रजनीकांत जसा कंडक्टर पासून सुपरस्टार झाला तसेच मोहन जोशी ट्रक-ड्रायव्हर पासून स्टार झाले
एका मुलाखतीमध्ये सुबोध भावेला विचारण्यात आलं होतं, ‘जे सध्याचे नट आहेत, त्यापैकी कोणाच्या आयुष्यावर बायोपीक निघु शकतो.’ त्यावेळी सुबोधने उत्तर दिलं होतं मोहन जोशी. मोहन जोशींचं आयुष्य इतकं नाट्यमय घटनांनी भरलेलं आहे की त्यावर एक चांगला बायोपीक नक्कीच निघु शकतो, असं सुबोधचं म्हणणं. आणि अगदी खरं आहे हे.
मोहन जोशींच्या आयुष्यावर एक नजर टाकली की, ट्रक ड्रायव्हर ते एक यशस्वी अभिनेता हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे.
मोहन जोशी सुरुवातीला किर्लोस्कर ऑईल कंपनीमध्ये नोकरी करायचे. सात-आठ वर्ष त्यांनी हि नोकरी केली. परंतु याच दरम्यान नाटकांचे दौरे करत असल्याने मोहन जोशींच्या कामावर खुप सुट्ट्या व्हायच्या. त्यामुळे ‘एकतर नाटक तरी करा किंवा नोकरी तरी’ असं कंपनीकडुन सांगण्यात आलं. मोहन जोशींच्या मोठ्या भावाचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय होता. त्यामुळे मोहन जोशींनी नोकरीचा राजीनामा दिला आणि भावाच्या व्यवसायात सामील झाले.
यानंतर मात्र मोहन जोशींनी ट्रक, टेम्पो, नाटकाच्या बसेस चालवल्या. हेच काम करता करता ‘घरोघरी बोंबाबोंब’ हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांना मिळालं. यात त्यांना शरद तळवलकरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या पहिल्याच नाटकाच्या ३३० प्रयोगांमध्ये मोहन जोशींनी काम केले.
दिग्दर्शक रवी नमाडे हे मोहन जोशींचे मित्र. एकदा सहज बोलता बोलता ‘मोन्या मी एक पिक्चर करतोय, तु त्यात काम करणारेस!’ असं नमाडेंनी मोहनला सांगीतलं. नमाडेंचा स्वभाव थोडासा मिश्किल असल्याने मोहन जोशींना हि सर्व मस्करी वाटली. लगेचच नमाडे स्कुटरवरुन जोशींना सासवडला लोकेशन बघायला घेऊन गेले. तिथे गेल्यावर इतकी माणसं पाहुन मोहन जोशींचा नमाडेंच्या बोलण्यावर विश्वास बसला.
सिनेमा होता ‘एक डाव भुताचा’.
या सिनेमात मोहन जोशी मुख्य खलनायक साकारणार होते. जेव्हा शुटींग सुरु झालं तेव्हा मोहन जोशी मेकअपला बसले. मेकअपमन करणारे दळवी दादा हे मोहनजींपेक्षा वयाने मोठे. त्यांच्याकडुन मोहन जोशींना कळालं की सिनेमात मुख्य खलनायकाचा रोल रंजनाचा भाऊ श्रीकांत देशमुख करणार आहे. अचानक काय झालं हे जोशींना कळेना. ‘कोणीही परका पुरुष माझ्या अंगाला हात लावणार नाही’, असा रंजनाचा पवित्रा होता.
त्यामुळे मुख्य खलनायक मोहनजींना साकारता आला नाही. खलनायकासोबत जे चार पाच गडी असतात, त्यातला एक गडी मोहन जोशी होते. आणि अशाप्रकारे ‘एक डाव भुताचा’ मधुन मोहन जोशींची सिनेकारकीर्द ख-या अर्थाने सुरु झाली. या सिनेमात रंजना, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर झळकले होते.
मोहन जोशी एकदा कुटूंबासोबत रत्नागिरीस देवदर्शनाला जात असताना त्यांच्या ड्रायव्हरला गाडी चालवता चालवता डुलकी आल्याने गाडीचा मोठा अपघात झाला. सुदैवाने जोशी कुटूंब त्यात बचावले. या घटनेनंतर मोहन जोशी स्वतःची गाडी स्वतःच चालवतात.
