१०० विकेट्स काढलेले बॉलर आठवत नाहीत, पण मुधसूदेन पानेसर एका विकेटमुळं लक्षात राहिलाय

साल होतं २००६, मार्च महिना. नागपूरचं टळटळीत ऊन. डोक्यावर पेपर धरुन लोकं स्टेडियममध्ये बसली होती, उन्हाची चिंता न करता रस्त्यांवरच्या टीव्हीवर गर्दी जमलेली. कारण अगदी सोपं होतं, सचिन तेंडुलकर बॅटिंग करत होता.

तेवढ्यात एक बॉलर आला, डोक्याला आपला हरभजन बांधतो तशी पगडी बांधलेली, डोळे अगदी मोठे, हातात चकाकणारं कडं. त्या बॉलरची पहिलीच मॅच होती आणि भारतात सगळ्यात जास्त चर्चाही त्याचीच होती, याचं कारण त्याच्या नावात होतं. पोराचं नाव भारतीय, दिसणं भारतीय… पण टीम इंग्लंड.

या चर्चांनी कळस गाठला, जेव्हा पानेसरनं सचिनला आऊट केलं. आपल्या करिअरमधली पहिली विकेट कोण? तर फॉर्मात असलेला सचिन तेंडुलकर. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते?

हा कार्यकर्ता होता मुधसूदेन पानेसर उर्फ मॉन्टी पानेसर.

तुम्ही मॉन्टी पानेसरला हिंदी बोलताना अनेकदा पाहिलं असेल. कारण भाऊ आहे पंजाबी, लुधियानाचा. पण जन्मला इंग्लंडमध्ये. त्याचं झालं असं की, मॉन्टीचे आई-पप्पा लुधियानाचे. पण करिअर करायला ते गेले इंग्लंडला. तिथं त्यांना पोरगं झालं.

मॉन्टीचे पप्पा बिल्डर, ब्रिटिश रिअल इस्टेस्ट मधलं मोठं नाव. मॉन्टीला क्रिकेट आवडत होतं, पप्पा म्हणले, ‘खेळ की, पण एक अट आहे पंजाबी भाषेचे क्लासेस आणि शीख धर्माची शिकवणी या गोष्टी अटेंड करायच्या. त्या बदल्यात तुला कारनं सोडायला येईल.’ मॉन्टी तसा कंटाळायचा पण क्रिकेटच्या नादापायी सगळं करायचा.

इंग्लंडची अंडर-१९ टीम, फर्स्ट क्लास क्रिकेट असे वेगवेगळे टप्पे पार करत त्यानं इंग्लंडच्या मुख्य संघात जागा मिळवली. क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडमध्ये स्पिनर्सची फार मोठी अशी परंपरा नव्हती. अगदी जुन्या काळातल्या भारी स्पिनर्सनंतर बऱ्यापैकी कामचलाऊ कारभार होता.

त्यामुळं मॉन्टी पानेसरकडं मोठी संधी होती. 

त्याच्या आयुष्यातली पहिली कसोटी होती, नागपूरला. पण त्यात तो पास झाला. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये सचिन तेंडुलकरला आऊट केलं, ९१ वर खेळणाऱ्या मोहम्मद कैफला बोल्ड केलं. दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी एक मोठी विकेट काढली, डिफेन्सचा बादशहा, भारताची भिंत राहुल द्रविड.

पहिल्याच कसोटीत तीन मोठ्या विकेट्स घेतल्यानं मॉन्टीची हवा झालेली. पाकिस्तान दौऱ्यात पण त्याची जादू चालली. इंग्लंडला मोठा स्पिनर मिळाला असं बोललं जाऊ लागलं. 

तो आणि ग्रॅमी स्वॅन मिळून समोरच्या बॅटिंग लाईनअपचा बाजार उठवत होते. आधीच भारी असलेली इंग्लंडची टीम आता आणखी बलवान झाली.

मॉन्टी काही महिन्यांतच टेस्ट रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचला.

२००८ नंतर मात्र गोष्टी गंडत गेल्या. त्याचा फॉर्म हरपला. विकेट्स मिळेना झाल्या. त्यानं स्वतःमध्ये काय बदल करावेत, यावरुन इतकी मतं आलं की तो स्वतःच कन्फ्युज झाला. सामान्य फॅन्सही त्याला ‘व्हेरीएशन्सचं काय झालं?’ असा प्रश्न विचारुन डिवचू लागले.

२०१३ पर्यंत तो इंग्लिश संघाकडून खेळत राहिला. पण त्याचवेळी एक किस्सा झाला. भाऊ एका नाईटक्लबमध्ये मोप दारू पिला. उजाडायला आलं, तेव्हा बाऊन्सरनं तिथून जायला सांगितलं. तर यानं बाउन्सरवरच लघुशंका केली… या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आणि तिथून गोष्ट गंडली, ती गंडलीच.

पण मॉन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडायचं हे एकमेव कारण नव्हतं. तो स्वतःच मान्य करतो की, ‘मला स्वतःमध्ये सुधारणा घडवता आल्या नाहीत. मी नवीन गोष्टी शिकलोच नाही.’

त्यात भावाची फिल्डिंग म्हणजे एक वेगळाच किस्सा होता. 

बॉल साईडनं गेल्यावर मग हा डाईव्ह मारायचा. यानं कॅच पकडला की इंग्लंडच्या टीमचाही विश्वास बसायचा नाही. मॉन्टीचं अपील करणं ही सुद्धा कॉमेडी गोष्ट होती. विकेट मिळाल्यावर दोन उड्या मारायचा आणि पळत सुटायचा. आपल्या टीममेटला टाळी द्यायला हात तर उंचावायचा पण ९९ टक्के वेळा टाळी हुकायचीच.

तसं म्हणलं, तर भारतीय वंशाचा प्लेअर इंग्लंडकडून खेळतोय. लोकं त्याचा चेहरा असलेले मास्क घालून स्टेडियममध्ये येतायत. हे बघून भारतीयांना आनंद व्हायला पाहिजे, पण तसं घडलं नाही. मोहालीमध्ये मॅच असताना, बाऊंड्री लाईन बाहेरच्या लोकांनी त्याला डायरेक्ट गद्दार म्हणून आवाज द्यायला सुरुवात केली.

त्यांचं म्हणणं होतं, की ‘यानं भारतासाठी खेळायला हवं होतं.’

चांगला क्रिकेटर असूनही त्याला भारताकडून प्रेम मिळालं नाही. रिटायरमेंटनंतर त्यानं स्वतःची क्रिकेट अकादमी सुरू केली, भारतातल्या गरीब मुलांना शिकवायची त्याची फार इच्छाही होती. पण गणित जुळलं नाही.

त्यातच काश्मीर प्रीमिअर लीगमध्ये सहभाग घेतल्यावरुन त्याच्यावर लय टीका झाली. भावानं काळाची पावलं ओळखली आणि गप माघार घेतली.

काश्मीर लीगचं प्रकरण तसं गाजलं, पण आजही मॉन्टी पानेसरचं नाव घेतलं की, आपल्याला उंचपुरा तगडा शीख आठवतो, त्याची पगडी आठवते आणि त्यानं आधी नागपूरला आणि मग वानखेडेवर काढलेली सचिनची विकेट आठवते!

हाच तो बोल्ड ज्यामुळं मॉन्टी भारतीय चाहत्यांसाठी तरी अजरामर झाला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.