५०० रुपयांच्या हिमतीवर ५०० फ्रँचायझीचं स्वप्न पहाणारा ब्रॅण्ड या पोराने उभारून दाखवला

शिवजयंती असो की गणेशोत्सव कोणताही कार्यक्रम असला की आपल्या गल्लीत अनेक उत्साही कार्यकर्ते स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेऊन राबत असतात. असाच एकजण शिवजयंतीची वर्गणी गोळा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये गेला. त्यांची पूर्वी पासूनची ओळख होती.

कार्यकर्त्याला वाटले आपल्याला मोठी वर्गणी मिळेल पण झालं उलटंच.

प्रवीण गायकवाड त्याला म्हणाले,

“तू कधी तर वर्गणी गोळा करणाऱ्या पेक्षा वर्गणी देणारा हो. आज तू घरचे आई वडिल जरी व्यवस्थित सांभाळले तरी ते शिवाजी महाराजांसाठी मोठं कार्य आहे. तू आधी आर्थिक सक्षम हो.”

त्यांनी वर्गणी तर दिली नाहीच मात्र त्यांचे हे जळजळीत शब्द त्या तरुणाचे डोळे उघडणारे ठरले. त्याचं आयुष्य बदललं ते त्या घटनेनंतरच.

त्या तरुणाचे नाव राहुल पापळ.

एका आईस्क्रीम कंपनीत ते सेल्समनचा जॉब करायचे. वडीलांच्या पश्चात धुणी-भांडी करून आईनं त्यांना व त्यांच्या भावंडांना लहानाचं मोठं केलं होतं.

राहुल आपल्या नोकरीच्या ठिकाणी मेहनत जबरदस्त करत होते पण पगार तेवढा मिळायचा नाही. शिक्षण सुद्धा कमी.

सलग ४२ आठवडे सेल्समध्ये टॉपर राहिल्यावर त्यांना आईस्क्रीम कंपनीत मार्केटिंग हेड बनवण्यात आलं होतं. आठ कोटींचा टर्नओव्हर १३ कोटी पर्यंत नेऊन दाखवला होता. पण अजून घरच्यांना चांगले दिवस दाखवायचं स्वप्न मागेच राहिलं होतं.

आपण आपलं आईस्क्रीम बनवून ते चांगल्या क्वालिटीच्या जोरावर याच्याही पेक्षा जास्त खपवू शकतो हा त्यांना आत्मविश्वास मिळाला होता. बरी चाललेली नोकरी सोडून दिली. व्यवसाय करायचा पण घरी सांगायचं कसं हा प्रश्न होता.

राहुल यांनी सुरवातीला बायकोला नोकरीचा राजीनामा दिलाय हेच सांगितलं नव्हतं. रोज डब्बा घेऊन घरून निघायचे, फॅक्ट्रीची जागा, त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव, लोकांना काय आवडेल याचा रिसर्च हे सगळं चालू होत. काही मित्र त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

अवघ्या पाचशे रुपये भांडवलावर व्यवसाय सुरु केला.

पण सुरवातीचे पाच वर्ष जम बसवण्यात गेले. मार्केटमध्ये असणारे आईस्क्रीम पुन्हा आणण्यात काहीही अर्थ नव्हता. आपल्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी वेगळेपण असावं याकडे त्यांचा भर होता. पण काय नेमकं वेगळं बनवावं हे सापडत नव्हतं. लहानपणीच्या एका आठवणीच्या खजिन्यात त्यांचा हा शोध थांबला.

कुल्फी.

शाळांना उन्हाळ्याची सुट्टी पडली की दुपारच्या वेळी एक लेंगा शर्ट घालणारा माणूस डोक्यावर टोपली घेऊन आईस्क्रीम विकायला यायचा. त्यात लाल कापड सारलं की मटक्यात खव्याची खास चव असणारी कुल्फी असायची. इतर आईस्क्रीमपेक्षा कुल्फीची खासियतच निराळी होती. पापळ यांनी याच कुल्फीला नव्या रूपात आणायचं ठरवलं.

घरातलं होतं नव्हतं ते सगळं गहाण ठेवलं आणि लाडाची कुल्फी हा ब्रँड उभा केला.

अनेकजण राहुल पापळ यांना विचारतात की लाडाची कुल्फी हेच नाव का ठेवलं तर ते सांगतात की,

माझ्या बऱ्याच मित्रांनी नंबर वन कुल्फी हे नाव सुचवलं होतं पण मला मराठीच नाव ठेवायचं होतं. नुकतीच मला मुलगी झाली होती. तेव्हा माझ्या डोक्यात लाडाची कुल्फी या नावाची कल्पना आली.

