मिलिंद गायकवाड, व्हायरल व्हिडीओ मागची खाकी वर्दी ! 

काल सोशल मिडीयात एक व्हिडीओ व्हायरल झाला. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची झालेली बदली व त्यानंतर आलेला तो व्हिडीओ. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या बदलीनंतर अश्रू अनावर झाले. त्यामागची कारण अनेक असली तरी कायदेशीर बाजूने सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबरच त्यांची बदली झाल्याचं सांगितल जात आहे. 

केबल टाकणाऱ्या ठेकेदारास ५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप आमदारावर गुन्हा दाखल करुन आपलं कर्तव्य पुर्ण करणारा हा कोण अधिकारी म्हणून राजकारणाची समज असणाऱ्या अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या. पाठीमागून त्यांची बदली देखील झाली. आरोप प्रत्यारोप होवू लागले आणि याच दरम्यान काल एक व्हिडीओ फिरू लागला. यात मिलिंद गायकवाड यांना निरोप देणारे त्यांचे सहकारी, पोलिस कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले. पोलिस खात्यात दबाव निर्माण होणं, बदल्या होणं हि नित्याचीच गोष्ट मात्र एखाद्या सिनियर साठी अश्रू ढाळणारे कर्मचारी हि नवीनच गोष्ट होती. 

 

मिलिंद गायकवाड हे पुर्वी गुंडा स्कॉडला होते, त्यानंतर सांगवी पोलिस स्टेशन, शिवाजीनगर पोलिस स्टेशन व गेल्या चार महिन्यांपासून ते कोंढवा पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरिक्षक म्हणून नियुक्त होते.

अवघ्या १४ महिन्यांच्या काळात त्यांची बदली झाली असली तरी हि त्यांच्यासाठी नविन गोष्ट नाही कमी काळावधीत बदली होणं हे त्यांच्या देखील सवयीचच झालं आहे. 

कर्मचाऱ्यांना त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचं, भावनिक नात निर्माण होण्याच खर कारण त्यांच्या कामाच्या पद्धतीत असल्याचं सहकारी सागंतात, साधारण कोणताही गुन्हा पकडला गेल्यानंतर वरिष्ठांनी त्याचं श्रेय घेण्याची अघोषित प्रथा असताना ते मात्र कामाचं श्रेय प्रत्येक कर्मचाऱ्याला देत असतात. कोणतिही कारवाई केल्यानंतर चमकोगिरी न करता शांतपणे संबधितांना त्याच श्रेय देणं आणि आपलं काम करत राहणं हा त्यांचा महत्वाचा गुण सांगितला जातो. त्यांच्या याच कामामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना ते एका कुटूंबप्रमुखासारखे वाटतात. 

प्रत्येक ठिकाणी नियुक्त झाल्यानंतर त्यांच मुख्य काम म्हणजे परिसर भिकारीमुक्त करणं. याचा अर्थ असा नाही की भिक मागणाऱ्यांना ते दूसऱ्या हद्दीत सोडून येतात. तर त्यांचे पुर्नवसन करणाऱ्या NGO, संबधित कर्मचारी यांना विश्वासात घेवून भिकारीमुक्त करण्याचा टास्क हाताळला जातो. 

बोल भिडूच्या टिमने स्थानिक पत्रकार, त्यांचे कनिष्ठ यांच्यासोबत संपर्क साधल्यानंतर प्रत्येकांच्या तोंडून एक गोष्ट ऐकण्यास मिळाली,

ती म्हणजे त्यांच्याकडे तक्रार दाखल करण्यास गेलेल्या व्यक्तींची ते नेहमीच चांगल बोलतात. सामान्य माणसं अनेकदा पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणूकीला कंटाळून तक्रार दाखल करण्यास येत नाहीत. अशा वेळी शांतपणे समजून घेणारे अधिकारी पाहून अनेकांना धीर मिळतो. तूला सांगितलेलं कळत नाही का ? तू जा मी पाहतो ? अशी पारंपारिक उत्तर तक्रारदाराला कधीच मिळाली नाहीत. 

आज साधारण IPS, IAS अधिकारी दबंग अधिकारी म्हणून पुढे येतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना तितकच संरक्षण देखील प्राप्त असत. याचा अर्थ त्यांचे कर्तृत्व कमी होतं अस नाही तर तुलनेत कनिष्ठ असणारे अधिकारी देखील आज तितक्याच जोमाने भिडतात. आपलं कर्तव्य पुर्ण करण्यासाठी कोणताही दबाव झेलण्याची त्यांच्यात ताकद असते. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारे असे कित्येक अधिकारीच भारताची लोकशाही खऱ्या अर्थाने टिकवून ठेवून आहेत अस म्हणलं तर चुकिचं ठरणार नाही.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.