भारतात गुगलच्या आधी यांनी डिजिटल मॅप आणला होता

भारतीय बाई कुठल्याही परिस्थितीत अन कुठल्याही क्षेत्रात फक्त बाप्प्यालोकांच्याच नाय तर जगाच्याही पुढं गेल्याचे दाखले इतिहासात आहेत. भविष्यातही मिळतील. पण वर्तमानातले असे उदाहरणं कायम दाबून ठेवले जातात.

त्यातलंच एक नाव म्हणजे, रश्मी वर्मा.

भारताला गुगलच्या आधी डिजिटल मॅप दाखवणाऱ्या बाईची गोष्ट कुणालाच माहीत नाही ही आपली शोकांतिकाय. या बाईने भारताचा चेहरामोहरा बदलून टाकलाय- शब्दशः बदलून टाकलाय असं म्हणायला पायजे.

मॅप माय इंडिया कंपनीच्या सहसंस्थापक आणि कार्यकारी संचालक म्हणून त्यांचं नाव जगाला माहित्ये. उत्तर प्रदेश च्या गल्लीबोळांतून अमेरिका आणि पुन्हा भारतातील मोठ्या उद्योगपती असा त्यांचा प्रवास झाला.

भारताचं नकाशे वाचायचं आणि बनवायचं क्षेत्र त्यांच्या धोरणामुळे अतोनात बदलून गेले. भारतात इंटरनेट चा धुमाकूळ सुरू व्हायच्या आधी १९९२ मध्ये त्यांनी आपल्या नवऱ्यासोबत मॅप माय इंडिया सुरू केली आणि भारताला डिजिटल नकाशे कशे वापरायचे हे पहिल्यांदा शिकवलं.

२००५ साली भारतात काही टेलिकॉम वाल्यांनी इंटरनेट सुरू केलं त्याच्या आदुगरपासून आम्ही भारतात मॅप्स पुरवत होतो. तेव्हा जीपीयस नव्हते त्यामुळं आम्ही आमचं स्वतःचं उपकरण बनवून लोकांना द्यायचो.

ते जीपीयसला सपोर्ट करायचं अन कुठंही नेता यायचं. बिना डेटा कनेक्शन मॅप दाखवणारी आमची पहिली कंपनी होती.”

१९७० साली जेव्हा पोरीच्या शिक्षणावर अमाप बंधनं होती तेव्हा त्यांनी रुरकी विद्यापीठात केमिकल इंजिनिअरिंग शिकाय प्रवेश घेतला. आज आपण त्याला आयआयटी रुरकी म्हणतो. त्या काळी एन्ट्रान्स वगैरे भानगडी नव्हत्या. तरी त्यांच्या वर्गात फक्त नऊ पोरी होत्या.

त्यानंतर त्यांनी आयबीएम आणि सिटीकॉर्प अशा मोठमोठ्या अमेरिकन कंपन्यांमधी कामं केली. सगळी इंजिनिअरिंगची दुनिया त्यासाठी झटत असते त्या वॉल स्ट्रीटवर त्यांनी सहा वर्षे काम केलं.

पण ती दुनिया त्यांना भावली नाही.

रश्मीबाईंना आपल्या देशातील जनतेसाठी जगातलं नवनवीन तंत्रज्ञान घेऊन यायचं होतं. जग पुढं जात असताना भारत परदेशात अजूनही गारुड्यांचा देश म्हणूनच ओळखला जात होता. त्या अमेरिकेत राहून ऑपरेशनल रिसर्च शिकल्या होत्या. त्यामुळं उद्योग कसा चालवावा आणि कसा नियंत्रित करावा ह्याची त्यांना चांगली आयडिया आली होती.

भारतात फिरण्यासाठी लोकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी ध्यानात घेतल्या अन मॅप माय इंडिया कंपनीच्या माध्यमातून या क्षेत्रात उडी घेतली. भारतात नुकतंच मोठमोठ्या कंपन्या आपली ऑफिसं सुरू करायला लागली होती.

जीपीयस आणि नॅव्हिगेशन, लोकेशन बेस्ड सर्व्हिस हे शब्द भारतीयांना माहीत नव्हते तेव्हा त्यांनी हे तंत्रज्ञान भारतात आणलं.

“टाटा स्टील आणि आयबीयम सारख्या मोठ्या कंपन्यांनी आमच्यावर विश्वास टाकला. जास्त पैशे मिळाले त्याच्यात, पण आम्हाला मनासारखं समाधान वाटल असं काम नाय करता आलं. १९९५ साली अमेरिकेत आम्ही मॅपिंग सॉफ्टवेअर बघिटलं अन 10 वर्षांनी हाच उद्योग भारतात सगळ्यात मोठा होईल ह्याची आम्हाला खात्री पटली. “

रश्मीबाई त्यांचा प्रवास सांगतात.

“गुगल आल्यानंतर गोष्टी बदलल्या. १० वर्षे आम्ही नवरा-बायकुनी कंपनीतून आमचा पगारसुद्धा घेतला नाही कारण आम्ही सगळ्या एम्प्लॉयी लोकांना आणि ग्राहकांना समाधानी ठेवायसाठी काम केलं.”

आज आपण गुगल मॅप्सवर अवलंबून आहोत. पण टाटा मोटर्स, ह्युंदाई, बियमडब्लू, फोर्ड, ओला कॅब अशा कंपन्या अजून त्यांचंच तंत्रज्ञान वापरतात.

वर्मा बाईंची कंपनी सध्या तंत्रज्ञान आणि नवीन गोष्टींना जोडून मूव्ह नावाचं एक मोबाईल ऍप बनवतेय. आत्मनिर्भर भारत AP इव्होवेशन चँलेजमध्ये त्याला पुरस्कार भेटलाय. ही भन्नाट बाई आपल्या नवनवीन जबरदस्त कल्पनांनी भारत दणाणून सोडेल यात शंकाच नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.