न्यायालयात मराठी शब्दाचा अर्थ लावायचा असतो तेव्हा या ब्रिटीशाने दिलेला अर्थ प्रमाण मानतात

महाराष्ट्राच्या न्यायालयात एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावायचा असतो तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मराठी शब्दाचा दिलेला अर्थ प्रमाण मानला जातो. त्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच नाव होतं जेम्स थॉमस मोल्सवर्थ.

मोल्सवर्थ यांचा मराठी इंग्रजी शब्दकोश हा मराठी शब्दकोश आजही प्रमाण मानला जातो. एका ब्रिटीश अधिकाऱ्यांने महाराष्ट्रात राहून तयार केलेला हा शब्दकोश. 

१५ जून १७९५ साली जेम्स थॉमस मोल्सवर्थ या ब्रिटीश अधिकाऱ्यांचा जन्म झाला. जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात सहभागी झाला.  एप्रिल १८१२ मध्ये त्यांना वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना भारतात पाठवण्यात आले. त्यावेळीच्या नियमाप्रमाणे ब्रिटीश अधिकाऱ्याला काम करेल तिथली भाषा शिकावी लागत असे. त्यानुसार त्यांची परिक्षा घेतली जात असे व त्यात पास होण्याची आवश्यकता होती.

जेम्स देखील इतर अधिकाऱ्यांप्रमाणे मराठी शिकू लागला, विशेष म्हणजे मराठी शिकता शिकता जेम्स मराठीच्या प्रेमात पडला आणि नवनवे मराठी शब्द गोळा करण्याचा त्याला छंद लागला.

मराठी भाषेतील नवनवे शब्द तो टिपून घेत असे. असे करता करता त्याच्याकडे शब्दांचा मोठ्ठा संग्रह तयार झाला. पुढे त्याची बदली गुजरातमधल्या खेडा भागात झाली. जेम्स मोल्सवर्थला गुजरातमध्ये करमत नव्हतं. मराठी भाषेची ओढ त्याला स्वस्थ बसून देत नव्हती म्हणून त्याने ब्रिटीश सैन्याकडे एक प्रस्ताव पाठवला. त्यात त्याने मराठी भाषेतला शब्दकोश तयार करण्याची परवानगी मागितली होती. मराठी भाषेचा शब्दकोश तयार करण्यासाठी त्याला २००० रुपये व मुंबईत बदलीची आवश्यकता होती.

मोल्सवर्थच्या या प्रस्तावाला ब्रिटीश सेनेने मात्र कचऱ्याची पेटी दाखवली. लेफ्टनंट कर्नल व्हान्स यांनी यापुर्वीच मराठी इंग्रजी शब्दकोश तयार केला असून तो पुरेसा आहे असा दाखला ब्रिटीश सैन्याने दिला. आत्ता डाळ शिजत नाही म्हणल्यानंतर मोल्सवर्थने ब्रिटीश सेन्याकडे धमकीवज अर्ज केला. त्यात तो म्हणाला, मला बदली मिळाली नाही तर मी लष्कराची नोकरी सोडून देईल. माझी बदली करून आपण जर शब्दकोश तयार करण्याची परवानगी देत असाल तर मी माझे भत्ते सोडून द्यायला तयार आहे.

ब्रिटीश सेन्याने त्याच्या धमकीची दखल घेतली व त्याची बदली मुंबईत केली. शब्दकोश तयार करण्याची परवानगी त्याला देण्यात आली पण सोबतच ब्रिटीश अधिकारी म्हणून असणारी जबाबदारी तसेच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनच काम पाहण्याची जबाबदारी देखील त्याला देण्यात आली. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमुळे त्याला मराठी भाषेत काम करणाऱ्या शास्त्री लोकांसोबत ओळख वाढवता आली. 

यापुर्वी मोल्सवर्थ महाराष्ट्रात काम करत होता तेव्हा त्याची ओळख सोलापूरच्या थॉमस कॅंडी आणि जॉर्ज कॅंडी यांच्याबरोबर झाली होती. पैकी थॉमस कॅंडी संस्कृत पाठशाळेचे प्राचार्य म्हणून काम पहात होते. त्या दोघांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान होते. मोल्सवर्थने या बंधुना मुंबईत पाठवण्यात याव असा अर्ज केला व ब्रिटीशांनी तो मान्य देखील केला. कॅंन्डी बंधूंच्या सहकार्याने मराठी शब्दकोशाच काम जलदगतीने सुरू झालं.

