प्रसंगी गवतांच्या बियांची भाकरी करून खाल्ली पण अकबराला शरण गेले नाहीत

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांच्या पासून प्रेरणा घेतली, ज्यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवला. स्वराज्याशी, भारतभूमीशी द्रोह करणाऱ्यांसमोर त्यांनी कायम ज्या आदर्श, महा पराक्रमी राज्याचे उदाहरण ठेवले. आजही जे भारतभूमीतील प्रत्येकांसाठी वदनीय आहेत,

महाराणा प्रताप यांचे नाव घेताच अनेक भीम पराक्रम, त्याग, शौर्याच्या घटना डो‌ळ्यासमोर तरळतात. 

पण, याच पराक्रमी महाराणांवर इतके वाईट दिवस आले होते की, त्यांना अरवली पर्वतांच्या रांगांमध्ये लपून-छपून दिवस काढावे लागले.

पोटाची भूक भागविण्यासाठी त्यांना गवताच्या बियांपासून तयार केलेल्या भाकरीवर गुजराण करावी लागली. तरीही हा पराक्रमी राजा बादशहा अकबरला शरण गेला नाही.

बादशाह अकबराच्या सैन्याचा कायम धोका असायचा, त्यामुळे महाराणा प्रताप यांनी राजधानी चितोड सोडून अरवली पर्वताच्या दुर्गम रांगांमध्ये सुरक्षित आश्रय घेतला होता.

या दुर्गम, डोंगराळ भागात गनिमी काव्याने लढा देत महाराणा प्रताप यांचे काही शेकड्यातील सैनिक मुघलांच्या हजारोंच्या सैनिकांचा यशस्वी सामना करीत. याच दरम्यान,

१८ जून १५७६ रोजी भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध हल्दी घाटीची लढाई झाली.

काहीही करून महाराणा प्रताप यांचा बिमोड करण्याची शपथच बादशाह अकबराने घेतली होती. अनेक राजपूत सरदारांसह हजारोंची फौज आणि भक्कम तोफखान्याने सज्ज असलेल्या मुघल सैनिकांचा हल्दी घाटी येथे महाराणा प्रताप यांच्या मूठभर सैन्याशी सामना झाला.

महाराणा प्रताप यांनी मोठ्या शौर्याने, युक्तीने आणि गनिमी काव्याने मुघल सैनिकांचा सामना केला. पण, मुघल सैनिकांचा पूर्ण पराभव करता आला नाही. मुघल सैनिकांचा पाठलाग चुकविण्यासाठी महाराणा प्रताप यांनी अरवली पर्वतांच्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये आश्रय घेतला.

पाठीवर असणाऱ्या मुघलांचा ससेमिरा चुकवत. महाराणा प्रताप आपल्या कुटुंबासह, आपल्या विश्वासू सैन्यासह अरवलीच्या जंगलात फिरत राहिले. राजधानीपासून दूर जंगलात असल्यामुळे रसद पुरवठा होण्यात अडथळे येत होते. त्यामुळे पोटभर मिळणे कठीण जात होते.

अनेक वेळा कुटुबासह, सैन्याला उपाशी राहावे लागले होते. एकवेळ आशी आली की, महाराणा प्रताप आणि लहान राजपुत्रांची भूक भागविण्यासाठी महाराणी प्रताप यांच्या राणीने जंगलातील गवताच्या बिया गोळा करून, त्याचे दगडावर बारीक पीठ करून त्याच्या भाकरी महाराणा प्रताप आणि लहान मुलांना खाऊ घातल्या होत्या.

अत्यंत पराक्रमी राजाही या वेळी भावनिक होऊन म्हणाला होता,

‘मी कसला राजा आहे? माझ्या मुलांना पोटभर अन्न देऊ शकत नाही.’

अनेक दिवस त्यांनी जंगलातील फळे, कंदमूळ खाऊन त्यांनी आपले, आपल्या कुटुंबाचे आणि सोबतच्या सैन्याचे पोट भरले आणि अकबराशी संघर्ष कायम ठेवला.

अरवलीच्या जंगलात असताना त्यांना भिल्ल आदिवासींची मोठी मदत मिळाली. भिल्लांकडून ते गनिमी काव्याची युद्धनिती शिकले आणि अखेरपर्यंत अकबराला झुंज देत राहिले.

अरवली पर्वतात आपला राजा खूप कष्टात जगत आहे, त्यांना सैन्य उभारण्यासाठी संपत्तीची गरज आहे, याची माहिती मिळताच मेवाडचे भामाशाह यांनी महाराणांच्या चरणी २० लाख सुवर्ण मुद्रा आणि २५ लाख रुपयांची संपत्ती दान केली आणि याचा वापर करून पुन्हा सैन्य उभारणी करावी आणि अकबराने जिंकलेला भूमभाग पुन्हा मिळवावा, अशी विनंती केली.

महाराणा प्रताप यांनी पुन्हा सैन्याची जमवाजमव करून सैन्य उभारून अकबराने जिंकलेला प्रदेश पुन्हा मिळवला.

अनेक कठीण प्रसंगातून जाताना ही महाराणा प्रताप यांनी मोठ्या शौर्याने मुघलांना शिकस्त दिली. अकबरासमोर कधीही झुकले नाहीत, हार मानली नाही. सदैव वेगळ्या, स्वाभिमानी राजपूत राज्याची ज्वाला जिवंत ठेवली. म्हणूनच आजही महाराणा प्रताप यांना राजस्थानमध्ये देवा समान मानले जाते. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.