जाणारा हा राजा, पण त्यांचं नाव अजूनही नकळत तुमच्या प्रत्येकाच्या तोंडी असतं.

हा राजा म्हणजे किंग एडवर्ड सातवा

युनायटेड किंग्डमचा राजा आणि भारताचा सम्राट अशी उपाधी तो आपल्या नावापुढं लावत असायचा.

२२ जानेवारी १९०१ पासून ते आपल्या मृत्यूपर्यंत (१९१०) हा भारताचा सर्वेसर्वा म्हणून जगभर ओळखला जाई. इथल्या तत्कालीन शाळांच्या प्रार्थनांमध्ये मुले सकाळ संध्याकाळ त्याच्या नावाने प्रार्थना करत. तत्कालीन भारतातही हाच प्रघात होता.

त्याला इथल्या लोकांनी विष्णूचा अवतार समजून भरभरून प्रेम केलं. यात ब्रिटिश हुकूमशाहीचा भाग होताच आपण आपल्या राजावरील श्रद्धाही त्याला कारणीभूत होती. भो सप्तम एडवर्ड म्हणून त्याची गायली जाणारी प्रार्थना तेव्हा चिरपरिचित होती.

एडवर्ड सातवा हा राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट यांचा सगळ्यात थोरला पोरगा होता. वेल्स या इंग्लंडच्या भागाचा सर्वाधिक काळ राजपुत्र म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. ६० वर्षे त्यांनी आपली ही उपाधी सांभाळली.

राणी व्हिक्टोरिया हिने साम्राज्यावर दीर्घकाळ राज्य केल्यामुळे एडवर्ड सातवा राजगादीपासून बराच काळ वंचित राहिला.

कारभाराची जबादारी नाही आणि घरातही सर्वांचं पाडून पाहणं यामुळं एक राजा म्हणून त्याची जडणघडण अपुरीच राहिली. त्यामुळं तो भोगविलास आणि जीवाची ऐश करण्याकडं वळाला. युरोपात फॅशन करावी ती एडवर्डनंच असा वाक्यप्रचारच तेव्हा रूढ झाला होता. त्यामुळं जगभर फिरून इंग्लंडच्या नावे जगभर फिरायचं आणि राजेपणा मिरवायचा एवढंच त्याच्या हाती उरलं. एडवर्ड सातवा तेवढं काम इमानेइतबारे करायचा.

त्यामुळं अमेरिकेवर इंगलंडचं राज्य असताना त्याने काढलेले दौरे आणि भारतात हत्तीवरून मारलेल्या रपेटी जगभर प्रसिद्ध झाल्या. पण हा गाडी शेवटपर्यंत आपल्या आईचा विश्वास जिंकू शकला नाही.

त्यामुळं आपल्या लाडक्या राणीच्या प्रभावाखाली असणारी लोकं त्याला तिकडं अजूनही प्लेबॉय म्हणूनच ओळखतात.

२६ सप्टेंबर १८७५ साली एडवर्डनं तब्बल आठ महिन्याचा प्रचंड मोठा दौरा काढला.

इंग्लंडच्या राजघराण्याला एवढ्या प्रचंड दौऱ्यांची सवय नव्हती. युरोप वगळता ते लोक क्वचितच इतर ठिकाणी जात. भारत तेव्हा जेवेल इन द क्राऊन म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या मुकुटातील शिरोमणी म्हणून ओळखला जात असे.

१८५७ च्या उठावानंतर भारताचा कारभार राणीने हातात घेतला होता मात्र ब्रिटिश घराण्याचे भारताकडे दुर्लक्षच होते. साम्राज्याचा प्रचंड मोठा बोजा भारतीयांच्याच खांद्यावर होता. भारताची वेगळी अशी कोणतीही ओळख नव्हती आणि ब्रिटिशांची सर्व वसाहतींसारखी वसाहत म्हणून देशाकडं पाहिलं जाई.

सातव्या एडवर्डनं ही परिस्थिती लक्षात घेतली आणि आपल्या प्रजेच्या भेटीसाठी तो या दौऱ्यावर निघाला. तेव्हा भारतीयांसोबत ब्रिटिश नागरिक आणि सैनिक तुसडेपणाने वागत. त्याने आपल्या सैनिकांना असं न करण्याची सक्त सूचना देऊन ठेवली होती.

“समोर येणाऱ्या माणसाच्या कातडीचा रंग त्याचा धर्म आपल्याहून भिन्न आहे हे काही माणसाला तुसडेपणाने वागवण्याचं कारण होऊ शकत नाही”

असं त्यानं आपल्या सोबत असणाऱ्या सर्व लोकांना ठामपणे बजावलं होतं.

