गुटखा सोडला आणि वाचलेल्या पैशातून १ हजार झाडांच जंगल उभा केलं.. 

मी व्यसन सोडलं असत तर आज BMW मधून फिरलो असतो. व्यसन करणाऱ्या लोकांच अभिमानाने सांगण्याच हे वाक्य असतं. व्यसन तर सोडत नाहीतच वरती किती पैसे व्यसनावर खर्च करतो ते अभिमानााने सांगतात. दिवसाला दोन तीनशे रुपयेचा विमल, मावा, RMD खाणारे महाभाग इथे चौकाचौकात आहेतच. शिवाय दारू, सिगरेट अशी कितीतरी व्यसन करणारे आपले पैसै असेच फुकत असतात. 

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातला महावीर पांचाल देखील त्यातलाच. दिवसाला ३०-४० रुपयेचा गुटखा तो खायचा. त्याच एक साध ऑटो पार्टस् दुकान. दिवसभर दुकानात गिऱ्हाईक करायचं आणि गुटखा खायचा. हाच दिनक्रम गेली कित्येक वर्ष चालू होता. 

बुंदी शहरापासून सहण नावाच छोटस त्यांच गाव. नेनवॉं हा तालुका.

या गावापासून बुंदी शहर ६० किलोमीटरच्या अंतरावर. जिल्ह्याच्या ठिकाणी ऑटोपार्ट्स आणण्यासाठी सारखा प्रवास होत असायचा. याच प्रवासात एक दिवस महावीर यांच्या लक्षात आलं की लहानपणापासून आपण प्रवास करतोय. पुर्वी जितकी झाडं या रस्त्यावर होती त्यापैकी काहीच शिल्लक राहिलं नाही.

दिवसभर तोच विषय डोक्यात राहिला. दूसऱ्या दिवशी दुकानात बसल्यानंतर त्यांचा एक मित्र आला. रोजच्या गप्पाप्रमाणे झाडांचा विषय निघाला. महावीर यांच म्हणणं होतं की आपण झाडं लावण्यासाठी काहीतरी करायला हवं. त्यावर मित्र म्हणला की गावातली हनुमान टेकडीजवळ असणारी १०० एकर जागा रिकामीच आहे. पुर्वी तिथं खूप झाडी होती पण आत्ता फक्त बाभळ. तिथेच झाडं लावता येतील. 

सल्ला मिळाला. एकट्याने झाडं लावायचं काम अवघड होतं. रोजचे दोन तीन तास देता येतील पण झाडं कोणती लावायची, ती नर्सरीतून विकत आणायची तर पैसे कुठून आणायचे असे अनेक प्रश्न होते. हा विषय संपतोय तोच व्यसनमुक्ती केंद्राचे लादू लाल सेन नावाचे कार्यकर्ते दुकानात आले. 

तेव्हा महावीर आपल्या तोंडात गुटखा धरूनच बोलत होते. ते काय बोलतायत ते लादू सेन यांना कळत नव्हतं. गुटखा खाणारे तोंडात गुटखा ठेवून पिचकारी मारत जस बोलतात त्या स्टाईलमध्ये हा सगळा कारभार चालू होता. लादूसेन किती झालं तरी व्यसनमुक्ती वाले.

त्यांनी महावीरला विचारलं, 

दिवसाचे किती रुपये या गुटख्यावर खर्च होतात. 

महावीर म्हणाले ३० ते ४० रुपये. 

लादू सेन यांनी लगेच हिशोब लावला. दिवसाच्या ४० रुपयातून तू वाट्टेल ते करु शकतो. व्यसन सोड आणि त्या पैशातून काहीतरी चांगल कर. 

एकीकडे झाडं लावण्यासाठी पैसा कसा आणायचा हा विषय चालू होताच तेव्हा गुटख्यासाठी होणारा खर्च सांगून लादू सेन यांनी त्यांचे डोळे उघडले. 

ठरलं, गुटखा सोडायचा आणि त्या पैशातून झाडं लावायची.

महावीर पांचाल यांनी हनुमान टेकडी गाठली. तिथे बाभळीची झाडं वाढली होती. पहिल्यांदा स्वत: राबून ती झाडं कापली. नंतर वेगवेगळ्या तज्ञांच्या मदतीने देशी झाडं कोणती? त्यांच प्रमाण काय असावं? कोणती झाडं लावलेली चांगली याचा अभ्यास केला. झाडांच्या जाती समजून घेतल्या आणि त्याच प्रकारची झाडं लावण्याच नियोजन केलं.

Screenshot 2019 09 08 at 5.13.53 PM 

जून २०१३ सालापासून हा उपक्रम अंमलात आला. बघता बघता एका वर्षात २०० झाडं लावून जगवण्यात आली. ते पण मोठ्ठ कष्टाचं काम होतं. दिवसभर नीलगायीचा आणि शेळ्यांचा त्रास असायचा. दोन चार महिने जगवून तयार झालेलं रोपटं निलगाई एका मिनटात फस्त करायच्या. या सर्व गोष्टींचा सामना करत ते झाडं जगवत होते. 

२०१५ च्या दरम्यान त्यांच्या या वाटिकेला आग लागली. 

या आगीच निमित्त होतं जवळून जाणारी हायव्होल्टेज वायर. एकीकडे जनावरांचा ताप तर दूसरीकडे लागलेली आग. त्या रात्री आग लागून २०० च्या दोनशे झाडं जळून गेली. 

महावीर सांगतात आई गेल्यानंतर जितका रडलो त्याहून अधिक मी त्या दिवशी रडलो. 

पण हे घडतं असताना मुलगा म्हणाला, घरातलं एअरटेलच डिश बंद करुन त्यातून जे पैसै वाचतील त्यातून परत झाडं लावू. महावीर यांच्यासाठी मुलाच ते बोलणं खूप महत्वाच होतं. पुन्हा दूप्पट वेगाने ते उभा राहिले. 

हळुहळु झाडांची संख्या वाढली, लोकांनी महावीर यांच कौतुक करण्यास सुरवात केली. बाभळीने आच्छादलेल्या जागेवर छोटेखानी जंगल उभा राहिले. फळा फुलांची देशी झाडं असल्याकारणाने इथे पक्षी येवू लागले. प्राण्याची संख्या वाढली. फेसबुकवरुन महावीर यांची ख्याती सर्वदूर झाली. लोक पण मोठ्या मनाने त्यांच्या मदतीसाठी उभा राहिले. फेसबुकवरून लोकांनी मदतीसाठी झाडांची रोपटे देवू केले. अशा वेळी उरलेल्या पाच ते सहा एकरात त्यांनी फेसबुकवरून आलेल्या मदतीतून झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्याच नाव फेसबुक वाटीका ठेवलं. 

आज त्यांच्यामुळे १००० हून अधिक झाडं लागली. त्यांना यासाठी खर्च किती लागला अस मध्यंतरी एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं निश्चितच गुटख्यापेक्षा कमी.  

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. सोपान मस्के says

    ,छान कथा अभिनंदन अस्या गोष्टीमुळे नवा उलास येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.