एकेकाळी ‘बिल्ला’ नावाने ओळखला जाणारा बॉलिवूडचा खलनायक अचानक कुठे गायब झाला?

हिरोला हिरो बनवणारं पात्र म्हणजे खलनायक, व्हिलन. अक्षय कुमारच्या एका पिच्चरमध्ये डायलॉग आहे बघा,

हिरो मरने के बाद स्वर्ग में जाता है और व्हिलन जीते जी स्वर्ग पाता है..

खलनायकाशिवाय हिरोला महत्त्व नसते मग ते खऱ्या आयुष्यातील असो किंवा चित्रपटातील. आणि जेव्हा बॉलीवूड चित्रपटांचा विचार केला जातो, तेव्हा येथील भयानक खलनायक आपल्या सर्वात वाईट कल्पनेच्या पलीकडे असतो. कारण खलनायक जितका ताकदवान तितक्या जास्त टाळ्या नायकानं त्याला पराभूत केल्यावर प्रेक्षक वाजवणार.. त्यामुळे फक्त बॉलीवूड चित्रपटांमध्येही एकापेक्षा जास्त राऊडी आणि वाढीव व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकांना कास्ट केले जाते.

अशाच एका व्यक्तीने 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता नाव होतं माणिक इराणी. तुम्ही या खलनायकाला त्याच्या खऱ्या नावाने ओळखत नसाल पण ज्या नावाने माणिक लोकांमध्ये प्रसिद्ध झाले, ते नाव आजही लोकांच्या जिभेवर आहे. नाव आहे बदला आणि बिल्ला. 6 फूट उंच आणि जबऱ्या तब्येत असलेली ही व्यक्ती जेव्हा पडद्यावर यायची तेव्हा ती नायकालाही जड वाटायची. त्यांची बॉडी इतकी खतरनाक दिसायची की जणू काही हातांनी ते दगडाचा चक्काचूर करतील. 

माणिक इराणी 80 आणि 90 च्या दशकातील सर्वात मोठे चित्रपट व्हिलन होते. माणिक इराणी यांनी 1974 पासून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. ‘पाप और पुण्य’मध्ये त्यांनी खलनायकी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले. त्यानंतर 1976 मध्ये त्यांनी ‘कालीचरण’मध्ये गुंगा बदमाशची भूमिका साकारली होती.

‘त्रिशूल’ चित्रपटातही त्यांनी अमिताभ बच्चनची बेदम धुलाई केली होती. स्टारडममध्ये ते अमिताभ यांच्या बरोबरीचे नसतील, पण पडद्यावरचे त्यांचे व्यक्तिमत्त्व अँग्री यंग मॅन असेच असायचे आणि अंगावर काटा आणायचे. अमिताभसारख्या नायकाच्या विरुद्ध असा खलनायक पाहायलाही लोकांना आवडला होता. मग असा एक काळ आला की अमिताभच्या बहुतेक चित्रपटात ते गुंडाच्या भूमिकेत दिसू लागले. ‘मिस्टर नटवरलाल’, ‘शान’, ‘नास्तिक’ या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. 1978 मध्ये आलेल्या ‘डॉन’ चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बॉडी डबलची भूमिकाही केली होती, असे म्हटले जाते. मात्र, याचे श्रेय त्यांना मिळाले नाही.

चित्रपट होता ‘हीरो’. त्याचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटातून जॅकी श्रॉफला नायक म्हणून लाँच करण्यात आले असले तरी या चित्रपटाने माणिक इराणी यांना बदला नावाने एक भयानक खलनायक म्हणून प्रसिद्ध केले. या चित्रपटातील त्याचा लूक तर अप्रतिम होताच, सोबतच डायलॉग डिलिव्हरीही अप्रतिम होती. मधूनच केस तोडत ते भयंकर स्मितहास्य करत बोलत, तेव्हा बघणारेही गांगरून जायचे.

बिल्ला म्हणून माणिक इराणी फेमस होते मात्र हा बिल्ला अचानक कुठे गायब झाला? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. खरं तर, आयुष्यात अचानक काहीही घडत नाही आणि माणिक इराणी यांच्याबाबतीतही तेच झालं. 

माणिक ईराणी यांना अनेक दिवसांपासून दारूचे व्यसन होते. जसजसे त्याचे करिअर पुढे जात होते तसतसे त्याचे दारूचे व्यसनही वाढत गेले. ते सतत दारूच्या नशेत असायचे. 1992 मध्ये ‘दीदार’मध्ये ते शेवटचे पडद्यावर दिसले होते. या दारूच्या व्यसनाने त्यांचा जीव घेतल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण कोणालाच माहीत नाही. त्यांनी आत्महत्या केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. मात्र कोणीही निश्चितपणे काही सांगू शकत नाही.

पण अमरीश पुरी, राजा मुराद, गुलशन ग्रोव्हर, प्रेम चोप्रा ,रणजित अशा लोकांच्या तोडीस तोड व्हिलन म्हणून माणिक ईराणी उर्फ बिल्ला फेमस होते, हे नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.