जोशींना ड्रायव्हिंगची इतकी आवड आहे की पौर्णिमेच्या रात्री पुर्ण चंद्राच्या प्रकाशात हेडलाईट बंद करुन ते गाडी चालवतात. गाडी चालवताना लता मंगेशकर-मोहम्मद रफी यांची गाणी ऐकण्याची त्यांना हौस आहे.
मोहन जोशींचा अलीकडे गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे ‘देऊळ बंद’. या सिनेमाचा सुद्धा असाच एक किस्सा आहे. प्रवीण तरडे मोहन जोशींना ‘मोजो’ म्हणतात. तरडे मोजोंकडे ‘देऊळ बंद’ मधील स्वामी समर्थांची भुमिका घेऊन आले. शेवटी दोन मेकअप झाल्यानंतर तिस-या मेकअपच्या वेळेस स्वामींची भुमिका आपण करु शकु, असा जोशींना विश्वास बसला. नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे सिनेमाचा मुहूर्त झाला.
स्वामी झोपुन विश्रांती घेत असल्याच्या हावभावात ‘देऊळ बंद’ मधील मोहन जोशींचं भलंमोठं पोस्टर लावण्यात आलं होतं. मोहन जोशी पोस्टरकडे पाहतच राहिले. तेव्हा जोशींचे केस वाढले असल्याने त्यांना कोणी ओळखलं नाही.
मंदिरातल्या एका गृहस्थांनी मोहन जोशींची सर्वांना ओळख करुन दिली. हे ऐकताच मोहन जोशी जेव्हा जायला निघाले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या १५ ते १६ हजार लोकांनी मोहन जोशींच्या पाया पडुन नमस्कार केला. मोहन जोशींनी हिंदीतही अनेक भुमिका साकारल्या.
परंतु सतत खलनायकी भुमिका येत असल्याने ‘गंगाजल’ नंतर हिंदी सिनेमांमध्ये काम करणं त्यांनी बंद केलं.
नाना पाटेकरांचा ‘नटसम्राट’ सिनेमा येण्याआधी दिग्दर्शक राजदत्त मोहन जोशींना घेऊन ‘नटसम्राट’ सिनेमा करणार होते. यासाठी राजदत्त आणि मोहन जोशी एकदा वि. वा. शिरवाडकरांना भेटायला गेले. परंतु डाॅ. श्रीराम लागूंनीच नाटकाप्रमाणे सिनेमात आप्पासाहेब साकारावेत, आणि नाटकातील विठोबाची भुमिका मोहन जोशींनी साकारावी याबाबतीत शिरवाडकर आग्रही होते. खुद्द ‘नटसम्राट’ ज्यांनी लिहिलं अशा शिरवाडकरांची इच्छा नाही, असं कळाल्यावर मोहन जोशींनी सुद्धा आप्पासाहेब करण्याची इच्छा बाजुला सारली.
पुढे हा सिनेमा आला नाहीच. पण २०१८ साली ‘नटसम्राट’ हे नाटक पुन्हा रंगभुमीवर आलं आणि नाटकात मोहन जोशींनी अप्पासाहेब बेलवलकरांची प्रमुख भुमिका साकारली.
नाट्यपरिषदेचं अध्यक्षपद मोहन जोशींनी भुषवलं. या काळात त्यांचे अनेकांशी मतभेद झाले. तरीही त्यांनी त्यांचं काम सुरु ठेवलं. आज नव्या कलाकरांसाठी मोहन जोशी हे आदर्श आहेत. पुर्वी बस कंडक्टर असलेला रजनीकांत आज साऊथ इंडस्ट्री गाजवतोय, तसंच ट्रक ड्रायव्हर असलेले मोहन जोशी आज मराठी सिनेमा, मालिका, नाटक अशा तिनही क्षेत्रात त्याच सळसळत्या ऊर्जेने काम करतायत.
हे ही वाच भिडू
- त्या क्षणापासून पाटलाचा पोरगा सिनेमात नाच्या झाला
- रजनीकांत कुठे बसकंडक्टर होता? कोल्हापूर, बेळगाव की बेंगलोर?
- जगजितसिंह विरुद्घ पुरुषोत्तम जोशी !