कुलभूषण जाधवांच संपुर्ण प्रकरण आपण समजून घ्यायला हवं..

2016 साला पासून कुलभूषण जाधव हे नाव चर्चेत आहे आणि नुकताच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या खटल्यात महत्वाची सुनावणी केलेली आहे तर नेमकं कुलभूषण जाधव कोण आहेत? त्यांचं प्रकरण काय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांचा विषयी सुनावणी हे सर्व मुद्दे या लेखातून स्पष्ट होतील.

कोण आहेत कुलभूषण जाधव ?

कुलभूषण जाधव हे मूळचे महाराष्ट्रातील साताऱ्याचे आहेत.1987 मध्ये राष्ट्रीय रक्षा अकादमीत प्रवेश घेतला आणि 1991 पासून भारतीय नौदलात दाखल झाले. 14 वर्षाची सेवा झाल्या नंतर त्यांनी अकाली सेवानिवृत्ती घेतली आणि सेवानिवृत्ती नंतर त्यांनी इराण मध्ये आपला व्यवसाय सुरू केला.

2016 रोजी पाकिस्तानने हेरगिरी आणि दहशतवादाचे कलम लावून अटक केले.

नेमकं प्रकरण काय ?

3 मार्च 2016 रोजी पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, बलुचिस्तान येथे कुलभूषण जाधव हे भारताची गुप्तहेर एजेंसी म्हणजे ‘रिसर्च एंड एनालिसिस विंग (रॉ) चे कर्मचारी आहेत. म्हणून त्यांच्यावर हेरगिरी आणि दहशतवादाचे कलम लावून अटक करण्यात आली.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हणणे आहे की, इराणमधून कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात आले होते.

अटक केल्याच्या 22 दिवसांनंतर, 25 मार्च 2016 ला भारतीय दूतावासाला या प्रकरणाची माहिती दिली. आणि फक्त एक महिन्याच्या आत कुलभूषण जाधव यांची बाजू न ऐकून घेता पाकिस्तानच्या मिल्ट्री कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सूनवल्यानंतर भारताने तीन आठवड्यात आतंरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मे महिन्यात न्यायालयाने आदेश दिला की पुढची सुनावणी होत नाही तो पर्यन्त कुलभूषण जाधव यांच्या फाशी वर स्थगिती आणण्यात यावी.

वारंवार राजकिय मदत देण्यास नकार देणाऱ्या पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतानं पुन्हा ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात या बाबी मांडल्या. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा आरोप होता की पाकिस्तानने ‘व्हिएन्ना कराराचं उल्लंघन’ केलं आहे.या कराराच्या कलम 36 नुसार, व्हिएन्ना करार स्वीकारलेल्या सर्व देशांना एखाद्या देशाने दुसऱ्या देशाचा नागरिक पकडला किंवा त्याला अटक केली, तर अटकेतील व्यक्तीला संबंधित देशाचा राजनैतिक अधिकार अर्थात (consular access) देणे. शिवाय अटकेतील नागरिकाच्या देशालाही राजनैतिक अधिकाराचा मार्ग खुला करणे.

पण कुलभूषण जाधवच्या सुनावणीत पाकिस्तान मिल्ट्री कोर्टाने कुठल्याही प्रकारचा Consular access दिलेला नव्हता.

म्हणून भारताची ही मागणी होती की, खोट्या आरोपावर आणि चुकीच्या पद्धतीने कुलभूषण जाधव यांना पकडण्यात आले आहे आणि म्हणून त्यांना लवकरात लवकर सोडण्यात आले पाहिजे.

या सर्व आरोप आणि मागण्यांवर आतंरराष्ट्रीय न्यायालयाने 17 जुलै 2019 रोजी अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्याने भारताला मोठा दिलासा मिळाला.

पाकिस्तानची अपमानास्पद वागणूक !

भारताच्या हालचालीमुळे पाकिस्तानवर आतंरराष्ट्रीय दबाव तयार झाला होता आणि त्यामुळे कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला आणि आई ला त्यांना भेटण्यासाठी संधी मिळाली होती. पण पाकिस्तानने मात्र त्यांच्या कडून खूप सक्ती दाखवली.

कुलभूषण जाधवांच्या पत्नी व आईला हातातील बांगड्या, टिकली व इतर आभूषणे काढायला लावले होते. शिवाय त्यांना मराठीत बोलू दिलं जात नव्हतं. हिंदीची सक्ती करून त्यांच्या संपूर्ण संभाषणाचे चित्रीकरण करण्यात आले होते.

जाधव यांच्या आईने जाधव यांनी मुलासाठी भेटवस्तू आणली होती, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ती भेटवस्तू कुलभूषण यांना दिली नाही.

आंतराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल,जाधव यांना दिलासा !

16 न्यायाधीशांच्या पीठाने 17 जुलैला 2019 रोजी महत्त्वाचा निकाल दिला त्यात भारताचा 15 विरुद्ध 1 असा मोठा विजय झाला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालातील प्रमुख मुद्दे.

१) कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली.

२) आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना “काउन्सिलर अॅक्सेस” मिळाला. 

३) कुलभूषण प्रकरणी भारताने पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिलेले आव्हान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येते, हे न्यायालयाने स्पष्ट केले.

४) आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे मान्य केलं की पाकिस्तानने “व्हिएन्ना कराराचं” उल्लंघन केलं आहे.

५) जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार पाकिस्तान जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत कुलभूषण यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित राहिल.

16 न्यायाधीशांपैकी 15 न्यायाधिशांनी वरील निकालावर होकार दिला, ज्या 1 न्यायधीशने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या स्थगितीच्या विरोध केला ते न्यायाधीश पाकिस्तानचे आहेत.

पुढे काय…?

कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेप्रकरणी त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा नव्याने या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता असून, जाधव यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. 17 जुलै च्या निकालानंतर त्यांना “काउन्सिलर अॅक्सेस” मिळाला हा भारताचा मोठा विजय आहे.

  • बोधी रामटेके (आय.एल.एस विधी महाविद्यालय,पुणे) 7721867881

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.