नोकरीच्या पहिल्याच दिवशी आयुष्यभराची कमाई करणारा गीतकार…

मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे! आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल पण एकेकाळी अतिशय लोकप्रिय अशी गाणी त्यांनी रसिकांना दिली होती.

काही महिन्यापूर्वी  ज्येष्ठ गायक रामदास कामत यांचे निधन झाले आले. त्यावेळी प्रामुख्याने आठवण झाली गंगाधर महांबरे यांची.

‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’ हे अतिशय अप्रतिम भक्ती गीत त्यांच्या लेखणीतून उतरले होते आणि रामदास कामत यांनी ते गायले होते. गंगाधर महांबरे यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ सालचा.

पेशाने ते ग्रंथपाल होते. त्यांचा एक किस्सा खूप सांगण्यासारखा आहे. नोकरीच्या पहिल्याच दिवशी आयुष्यभर पुरेल इतका मोठ्ठा अनुभव त्यांच्या व्यतिरीक्त क्वचितच कोणाच्या वाट्याला आला असेल.

महाम्बरे त्यावेळी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये नोकरीसाठी जॉईन झाले होते. ग्रंथालयात काम करण्याचा त्यांचा पहिलाच दिवस होता. पहिलाच दिवस असल्यामुळे सर्व काम समजून घेण्यामध्ये संध्याकाळच झाली. नेमकं त्याच वेळेला लाईट गेले. कंदिलाच्या प्रकाशात त्यांचे काम चालू होते. त्यांचे सहकारी त्यांना ग्रंथालयाचे काम समजावून सांगत होते.

त्याच वेळी एक सुटाबुटातील व्यक्ती जिना चढून त्यांच्यापुढे उभे राहिली. त्या व्यक्तीने मला अमुक अमुक पुस्तक हवे आहे असे सांगितले. सर्वजण कंदिलाच्या प्रकाशात कॅटलॉग मध्ये ते पुस्तक शोधू लागले.

ती व्यक्ती म्हणाली “तुम्ही काही शोधू नका मला माहित आहे ते पुस्तक कुठे आहे!” आणि बरोबर त्या कपाटात जाऊन त्यांनी ते पुस्तक आणले.

महांबरे यांच्या सहकाऱ्यांनी लिखापढी केली. ती व्यक्ती ते पुस्तक घेऊन जायला निघाले. महांबरे त्यांना म्हणाले, “जिन्यातून सावकाश जा लाईट नाहीत.” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, “काही काळजी करू नका ही वाट माझ्या पायाखालची आहे.”

महांबरे यांना हस्तांदोलन  करून ती व्यक्ती निघाली तितक्यात लाईट आले आणि आता आश्चर्याचा धक्का बसला! ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते!!!

नोकरीच्या पहिल्याच दिवशी इतका सुखद धक्का इतका भावस्पर्शी अनुभव कदाचितच दुसऱ्या कुणाला आला असेल.साक्षात महामानवाची भेट नोकरीच्या पहिल्याच दिवशी होण्याचं भाग्य महांबरे यांचे होते!

गंगाधर महांबरे नंतर आपली नोकरी सांभाळून चित्रपट गीते तसेच भावगीते लिहित होते. निळा सावळा नाथ, पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे, रसिका तुझ्याचसाठी ही त्यांची गाजलेली गाणी!

पण त्यांचं सर्वात गाजलेलं गाणं होतं ‘संधीकाली या अशा’ या गाण्याचा किस्सा देखील खूप भन्नाट आहे.

पन्नासच्या दशकात सज्जाद हुसेन नावाचे एक संगीतकार होते. त्यांनी ‘संगदिल’ (१९५४) या सिनेमाला संगीत दिले होते. या चित्रपटातील ‘दिल में समा गये सजन फुल खिले चमन चमन’ हे नितांत सुंदर गाणं तलत आणि लताच्या आवाजात होतं तर चित्रपटात हे गाणं मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झालं होतं. पंडित हृदयनाथ मंगेशकर या गाण्याच्या प्रचंड प्रेमात होते. त्यांना याच टाईपचे गाणे मराठीत करायची होते.

त्यांनी गंगाधर महांबरे यांना या गाण्याच्या मीटरवर शब्द लिहायला सांगितले. महांबरे यांनी गाणे लिहिले. ‘संधीकाली या अशा’ हे गाणे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना लता आणि तलत महमूद यांच्या आवाजातच रेकॉर्ड करायचे होते. त्या दोघांच्या स्वरात काही रिहर्सल देखील झाल्या पण गाणे यायचं नव्हतं. नेमका त्याच वेळी वादकांचा संप झाला आणि गाणं रेकॉर्ड करायचं करायचं म्हणत राहूनच गेलं.

या गोष्टीला नंतर तब्बल वीस वर्षाचा कालखंड लोटला आणि हृदयनाथ मंगेशकर यांना त्या गाण्याची आठवण झाली. त्यांनी महांबरे यांना बोलावून आपण पुन्हा एकदा ते गाणं करुयात असं सांगितलं. पण आता तलत गात नव्हते मग त्यांच्या जागी तसाच मुलायम आवाज असणाऱ्या अरुण दाते यांना पाचारण करण्यात आले आणि अरुण दाते आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणं रेकॉर्ड झाले. अरुण दाते यांनी लता मंगेशकर सोबत गायलेले एकमेव युगलगीत आहे.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.