भारत जिंकावा म्हणून उपास करणारा अफगाणिस्तानचा धोनी…

अफगाणिस्तानची टीम हरली किंवा जिंकली तरी त्यांच्याबद्दल कायम मनात सहानुभूती असते. तसे ते आपले सक्खे शेजारी नाहीत, पण बीसीसीआयनं त्यांच्या क्रिकेट बोर्डाला प्रचंड मदत केली, प्रॅक्टिसाठी  एक सेपरेट ग्राऊंड दिलं, भारतासोबत मॅचेसही घेतल्या. बरं एवढं करुनही अफगाणिस्तानच्या टीमनंही बीसीसीआयसोबतचे संबंध चांगले ठेवले आणि भारताच्या मदतीचीही जाण ठेवली.

याचं मुख्य कारण म्हणजे अफगाणिस्तानचे प्लेअर्स. राशिद खान, मोहम्मद नबी हे प्लेअर्स तर जगभरातल्या लिग्स गाजवतात पण त्याहीपेक्षा लाडका अफगाणिस्तानचा प्लेअर म्हणजे विकेटकिपर बॅट्समन मोहम्मद शहजाद. त्याच्याकडं बघितलं की तो फारसा फिट प्लेअर वाटत नाही, पण गडी एकदा बॅटिंगला आला की धुव्वा उडवत असतोय. मोहम्मद शहजाद प्लेअर म्हणून जसा भारी आहे अगदी तसाच ग्राऊंडच्या बाहेरही. आपल्या सेहवागसारखा कसलाच लोड न घेणारा कार्यकर्ता.

अफगाणिस्तानचे बरेच क्रिकेटर्स लहानाचे मोठे झाले ते रेफ्युजी कॅम्पमध्ये, शहजादचंही तसंच. रेफ्युजी कॅम्पमध्ये तो आणि त्याचे मित्र प्लॅस्टिकच्या ट्रॉफीचं बक्षिस ठेऊन क्रिकेट खेळायचे. त्यांच्यात जिंकणं, हरणं या सगळ्याची इर्षा नव्हती, क्रिकेट त्यांना आनंद देतं हीच गोष्ट प्रचंड मोठी होती.

पण शहजादनं आपल्याला कधी देशासाठी खेळता येईल अशी अपेक्षाही केली नव्हती, कारण आपल्या देशाची टीम असू शकते यावरच विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी कठीण होतं.

मात्र या गोष्टी घडून आल्या, अफगाणिस्तानची टीम मैदानात उतरली आणि त्यांचे प्लेअर्स सुपरस्टारही झाले. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पैसे मिळाले, ओळख मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आवडत्या प्लेअर्सला भेटायची संधीही.

मोहम्मद शहजादचा सगळ्यात आवडता प्लेअर म्हणजे एमएस धोनी. 

नावातल्या साधर्म्यामुळं त्याचे टीममेट्सही त्याला एमएस म्हणायचे आणि शहजादही धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, विकेटकिपींग स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा. त्याची मनापासून इच्छा होती की एकदा तरी धोनीला भेटावं. त्याला हा चान्स मिळाला २०१० मध्ये. 

भारताची टीम वेस्ट इंडिजमध्ये होती आणि ज्या हॉटेलमध्ये टीम राहत होती तिथंच मोहम्मद शहजादही होता. धोनीनं त्याला आपल्या चौथ्या मजल्यावरच्या रुममध्ये बोलावलं. 

शहजाद थोडा घाबरत घाबरतच गेला. धोनीनं त्याला चहा प्यायला बोलावलं होतं. शहजादची गोची तेव्हा झाली जेव्हा धोनी स्वतः त्याच्यासाठी चहा कपमध्ये ओतायला लागला, शहजाद लाजून नको म्हणला पण धोनीनं आग्रह करुन चहा दिलाच. या दोघांची दोस्ती इतकी वाढली की पुढं जाऊन धोनीनं शहजादची ओळख करुन देताना ‘आपला मित्र’ अशीच करुन दिली. याचा शहजादला आजही अभिमान वाटतो.

पण या दोघांच्या दोस्तीची आणखी भारी गोष्ट म्हणजे, २०१५ मधला किस्सा.

मोहम्मद शहजादनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं की, ‘मला दोन गोष्टी सगळ्यात जास्त प्रिय आहेत, झोप आणि खाणं. मी क्रिकेट खेळत असलो तरी या दोन गोष्टींचा कधी त्याग करु शकत नाही.’ असं असलं तरी शहजादनं या दोन्ही गोष्टी एकदा सोडल्या होत्या आणि त्याचं कारण ठरलेलं, एमएस धोनी.

भारताची श्रीलंकेविरुद्ध मॅच होती, धोनी त्या सिरीजमध्ये फिट नव्हता. पण त्या मॅचमध्ये मैदानात उतरला, मॅच नेमकी शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचली गेली. महिना सुरु होता रमजानचा. शहजादचा उपास होता आणि नेमकी इफ्तारची वेळ झाली होती. 

पण धोनीची बॅटिंग बघणं त्याला मिस करायचं नव्हतं. तो मॅच बघत राहिला आणि एवढीच मागणी केली की ही मॅच धोनीनंच फिनिश करावी. याच नादात त्याचं जेवणही राहिलं आणि झोपही…

त्यापेक्षा शहजादला सगळ्यात जास्त आनंद एकाच गोष्टीचा झाला होता, त्याचा मित्र, त्याचा सुपरहिरो जिंकल्याचा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.