दुष्काळी मायणी भागात फ्लेमिंगो कधीपासून येऊ लागले..?

साताऱ्यात एकीकडे महाबळेश्वर हा अतिवृष्टीचा तालुका. तर दुसऱ्या बाजूला माण आणि खटाव हे दोन दुष्काळी तालुके. वर्षानुवर्षे नाही तर शतकानुशतके दुष्काळी. या भागातील दुष्काळ हटवण्यासाठी राजे महाराजांच्या जमान्यापासून ते ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. लोकनियुक्त सरकाराचे हे प्रयत्न अजूनही चालू आहेत.

पण आज देखील हे तालुके राज्यात डार्क वॉटर शेड म्हणून गणले जातात.  

इथला दुष्काळ हटवण्यासाठीच्या उद्देशाने इतिहासात असाच एक प्रयत्न एका इंग्रज अधिकाऱ्याने केला आणि त्यातून पुढे जन्म झाला इंदिरा गांधी पक्षी अभयारण्याचा.

साधारण १८८९-९० च्या दरम्यानची गोष्ट.

चांद नदीवर ३५ फूट खोल आणि ५०० एकरांवर पसरलेला तलाव बांधायच ठरलं. याचे मुकादम काही काळासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल रामजी सकपाळ असल्याच्या नोंदी आहेत. त्यांना राहण्यासाठी एक क्वार्टर देखील दिली होती.

त्यांच्यासोबत इथे बालपणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील काही काळ राहिल्याचे दै. ऐक्यचे स्थानिक पत्रकार दत्ता कोळी सांगतात.

पुढे तलाव बांधून पुर्ण झाला. यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो एकर जमीन ओलिताखाली आली. इथल्या दुष्काळी भागात पाण्याचा एक शाश्वत स्रोत तयार झाला. ज्या दुष्काळी भागात कुसळं देखील कशीतरी उगवत होती तिथे तलावातील पाण्यामुळे आजूबाजूचे वातावरण हिरवेगार होण्यास मदत झाली.

यामुळे इथे बदक, कांडे, करकुचे असे पक्षी येऊ लागले. 

१९७० नंतरच्या कालखंडात रोजगार हमी योजनेतील कामाद्वारे सामाजिक वनीकरण विभागाने जाणीवपूर्वक या तलावाच्या ६५ एकरच्या परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन केले.

यामुळे या परिसराचे अरण्यात रुपांतर होऊन पक्षांसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि निवार्‍यासाठी उंच झाडी व झुडपे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

१९८५ ला या वनक्षेत्राला पक्षी आश्रयस्थान म्हणून जाहिर करण्यात आले. याचेच रुपांतर पुढे मायणीचे इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य असे झाले. 

या अभयारण्यातील विशेष आकर्षण म्हणजे इथे येणारा खास पाहून फ्लेमिंगो पक्षी. दरवर्षी थंडीचे दिवस चालू की वृत्तपत्रांमधून फ्लेमिंगोच्या नयनरम्य दृश्यांचे फोटो येत असतात.

पण हजारो किलोमीटर अंतर पार करून हा पक्षी इथे का येऊ लागला. थंडीच्या दिवसातले या भागाचे वातावरण त्याच्यासाठी कसे पोषक झाले ?

याबद्दलच इन डिटेल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहे. 

मायणीचे हे पक्षी अभयारण्य छोटे असले तरी देशात नावलौकिक असलेले आहे. २००५ च्या आकडेवारीनुसार इथे सुमारे ४०० प्रकारचे पक्षी इथे येत असल्याची नोंद आहे. येथे येणाऱ्या पक्षांमध्ये फ्लेमिंगो सोबतच उत्तर ध्रुवावरुन येणारा किंगफिशर, कॉमन स्पून, बिल्स, पेंटेड स्टॉर्क, ब्लैक आइबिस, उत्तरी Shoveler, सारस हे परदेशी पक्षी देखील स्थलांतर करून येत असतात.

तर भारतीय पक्षांमध्ये कुट, ब्रम्हणी बदक, काळे बदक, बगळे, सुतार पक्षी, कर्कश आवाज करणारा कांडाकरकोचा, मोर – लांडोर , पोपट – मैना, मोरघार, पानकोंबडी अशाप्रकारचे अनेक स्थलांतरीत पक्षी हिवाळ्यातील ऑक्टोंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आढळतात. या जलाशयाशेजारी काही औषधी वनस्पती, कैक्टस देखील आढळतात.