१८२८ साली शब्दकोशाची तयारी अंतीम टप्यात आली.

त्यासाठी आत्ता BNES संस्थेत छपाई करण्यात येणार होती. पण मोल्सवर्थने मराठी भाषेसाठी नवे टाईप करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यासाठी कोलकत्त्याला मराठीचे नवे टाईप करण्याची ऑर्डर देण्यात आली. या काळात मोल्सवर्थने एकूण ४०,००० मराठी शब्द गोळा केले. प्रत्येक मराठी शब्दाचा अर्थ विस्तृतपणे मांडण्याच काम त्याने केलं. यापुर्वीचा शब्दकोश हा आठ हजार शब्दांचा होता तर मोल्सवर्थने तयार केलेला शब्दकोश हा चाळीस हजार शब्दांचा होता.

ब्रिटीशांनी मात्र या शब्दकोशाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एक कमिटी बसवली. त्यासाठी लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी, लेफ्टनंट जॉर्ज पोप, रॉबर्ट कॉटन मनी या तीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली. पैकी केनेडी यांच्या मते मराठी फक्त बोली भाषा असून त्यात मोजके शब्द असताना शब्दकोश तयार करण्याची गरज नाही असे होते. पोप हे देखील केनेडी यांच्या मताचेच होते मात्र रॉबर्ट कॉटन मनी यांनी मात्र मोल्सवर्थ मनापासून कौतुक केले. ते म्हणाले,

अशा मोठ्या शब्दकोशाची गरज होती. शब्दकोश समृद्ध आणि अचूक आहे. मऱ्हाठा (मराठी) भाषेचे विशाल ज्ञान त्यात आहे. 

वेगवेगळी मते आल्याने ब्रिटीश अधिकाऱ्यांनी १८ सदस्यांची पुन्हा एक कमिटी तयार केली. यावेळी मात्र सर्व सदस्यानी एकमुखाने शब्दकोशास पाठिंबा दिला. मोल्सवर्थने काम केले नसते तर हे मराठी शब्द युरोपीय लोकांना कधीच समजले नसते असा ठराव संमत करण्यात आला.

सप्टेंबर १८३१ साली मोल्सवर्थचे अभिनंदन करणारे पत्र पाठवण्यात आले. मोल्सवर्थने आत्ता इंग्रजी मराठी डिक्शनरीचे काम सुरू करावे म्हणून ब्रिटीशांनी त्याला पुढील काम दिले.

पण मराठी शब्दकोशासाठी त्याने आपले तारुण्य दिले होते, आत्ता तो ३७ वर्षांचा झाला होता. 

याच काळात त्याची तब्येत त्याला साथ देत नव्हती. थंड हवेच्या ठिकाणी गेल्यानंतरच तब्येत ठिक होईल अस डॉक्टरांनी त्याला सांगितलं व तो उटी येथे रहायला गेला. काहीच फरक पडत नाही म्हणून अखेर तो १८३८ साली इंग्लडला परतला.

दरम्यानच्या काळात १८५१ साल उजा़डलं होतं. मोल्सवर्थ इंग्लडला रहात होता. इकडे पहिली आवृत्ती संपत आली होती. मोल्सवर्थचे वय ५६ झाले होते. त्यांची तब्येत सुधारली होती. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्याला  पुन्हा भारतात येवून इंग्रजी मराठी डिक्शनरी तयार करावी अशी मागणी केली. मोल्सवर्थने देखील ते मान्य करुन पुणे आणि महाबळेश्वरमध्ये मुक्काम ठोकला. नव्या आवृत्तीत ६०,००० शब्दांचा समावेश करण्यात आला  आणि १८५७ साली ९५२ पानांचा मराठी इंग्रजी शब्दकोश तयार करण्यात आला जो आजही प्रमाण मानण्यात येतो.

एक ब्रिटीश अधिकारी मराठी भाषेच्या प्रेमात पडतो, त्यासाठी आपलं संपुर्ण आयुष्य वहातो. मराठी भाषेच्या कामासाठी तो अविवाहित राहतो अशा अधिकाऱ्याचं ऋण आपण येणाऱ्या पिढ्यांपर्यन्त पोहचवलं पाहीजे इतकच. 

संदर्भ :

  • पुस्तक : मुंबई ब्रिटीशांची होती तेव्हा.
  • लेखक:  माधव शिरवळकर 
  • प्रकाशक : ग्रॅंथाली
Leave A Reply

Your email address will not be published.