ज्यांच्यामुळे ममता बॅनर्जी उपोषणाला बसल्या आहेत ते राजीव कुमार आहेत तरी कोण ?

रविवारी रात्री कोलकत्ता शहरात राड्यास सुरवात झाली. सर्वसाधारण आपण जो राडा पाहतो तो सोडवण्यास पोलीस येत असतात. पण इथला राडा वेगळा होता. इथे पोलीसच राडा घालत होते. त्यातही काही विशेष वाटत नसेल तर विशेष सांगतो,

हा राडा CBI विरुद्ध कोलकत्ता पोलीस असा होता. 

आत्ता कोलकत्ता पोलीस भारतातल्या इतर राज्यांहून वेगळे आहेत हे आपणास ड्रेसपासूनच समजत. म्हणजे भारतातल्या ठिकठिकाणच्या राज्यात पोलीस खाकीत असतात. इथले पोलीस पुर्णपणे पांढऱ्या ड्रेसमध्ये असतात. कदाचित या कारणामुळे इथले पोलीस नेतेगिरी करत असावेत असा संशय येवू शकतो पण इथला मॅटर जरा वेगळा आहे. त्याच सत्ता कोणाची पण असो CBI पिंजऱ्यातला पोपट झाला आहे अस अधूनमधून आपणाला ऐकू येत असतं. मध्यंतरी केंद्रात जो राडा सुरू झाला त्यातून CBI च्या पोपटपणावर शिक्काच बसला. आत्ता काल सुरू असलेल्या राड्यामुळे या CBI वर वेगवेगळ्या राज्यातून शिक्के मारण्यास सुरवात झाली आहे. 

असो, पार्श्वभूमी म्हणून प्रचंड गप्पा मारल्या आत्ता मुद्यावर येवू. तर मुद्दा असा आहे की, काल रात्री CBI वाले कोलकत्ताचे कमिश्नर राजीव कुमार यांच्या घरी धाड मारण्यासाठी आले. आजपर्यन्त CBI म्हणल्यानंतर गप्पगुनाने पोलीस देखील त्यांना शरण जात असायचे. पण इथे वेगळं कांड झालं. इथे पोलीसच CBI ला शेक्सपीयर सारणी ठाण्याला घेवून गेले. या प्रकरणात बाचाबाची झाली. काहीजण म्हणतात हाणामारीपण झाली. CBI ला ताब्यात घेण्याचं काम करण्यात आलं. आणि राजीव कुमार यांच्या सपोर्टसाठी थेट ममता बॅनर्जी त्यांच्या घरी आल्या. एक मिटींग लावून आज रात्रीच उपोषणाला बसण्याचा प्लॅन करण्यात आला. आणि काल रात्री धर्मतल्ला येथे स्टेज मारून ममतादिदि उपोषणाला बसल्या. 

मुख्यमंत्री थेट उपोषणाला, तेही एका कमिश्नरला वाचवण्यासाठी. देशभरातल्या प्रादेशिक पक्षांनी व विरोधी पक्षाने ममतांना पाठिंबा जाहिर केला. वकिलांनी केंद्र राज्य संबधावर चर्चा करण्यास घेतल्या तर इकडे पेठेतल्या पोरांनी लक्ष्मीकांत काढून पुन्हा एकदा केंद्र राज्य संबधांवर चर्चा करण्यास सुरवात केली. 

इथपर्यन्त झाला तो सगळा राडा, आणि प्रश्न पडला असं काय खास आहे त्या पोलिस कमिश्नर यांच्यात आज CBI आणि ममता,

केंद्र आणि राज्य या सगळ्या प्रकरणाचं मुळ असणारे राजीव कुमार आहेत तरी कोण ? 

राजीव कुमार IIT मधून कॉम्पुटर सायन्स झाले आहेत. त्यानंतर UPSC पास होवून ते IPS झाले. IIT मधून कॉम्प्युटर इंजिनिरींग असल्याचा बेस त्यांनी पोलीस सेवेत वापरला. आपल्या हूशारीचा वापर करुन मोठमोठे गुन्हे शोधून काढले. प. बंगाल केडर मिळालेले राजीव कुमार बंगालमध्ये त्यांच्या शोधमोहिमेमुळे ओळखले जातात. 

१९८९ साली ते IPS झाले. प.बंगाल केडर मिळताच त्यांना पहिली सर्वात मोठ्ठी कारवाई केली ती कोळसा माफियांवर. कोळसा खाण माफियांवर कारवाई करण्याचं धाडस कोणामध्येच नव्हतं. प. बंगालच्या इतिहासात हि कारवाई करण्यात आली नव्हती. ते काम राजीव कुमार यांनी केलं. आत्ता ज्यांना वाटू शकतं यात काय विशेष त्यांनी गॅंग ऑफ वासेपुर पहावा. 

राजीव कुमार यांनी आपले फोन रेकॉर्ड केलेत असा आरोप खुद्द ममता बॅनर्जी यांनीच त्यांच्यावर केला होता. तर वर्तमानपत्रांमध्ये पदाचा फायदा घेवून ते सरकारच्या समर्थनात असतात असे आरोप करण्यात येत होते. पण राज्यात ममता बॅनर्जी यांच  सरकार आलं आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खास म्हणून त्यांना ओळखण्यात येवू लागलं. 

२०१६ साली त्यांना कलकत्ताचे कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याअगोदर २०१३ साली राज्यात शारदा चिट फंड समोर आला होता. राज्याने शारदा चिट फंडची चौकशी करण्यासाठी SIT नियुक्त केली. या स्पेशल इंन्विस्टिगेशन टिमचे प्रमुख होते राजीव कुमार.

२०१४ साली शारदा चिट फंड घोटाळा CBI च्या ताब्यात देण्यात आला. सुरवातीची तपासणी राजीव कुमार यांच्या हातात असल्याने त्यांनी बरीचशी माहिती मिळवली. पण ती CBI च्या ताब्यात केस आल्यानंतर CBI कडे सोपवण्यात आली नाही अस  CBI द्वारे सांगण्यात आलं. त्याच माहितीसाठी त्यांनी कमिश्नर राजीव कुमार यांची चौकशी करण्यात येणार होती. त्यासाठी CBI त्यांच्या घरी गेले आणि राड्यास सुरवात झाली. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.