टिळकांना अधिकारवाणीने सल्ला देऊ शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे “महर्षी अण्णासाहेब”

साधारण अठराशे सत्तरचा काळ. विश्वनाथ नारायण मंडलिक उर्फ रावसाहेब मंडलिक नावाचे नेटिव्ह ओपिनियन नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक होते. त्याकाळच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ. एकदिवस अचानक त्यांच्या ऑफिस मध्ये एक उंचापुरा दांडगा तरुण शिरला. त्याने वर्तमानपत्रासाठी एक लेख लिहिला होता पण तो रावसाहेबांनी छापला नव्हता याचा त्याला जाब विचारायचा होता.

“माझं इंग्रजी वाईट आहे म्हणून छापला नाही का माझा लेख?”

रावसाहेब म्हणाले,

“नाही. लेख उत्तम आहे पण ब्रिटीश राज्यकर्त्यांची माथी भडकवणारा मजकूर मला छापता येणार नाही. मला हे वर्तमानपत्र चालवायचं आहे, बंद पाडायचं नाही.”

यावरून दोघांच्या वादावादी झाली. तो मुलगा म्हणाला,

“ठीक आहे. लेख परत द्या. मी दुसरीकडे छापतो आणि तुम्ही जे उत्तर दिलय त्याची तळटीप जोडतो शेवटी. हरकत नाही ना?”

रावसाहेब मंडलिक चिडले.त्यांनी त्याला बदनामीची केस ठोकेन म्हणून धमकी दिली. पण मुलगा सुद्धा खाष्ट होता त्याने उत्तर दिल,

“चालेल. मीसुद्धा कायद्याचा विद्यार्थी आहे. एलएलबीची परीक्षा देतोय मी.”

खरतर रावसाहेब मंडलिक त्या पदवी परीक्षेचे मुख्य परीक्षक होते. त्यांनी त्याला तू पास कसा होतोस हेच पाहतो असं सांगितलं. पण त्या मुलाने सडेतोड उत्तर दिले,

“हरकत नाही. फक्त सत्याला स्मरण ठेवून पेपर तपासा.”

खरोखर त्या मुलाला मंडलिकांनी छोट्या चुका काढून चार वेळा नापास केले. त्या मुलाच नाव विनायक पटवर्धन. हा जिद्दी मुलगा एलएलबीसोबत मेडिकलची परीक्षा सुद्धा देत होता. खरं तर मेडिकलचा अभ्यासक्रम जास्त अवघड होता आणि त्यामानाने वकिली सोपी होती. पण तो डॉक्टर होत आला तरी एलएलबी काही पास झाला नव्हता. यामुळे त्याचे मित्र देखील त्याची चेष्टा करत होते. पण हा नित्यनेमाने एलएलबीच्या परीक्षेला जातच होता.

एके दिवशी न राहवून मंडलिकांनी विचारलंचं,

“काय पटवर्धन अजून कितीवेळा परीक्षा देणार?”

तो म्हणाला,

“सर तुम्ही पास करे पर्यंत. “

पाचव्यांदा परीक्षा दिला. निकालाची वाट बघत होता. त्याला कोणीतरी सांगितलं तू पास झालास. निकाल घेऊन थेट तो मंडलिकानां भेटायला गेला. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तो वाकला तेव्हा मंडलिक प्रांजळपणे म्हणाले,

“पोरा तू जिंकलास.यावेळी तुला पास करण्यावाचून मला पर्यायच नव्हता.”

देशाप्रेमासाठी आपल्या शिक्षणाची पाच वर्षे वाया घालवणारा हा विनायक म्हणजे लोकमान्य टिळकांचे गुरु महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. राजकारण सामाजिक कार्ये याबद्दल टिळकांना अधिकारवाणीने सल्ला देऊ शकणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे अण्णासाहेब. त्यांनी पुढे आळंदीच्या नृसिंह सरस्वतीस्वामींच्या अध्यात्मचा मार्ग स्वीकारला.

२ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांनी प्रायोपवेशन करून आपला देह ठेवला. त्यांच्या निधनानंतर अण्णासाहेबांची समाधी पुण्यात नदीपात्रालगत ओंकारेश्वर येथे लोकमान्यांच्या पुढाकाराने उभारण्यात आली.

हा किस्सा अप्रबुद्ध यांनी महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या चरित्रात लिहिलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.