दंगल ऐन जोमात असताना वंदनीय मावशी कराचीत हिंदू सेविकांना वाचवण्यासाठी गेल्या होत्या…

१४ ऑगस्ट १९४७ चा दिवस होता. लक्ष्मीबाई केळकर म्हणजे वंदनीय केळकर मावशी या कराचीला होत्या .सगळ्या पाकिस्तानात गोंधळ सुरू होता. पाकिस्तानातील सिंधमध्ये जाण्यासाठी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गोंधळ वाढला आणि लोकांचा गलबला सुरू झाला तेथील मुस्लिम लोकांनी हिंदू लोकांच्या कत्तली करायचा सपाटा लावला. आदल्या दिवशी अशा बातम्या भारतात येऊन धडकल्या होत्या पण कराचीला जाणार कोण यावर सगळं अडून बसलेलं होतं तेव्हा केळकर मावशी पुढे आल्या आणि कराचीला गेल्या.

राष्ट्र सेवक समितीच्या दोन तीन महिला वंदनीय मावशींच्या सोबत होत्या. विमानतळावर उतरताच खून से लिया पाकिस्तान , लढके लेंगे हिंदुस्थान अशा घोषणा सुरू होत्या पण केळकर मावशी न डगमगता आपल्या सेविकांसोबत कराचीत घुसल्या. पाकिस्तानातील सेविकांना धीर दिला. एका घराच्या गच्चीवर बाराशे सेविकांचे एकत्रीकरण झाले. मावशींनी सर्व सेविकांना धीर दिला आणि भारतातल्या प्रत्येक सेविकेचे घर तुमच्यासाठी उघडे आहे असा विश्वास दिला.

थोडक्यात लक्ष्मीबाई केळकर यांनी ओळख करून द्यायची झाल्यास

राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका, आद्य संचालिका, देशभर समितीचे जाळे उभारणाऱ्या ,देशभर प्रवास करणाऱ्या ,हिंदू स्त्रीला संघटित करून तिला राष्ट्रकार्यार्थ प्रेरित करणाऱ्या, सेविकांच्या पोषाखा पासून तर विचारसरणी पर्यंत तसेच वर्तनाबद्दल खोलवर विचार करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मावशी, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर.

मावशींचा जन्म ६ जुलै १९०५ रोजी नागपुरात झाला. भास्कर राव व यशोदाबाई हे त्यांचे माता-पिता .घरात राष्ट्रभक्तीचे वातावरण. घरात केसरीचे सामूहिक वाचन होत असे. महात्मा गांधींच्या भाषणाला त्या आपल्या जावेसोबत गेल्या होत्या. राष्ट्रकार्यासाठी उभारण्यात आलेल्या टिळक फंडात प्रत्येकाने मदत करणे आवश्यक आहे व प्रत्येकाने हातभार लावावा या गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मावशींनी आणि त्यांच्या जावेने गळ्यातल्या एकदाण्या झोळीत टाकल्या .त्यांनी स्वदेशीच्या चळवळीत भाग घेतला. पतिनिधनानंतर दोन मुली व सहा मुले यांची जबाबदारी नीट पार पाडली.

२४ ऑक्टोबर १९३२ च्या पुणे सकाळ मध्ये “स्त्रिया आणि स्वावलंबन’ हा लेख त्यांनी वाचला. त्या लेखात लिहिले होते की,” स्त्रियांनी केवळ चूल आणि मूल यापुरतेच जीवन मर्यादित न ठेवता सामाजिक जीवनही जगावे तसेच राजकीय व सामाजिक सुधारणांमध्येही भाग घ्यावा .” ते वाचल्यापासून मावशींच्या मनाला स्त्री प्रश्नांचा विचार करण्याचा छंदच लागला. मावशींची मुले संघात जात असत .त्यांचे खेळ ,कवायती, बौद्धिक चर्चा ,ऐकून या धर्तीवर महिलांचेही असेच संघटन असावे असे मावशींना वाटले. त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांची दोन-तीनदा भेट घेतली आणि संघाच्या धर्तीवर २५ ऑक्टोबर १9३६ ला विजयादशमीच्या दिवशी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली .

मावशींनी सेविकांना एक चतु:सूत्री दिली. (१) समाजातील अज्ञान दूर करणे .(२) सेविकांनी आपली गुणवत्ता वाढवणे. (३) आपली श्रद्धास्थाने बळकट करणे. (४) धर्मसंकल्पना स्पष्ट करणे.

अशी अनेक महत्वाची काम त्यांनी केली. 27 नोव्हेंबर1978 रोजी नागपुरात वंदनीय मावशी यांचं निधन झालं. मात्र आजही वंदनीय मावशींनी पेटवलेली क्रांतीची ज्वाळा त्यांच्या रणरागिनींमध्ये दिसून येते. पण वंदनीय मावशी यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या सेविकांना जे धीर देण्याचं आणि मायेचं काम केलं होतं ते आजही विसरलं जाऊ शकत नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.