भावाला आत्ता ऑक्सिजन सपोर्ट लागतोय, पण आपल्या एका पिढीला हातभार त्यानंच लावलाय…

एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय, केस, दाढी पिकलेल्या माणसाला ऑक्सिजनचा पाईप लावलाय, डॉक्टर म्हणतायत आजारपण जड आहे, आपला आणि त्या माणसाचा बांधाला बांध नाही, पण कुठं ना कुठं जीव हळहळतोय… कारण माणूस आहे ललित मोदी.

ललित मोदीमुळं लास्ट टाईम वाईट वाटलेलं कारण गडी सुश्मिता सेनला डेट करतोय.

हा गडी तिच्यापेक्षा १० वर्ष मोठाय. त्याचा चेहरा बघून कळतंय की गडी म्हातारा झालाय, तरीही का ?

आता तेव्हा दुःख झालं होतं, त्या दुःखाच्या भरात ललितला मिर्झापूर आठवून टोचण्याही दिल्या. पण मग आठवलं एक जमाना होता जेव्हा हा ललित मोदी आपल्यासाठी महापुरुष होता.

मध्यंतरी राज कुंद्रा हॉटशॉट, फ्लिज बिझ सारख्या कुठल्या कुठल्या चॅनेलचा मालक असल्याची बातमी कळाल्यावर लोकांनी कोण कुठला कुंद्रा त्याला माया फुटली म्हणत कुंद्राला डोक्यावर घेवून नाचून पण झालं. 

पण कुंद्राचा मुळपुरुष कोण होता आणि तो आपल्या पिढीसाठी किती मोठ्ठा होता ते सांगणं महत्वाचं आहे. तर हा मुळपुरूष म्हणजे आपले, ललित मोदी… 

ललित मोदींनी भारतात फॅशन टिव्ही आणला. म्हणजे हे कुंद्रा वगैरे आत्ता आले वो, अखंड भारताला नाद लावायचं खरं काम कोणी केलेलं तर ते ललित मोदींनी..

2003 साली भारतात अलगद पावलांनी हा चॅनेल भारतात उतरला आणि वर्षानुवर्षे सादळलेल्या पिवळ्या कागदांवर त्याच त्या सविताछाप स्टोऱ्या वाचून बोअर झालेल्या पब्लिकच्या भावनांना नवा बहर मिळाला.

पोरांसोरात FTV म्हणून फेमस असलेल्या चॅनलने अनेक हातांना मोलाचा आधार दिला.

ह्या चॅनलच्या f चे काहीही फुलफॉर्म तुम्हाला मित्रांनी सांगितले असतील तर ते झूट आहेत. हा चॅनेल  येण्यापूर्वी प्लेबॉय मॅगझीनने भारतात आपली दुनिया खुली केलीच होती, पण हे वाण फक्त शहरी भागातील पहिल्या धारेच्या भिडूकडेच मिळायचं.

खेड्यापाड्यात पसरलेल्या देशाच्या हाती हे कधी येणार!

त्यातही एका सेंटरफोल्ड चित्रासाठी साडेतीनशे रुपयांचं मॅगझीन घेणे आणि कुठंतरी देवळीत नाहीतर दिसणार नाही अशा जागी आढ्याला लपवून ठेवणं नाय म्हनलं तरी धोकादायक काम होतं.

अशा वेळी कोण कुठली फॅशन टीव्ही, तिला माया फुटली आणि देशातल्या तरुणांच्या हातांना हक्काचं साधन मिळालं.

देऊळ पिच्चरमध्ये अनिकेतरावांनी जिची दाटलेली तंग कंचुकी ओघवत्या कवितेत वर्णिली आहे, ती जमैका म्हणजे ह्याच चॅनेलवरची अप्सरा होय. ह्या चॅनेलवर तमाम प्रकारचे शो सुरू असतात. कॅटवॉक म्हणू नका की बिनाटॉपचे म्हणू नका की स्वीमवेयर म्हणू नका की बिकनी म्हणू नका. पाण्यात पवायला जाताना घालायचे कपडे रॅम्पवर घालून येरझाऱ्या मारणारी माणसं ह्या चॅनेलवर दाखवली जातात.

मिडनाईट सिक्रेट नावाचा एक नितांतसुंदर प्रोग्रॅम ह्या चॅनेलवर कायम लागायचा त्याची सगळी दुनिया दिवानी होती. 

