संसदेत सगळ्यात पहिल्यांदा मराठी गाजवली ती क्रांतिसिंह नाना पाटलांनी !

निवडणुका झाल्या की आपल्याकडे शपथविधी ,भाषण सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहाने बघितला जातो. कोण खासदार, आमदार निवडून आले, कुठल्या भागातले, राज्यातले प्रतिनिधी म्हणून ते आलेत अशा अनेक प्रश्नांना तेव्हा वाचा फुटते त्याचसोबत शपथविधी मध्ये तो प्रतिनिधी कोणत्या भाषेत शपथ घेतो, भाषण कोणत्या भाषेत करतो हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असतं. जेव्हा जेव्हा खासदार, आमदार मराठीतून शपथ घेता किंवा भाषण करता तेव्हा मातृभाषेतील लोकांची कॉलर आपोआपच ताठ होते.

आताच्या काळातल्या निवडणुकांमध्ये हे खूप महत्त्वाचं समजलं जातं पण

सगळ्यात आधी संसदेमध्ये मराठीतून भाषण केलं होतं ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी

स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे नाव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील. सातारा, सांगलीसारख्या शहरांमध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.

सांगली जिल्ह्यातील येडमच्छिंद्र या मूळ गावीच ३ ऑगस्ट १९०० रोजी नाना पाटलांचा जन्म झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा हे तालुक्याचे गाव खूप आवडत असल्याने ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले.

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला.

नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम नानांनी केले. नानांनी आपल्या भाषणांद्वारे ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. स्वातंत्र्यलढा म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे हे गावागावात पोहचवण्याचे काम क्रांतीसिंहांनी केले.

आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात.

सरकारतर्फे हेरगिरी करणाऱ्यास तसेच जबरीने सारा वसूल करणाऱ्या पाटील-तलाठ्यांस पायांवर काठीचे तडाके मारण्यात येत आणि पत्रेही ठोकण्यात येत. यावरून त्यांच्या या प्रतिसरकारला पत्रीसरकार हे नाव रूढ झाले होते.

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना करण्यात आली होती. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना , पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. त्यामुळे सामान्यांचा या प्रतिसरकारवर विश्वास बसू लागला.

१९४२ ते ४६ या चार वर्षाच्या काळासाठी नाना भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली.

सरकारी बँका, पोस्ट व तारखाते, पोलीस ठाणी यांवर छापे घातले. ब्रिटिश सरकारने नाना पाटलांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. जेलवारी करून ,तुरुंगवास भोगून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भूमिगत असलेले नाना लोकांच्या मदतीला धावून आले.

एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते असलेल्या नाना पाटलांनी स्वातंत्र्यानंतर विचारधारेची सर्व पदांचा त्याग करत काँग्रेस सोडली. शेकाप, प्रजा समाजवादी, संयुक्त महाराष्ट्र समिती यांच्या माध्यमातून डाव्या विचारांचं राजकारण केलं.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी नाना पाटील सातारचे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र १९६२ साली मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या विरुद्ध त्यांचे साथीदार किसन वीर यांना काँग्रेसचं तिकीट दिल व तब्ब्ल एक लाख मतांनी निवडून आणलं.

नाना पाटलांची लोकप्रियता अफाट होती. अस्सल ग्रामीण ढंगात कडाडणारी त्यांची भाषणं संपूर्ण राज्यभरात गाजायची. मात्र पैशांचं व सत्तेचं पाठबळ नसल्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव होत होता. नाना पाटलांसारखी मुलुखमैदान तोफ लोकसभेत असावी ही कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. म्हणूनच त्यांना बीड मधून तिकीट देण्यात आलं होतं.

१९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते. आपल्या प्रभावी वक्तृत्वाचा मोठा उपयोग नानांनी करून घेतला.

क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले. आजही क्रांतिसिंह नाना पाटलांचं अनेकांना आणि उभ्या महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.