या अभयारण्याबद्दल दै. ऐक्यचे स्थानिक पत्रकार दत्ता कोळी सांगतात,

या आश्रयस्थानाला कधीच सरकार दरबारी अभयारण्याचा दर्जा नाही. केवळ लोकांच्या तोंडून मागील २०-२५ वर्षांपासून ते रूढ झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर देखील अभयारण्य असाच उल्लेख आहे. मात्र हे ठिकाण पक्षांसाठी आज ही नंदनवन आहे. 

पण फ्लेमिंगो पक्षी इथे कसा आला? 

फ्लेमिंगो हा  फिनिकॉप्टेरीफॉर्मिस गणाच्या फिनिकॉप्टेरिडी  कुलातील पक्षी आहे. या पक्ष्याला हंसक असेही म्हणतात. या कुलात फिनिकॉप्टेरस  ही एकच प्रजाती असून जगात सर्वत्र फ्लेमिंगो पक्ष्याच्या सहा जाती आहेत.

त्यांपैकी मोठा फ्लेमिंगो (फि. रोझियस), लहान फ्लेमिंगो (फि. मायनर) या दोन जाती आफ्रिका, यूरोप आणि आशिया येथे आढळतात. भारतातही मोठा फ्लेमिंगो व लहान फ्लेमिंगो दोन्हीही आढळतात. (संदर्भ : विश्वकोश)

साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात झाल्यानंतर फ्लेमिंगोचे मायणी तलावावर आगमन होतं.

जेष्ठ पक्षी निरीक्षक जयंत वडतकर यांच्या म्हणण्यानुसार,

आपल्या इथे येणार फ्लेमिंगो हा गुजरात कच्छ वाळवंटामधील रहिवासी आहे. या वाळवंटामध्येच त्यांचा विणीचा हंगाम असतो. पावसाळ्यानंतर इथले पाणी आटले कि ते अन्नासाठी ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात करतात.

यावेळी महाराष्ट्रामधून जात असताना थंडीच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी ते ४ दिवसांपासून ते ४ महिन्यापर्यंत थांबतात. थांबण्यासाठी ते पहिल्यांदा अन्न आणि दुसरी गोष्ट बघतात ते म्हणजे सुरक्षितता.

हा पक्षी बेसिकली उथळ पाण्यामध्ये स्वतःचे अन्न शोधत असतो. तलावाच्या काठी दलदलीच्या भागामध्ये येणारे विशिष्ट प्रकारचे शैवाल हे या पक्षांचे आवडतं खाद्य. आणि महाराष्ट्रामध्ये ठाण्याच्या खाडीत, भिगवण, मायणी, सोलापूरचा उजनी तलाव इथले पाणी उथळ आहे.

तसेच शिकारीची भीती नसल्याने ते इथे ४ महिन्यांसाठी तरी थांबतात, ठाण्याच्या खाडीत तर १ लाख फ्लेमिंगो येतात असेही वडतकर सांगतात. 

तसेच पाणवनस्पती, बिया, डिंभ, पाणकीटक, लहान मासे, कोळंबी, खेकडे व शिंपले हे देखील त्याचे खाद्य आहे. जे याठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते. त्याने सेवन केलेल्या प्राणी-प्लवकातील व वनस्पती-प्लवकातील कॅरोटिनॉइड प्रथिनांवर यकृतातील विकरांची प्रक्रिया होऊन त्यांचे विघटन होते आणि रंगद्रव्ये तयार होतात. या रंगद्रव्यांमुळे रोहित पक्ष्याच्या शरीराचा रंग गुलाबी दिसतो. 

मायणीचा तलाव हा १८९० नंतर तयार झाला. पण त्यानंतर पुढील १०-१५ वर्ष त्यांना हवे असलेले शैवाल तयार होण्यास गेली असावीत. त्यामुळे मायणी परिसरात १९२० नंतर फ्लेमिंगो थांबण्यास सुरुवात झाली असावी असाही अंदाज त्यांनी वर्तवला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.