लॉर्ड सॅलिसबरी तेव्हा भारताचे सम्राटनियुक्त सेक्रेटरी होते. सातव्या एडवर्डच्या या आदेशाचं उल्लंघन करून भारतीयांना हीनपणे वागवणाऱ्या काही लोकांना सॅलिसबरी सायबांनी तात्काळ कामातून बरखास्त केलं होतं.

अर्थात हा चांगुलपणा राजा भारतात स्वतः असेपर्यंतच टिकून होता.

त्याच्या या दौऱ्यामुळं भारतात त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्याचा वाढत असलेला प्रभाव बघून कदाचित भारताच्या वाट्याला एखाद्या वेगळ्या राजेपदाची शक्यताही तयार होऊ लागली होती. आणि आपल्या मुलाच्या हातात त्याचा कारभार जाऊ नये असं त्याच्या आईला म्हणजेच व्हीक्टोरिया राणीला मनोमन वाटत होतं.

त्यामुळं भारताचा सवतासुभा एडवर्डला द्यावा लागू नये म्हणून तिने “भारताची सम्राज्ञी” हे बिरुद आपल्या नावापुढं लावायला सुरुवात केली. एडवर्डला या गोष्टींचा जास्त फरक पडला नाही आणि आपल्या दौऱ्याचं हेच यश मानून त्यानं आपला नेहमीच उद्योग सुरु ठेवला.

तिच्या मृत्यूच्या दिवशी २२ जानेवारी १९०१ साली एडवर्डला ब्रिटिश साम्राज्याचा राजा आणि भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आलं.

आपलं नाव राजा म्हणून लागण्यासाठी त्याच्यापुढं दोन पर्याय होते. स्वतःला किंग अल्बर्ट एडवर्ड म्हणून बापाचं नाव लावणं. आणि दुसरा म्हणजे सहाव्या एडवर्डनंतर सातवा म्हणून लिहीणे. सर्व जनतेच्या मते त्यानं बापाचं नाव लावणं अपेक्षित होतं. पण त्याला धक्का देत त्यानं आपल्या नावापुढं सातवा म्हणून लिहीणे पसंद केलं. त्याच्या बापाच्या मृत्यूसाठी त्याची आई त्याला शेवटपर्यंत जबाबदार मानत होती.

त्यानं लोकांना स्पष्ट सांगितलं,

“माझ्या वडिलांची कीर्ती मोठी होती. माझ्यामुळं त्यांच्या नावाला बट्टा लागू नये इतकीच माझी रास्त अपेक्षा आहे. त्यामुळं माझं नाव त्यांच्यापासून सुटं राहणंच चांगलं!”

अशा प्रकारचा हा करारी राजा होता. त्यानं लोकांनी दिलेल्या शिव्याही भूषणं म्हणून मिरवली. तो लोंकांमध्ये सगळ्यात प्रसिद्ध झालेला इंग्लंडचा शेवटचा राजा होता पण तितकाच बदनामही होता.

त्याला देशातील लोकांनी ग्रँड कमांडर ऑफ इंडियन एम्पायर ही पदवी देऊ केली होती. त्यांना भारतातील ब्रिटिश सत्तेकडून सतत सहकार्य लाभले.

त्यांच्या स्मृतीनिमित्ताने भारतात अनेक उद्याने, दवाखाने आणि स्मारकं उभारली गेली. मुंबईत स्थापन झालेलं केईएम अर्थात एलन सगळे ज्याला केम हॉस्पिटल म्हणून ओळखतो तेही याच राजाच्या स्मृतीमध्ये बांधण्यात आलं होतं.

म्हणूनच त्याला किंग एडवर्ड मेमोरियल म्हणून ओळखलं जातं.

त्यांच्या निधनानंतर पुण्यातही १९१२ साली लोकांच्या आणि सरकारी मदतीतून जिल्हा कलेक्टरच्या मुख्यालयाजवळ ४ खाटांचे छोटेखानी प्रसूतिगृह आणि रुग्णालय उभारण्यात आलं. नंतर त्याचा प्रचंड विस्तार झाला. त्यालाही किंग एडवर्ड मेमोरियल नाव दिलं गेलं आहे.

याचाच कित्ता गिरवत मुंबईतही १९२६ साली राजा एडवर्ड सातवे स्मारक रुग्णालय उघण्यात आले. १९१९ साली बंगलोरच्या राणीच्या बागेत एडवर्ड यांचा पुतळा उभारण्यात आला. आजही हा पुतळा या परिसराची ओळख बनून राहिला आहे.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Ganesh Godik says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.