देवदर्शनासाठी बांधलेल्या जागेचं बायकांनी “तुळशीबाग” केलं…
तुळशीबागेत एक मारुतीचं मंदिर आहे. या मारुतीचं नाव खरकट्या मारूती. कारण काय तर बाहेरचे लोकं जेव्हा पुण्यात येत तेव्हा या परिसरात शिदोरी घेवून जेवायला बसत. तिथेच खरकट राहतं. पुणेकरांनी मारुतीचं नाव खरकट्या मारूती ठेवलं.
सहज सुचतं पण तिरकस सुचतं असे पुणेकर. आत्ता हे मारुतीचं मंदिर आहे तिथं एक दोन नाही खूप सारी मंदिरं आहेत. त्यात रामाचं मंदिर सुद्धा आहे. जुन्या काळातले अस्सल पुणेकर शोभणारे लेखक चिं.वि. जोशी लिहतात,
“पुण्यात खास बायकांसाठी बांधलेला तुळशीबाग नावाचा बाजार असून त्यात श्रीरामाचे देऊळही आहे“.
आज तुळशीबागेत जाणाऱ्या किती महिलांनी रामाचं दर्शन घेतलं असावं हा संशोधनाचा विषय. तसही बायकोसाठी वाट्टेल ते करणारा त्यांचा राम चितळेंच्या दुकानासमोर उभा राहून त्यांची वाट पहातच असतो म्हणा.
असो तर हा इतिहास आहे तुळशीबागेचा, जी बांधली होती देवदर्शनासाठी पण बायकांनी हळुहळु स्वत:च मार्केट उभा केलं.
नारो अप्पाजी खिरे म्हणजेच तुळशीबागवाले यांना श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी सरसुभेदारी दिली. त्याच कारण देखील तसच होतं. नारो अप्पाजी खिरे हे कामात चोख. त्यांच्या कारभारात त्यांनी एकदाही चुक केली नव्हती. इतकच काय तर निजामाने पुण्यावर हल्ला केलेला तेव्हा कमीत कमी नुकसान कसं होईल यांची जबाबदारी त्यांनीच संभाळली होती.
नारो अप्पाजी यांनी खाजगीवाल्याकडून एक एकराची तुळशीची बाग घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर १७९५ मध्ये तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पुर्ण झालं. त्यानंतरच्या काळात श्रीरामाच मंदिर, गजाजन मंदिर, त्र्यंबकेश्वर महादेव, शेषशायी भगवान, विठ्ठल रखुमाई अशा कित्येक मंदिरांची स्थापना परिसरात झाली.
आत्ता जबाबदारी होती ती महिलांची त्यांनी देखील लक्षपुर्वक आपलं काम पुर्ण केलं. त्या काळी म्हणे फक्त बाजार करण्याची जबाबदारी पुरूषांकडे असायची. मग पेठेतून असणाऱ्या बायकांना थोडी विश्रांती म्हणून या मंदिर परिसराचा मार्ग पत्करणं गरजेचं झालं. संध्याकाळच्या फावल्या वेळेत देवदर्शनाला जायचा. निवांत मैत्रिणींसोबत गप्पा मारायच्या असा दिनक्रम सुरू झाला.
नंतर समोरच्या भागात १८८५ साली मंडईला जागा देण्यात आली. आत्ता हा परिसर भाजीपाला खरेदीचा होता. त्याच काळात मंदिराच्या समोरच्या भागात मंदिराच्या उत्पन्नासाठी काही जागा विक्रेत्यांना देण्यात आली. एक दोन करत देवपुजेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींनी हा परिसर फुलून गेला. देवदर्शनासाठी यायचं आणि जाताना काहिना काहीतरी घेवून जायचं हा दिनक्रम झाला.
आत्ता महिलांच काम कसं असत तुम्हाला माहितच असेल. आज हे संपल तर उद्या ते. मग दुकानदार मागणी तसा पुरवठा करु लागले. मग महिला तोंडाला येईल त्या गोष्टी मागू लागल्या आणि विक्रेत त्या पुरवू लागले.
सण आला की तुळशीबाग फुलू लागली. गौरी गणपतीसाठी तुळशीबाग, दिवाळीसाठी तुळशीबागच अस करत करत टाईमपास साठी देखील तुळशीबागच अस चित्र झालं.
थोडक्यात सांगायच झालं तर देवदर्शनासाठी बांधलेल्या जागेचा बाजार झाला ! असो तुळशीबागेत जाणार असाल तर श्रीरामचे दर्शन घ्यायला विसरु नका.
हे ही वाचा.