१९९७ साली फॅशन जगताचे केंद्र असलेल्या पॅरिस शहरात ह्या गुलाबी चॅनेलची स्थापना झाली. मायकल ऍडम लिझोवस्की ह्या माणसानं लाईफस्टाईल आणि फॅशन दुनियेच्या जगताची सेवा करायला चॅनेल सुरू केला होता. भारताची जनता इतके दिवस नुसतं बनियन आणि चड्डी घातलेल्या ललना बघायला बी ग्रेडचे “जंगली जवानी”, “जंगल में मंगल”, “अंधेरी रात में दिया हाथमें” च्या निवडक थेटरात गर्दी करत होती.

हे मार्केट ललित मोदी यांनी पहिल्यांदा ओळखलं आणि २००१ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी ५ वर्षांच्या करारावर वॉल्ट डिस्ने चॅनेलसोबत करार केला आणि आपल्या “मोदी इंटरटेन्मेंट नेटवर्क” सोबत फॅशन टीव्ही आणि इएसपीएन दाखवायला सुरवात केली.

खास भारतीय पुरुषांना टार्गेट ठेऊन सुरू झालेली ही कंपनी आपल्या शॉर्टफोर्म MEN मधूनच आपले इरादे दाखवत होती. या चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीय संस्कृतीला धरून नाहीत म्हणून तत्कालीन सूचना व प्रसारणमंत्री सुषमा स्वराज यांनी विशेष कमिटी बसवली आणि चॅनेलवर थेट बंदी घातली. ह्यापूर्वी दर महिनाभर त्यावर चालणारे सर्व कलाप्रकार केंद्रातील अधिकारी डोळ्यात तेल घालून बघत होते.

कमिटीच्या सदस्यांपैकी फक्त शबाना आझमी एकट्याच पोरांच्या समर्थनात म्हणजे बंदी घालण्याविरोधात होत्या.

देशात मोठ्ठा कल्लोळ उडाला. निम्मी जनता हिरमुसली तर उरलेल्यांनी जल्लोष केला. आधी लोकं रातच्या दहापर्यंत बायकुच्या आवडत्या मालिका आणि मंग आपले खुल्या नितंबसुंदर गोष्टी पाहत बसत. आता रातभर जागण्याचं कारण मिळेना म्हणून लोकांच्या झोपा उडाल्या. पण दगडालाही पाझर फोडणाऱ्या फ्रेंच लोकांनी भारतीयांचा आतला आवाज ऐकला.

फॅशन टीव्हीचे डायरेक्टर फ्रांसुआ थिले पुढच्या विमानाने भारतात उतरले आणि कायदेशीर बाबी खुल्या करून घेतल्या. वाट मोकळी झाली आणि भारतीयांचा गुदमरलेला झरा पुन्हा खळाळून निघाला…

ह्या टिव्हीने फक्त चॅनेल नाही तर कपड्यांची उत्पादने, स्वतःचे प्रोडक्शन हाऊस, दारूचे बार आणि इतरही उद्योग सुरू केले. 2007 साली मात्र गहजब झाला. फॅशन टीव्हीवर एका मॉडेलचे झम्परविरहित दृश्य दाखवल्याबद्दल तब्बल दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली.

एवढ्यासाठी सुद्धा दोन महिने म्हणजे त्या काळी एफटिव्हीने आपल्यासाठी किती कष्ट उपसले ह्याची कल्पना येईल. एवढंच नाही तर जेव्हा जास्त पैशे मिळवता येतील म्हणून ललित मोदींनी हा चॅनेल फक्त पेड डिशवर दाखवायचा प्रस्ताव मांडला तेव्हा चॅनेल अध्यक्ष मायकल एडम यांनी ह्यावर स्पष्टपणे नकार देत फुकटात प्रसारण सुरू करत तरुणाईचे प्रसरण पावण्यासाठी मदत केली.

नाराज झालेल्या ललित मोदी यांनी थेट कोर्टात दावा ठोकला आणि ह्याचा निकाल 2012 साली आला.

नंतर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि इनकोग्निटो विंडो बघून लोक ह्यांचे उपकार विसरले. जे उपकार विसरले त्यांनाच सुश्मिता आणि ललितची जोडी बघून मिर्झापूर आठवला, त्यांनाच ललितचा आजारपणातला फोटो बघून वाईट वाटलं नाही, बाकीच्यांनी ललितला मोठ्या डोळ्यांनी आणि तृप्त मनानं माफ केलंय… शंभर टक्के.

ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.