अगदी सुरवातीपासून या कुल्फीचे अठ्ठावीस फ्लेवर बनवले होते. सगळ्यांच्या लाडक्या लाल पेरूपासून ते डायबेटीस पेशन्ट साठी शुगर फ्री, महिलांना व लहान मुलांना व्हिटॅमिन मिळवून देणाऱ्या शतावरी फ्लेवर पर्यंत. लाडाची कुल्फी कुटूंबातल्या प्रत्येकाने बसून आस्वाद घेता यावा अशी असावी यावर राहुल यांचा भर होता.

कोणतेही कृत्रिम इसेन्स न वापरता अस्सल दुध, फळांचे पल्प दर्जेदार कुल्फी बनवली. आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या त्यांच्या आईने राहुल यांना एकच सांगितलं होतं,

“बाळा कोणाला फसवू नको. तू जे प्रॉडक्ट बनवतोयस ते लोकांच्या पोटात जाणार आहे. त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे व्यवसाय कर. एक दिवस तुझ्याकडे लाईन असेल. “

हे अगदी खरं झालं. दोन वर्षांत दीडशे शाखा झाल्या आणि आता पाचशेपर्यंत शाखा काढाव्यात अशी मागणी होत आहे. राहुल यांच्या व्यवसायाने भरारी घेतली तरी त्यांची माउली हार बनवण्याचा काम करत होती.

मुलांनी खूप सांगितलं पण तरीही त्यांनी हे काम सोडण्यास नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की मी जर काम करायचं थांबले तर आजारी पडेन.

राहुल यांनी त्यांना एक आईस्क्रीम आउटलेट उघडून दिलं आहे.

कष्टाच्या खुणा सांगणाऱ्या हातांना आता सुखाचे दिवस आले आहेत. राहुल यांच्या पत्नी खंबीरपणे त्यांची साथ देत आहेत. सीएची तयारी करणाऱ्या अक्षता कंपनीचा सगळा जमा खर्चाचा हिशोब समर्थपणे हाताळतात. या दोघांनी आपल्या डोक्यात येणाऱ्या कल्पना एकत्र अंमलात आणल्या. अक्षता यांची टापटीप, त्यांच्या डिझाइन्स या प्रत्यक्षात येईन लाडाची कुल्फीचा ब्रँड साकार झाला.  

तर राहुल यांची तीन वर्षांची मुलगी राजस ही लाडाच्या कुल्फीची ब्रँड अँबेसेडर आहे. निरमा, पारले अशा मॉडेल असतात तसे राहुल यांनी आपल्या मुलीलाच अँबेसेडर बनवले.

कात्रजला मुख्य फॅक्ट्री असणाऱ्या राहुल यांच्या शाखा आता पार बारामतीपर्यंत पोहचल्या आहेत. दुबई अनेक इंजिनियर देखील आपली नोकरी सोडून लाडाची कुल्फीची फ्रँचाइजी आपापल्या भागात टाकत आहेत.

हे कस काय शक्य आहे हे विचारल्यावर ते सांगतात,  

‘‘इंजिनिअर असूनही आम्हाला एका कंपनीत तीस ते चाळीस हजार रुपये मिळायचे. आता या व्यवसायातून महिन्याला लाखभर रुपये मिळतात.’’ 

एकेकाळी आठवी नापासचा शिक्का लागलेले राहुल पापळ फक्त स्वतःच व्यवसाय करून थांबले नाहीत तर अनेकांना रोजगार मिळवून दिला.

प्रविण गायकवाड यांच्याबरोबरच प्रमोद मांडे या गुरुंचा मोठा वाटा आहे. त्यांनी गडसंवर्धना साठी केलेलं कार्य तसेच पुढं चालावं म्हणून राहुल पापळ प्रयत्नशील आहेत. त्यांना लाडाची आईस्क्रीम मध्ये जेवढा फायदा होतो त्याच्या वीस टक्के नफा ते किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरतात.

आज आपला दर्जा आणि खास चव याच्या जीवावर लाडाची कुल्फी हा पुण्याच्या बाहेर देखील ओळखला जाणारा ब्रँड बनला आहे. कोरोनाच्या काळातल्या लॉकडाऊनचा ऐन उन्हाळाच्या सीझनवर प्रचंड मोठा फटका बसला तरी राहुल पापळ यांनी ठामपणे या संकटाला तोंड दिले. 

हे ही वाच भिडू 

           

Leave A Reply

Your email address will not be published.