मुहम्मद सिनेमा आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्राकडे सिनेमावर बंदी घालण्याची केलेली मागणी

2015 मध्ये रिलीज झालेला मजीद माजिदीचा मुहम्मद हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येतोय, तर त्यावर बंदी घालावी अशी मागणी रझा अकॅडमीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली, आणि गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला तातडीने पत्र लिहीत या सिनेमाच्या ऑनलाईन प्रदर्शनावावर बंदी घालावी अशी विनंती केली आहे.

त्याचवेळी हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार होता, तेव्हा दोन गोष्टी झाल्या.

एक म्हणजे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. दुसरी गोष्ट म्हणजे, या सिनेमाला पार्श्वसंगीत दिले म्हणून रझा अकॅडमीने रहमान विरुद्ध फतवा काढला.

(रहमानने त्याविरुद्ध जे पत्र प्रसिद्ध केले ते वाचण्यासारखे आहे.)

या रझा अकॅडमीने काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात प्रदर्शन केले होते. त्यानंतर तिथे जमलेल्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सर्वसामान्य मुस्लिम व्यक्तीला आजही मान खाली घालावी लागते.

रझा अकॅडमीची पार्श्वभूमी ही अशी आहे. ती गृहमंत्र्यांना माहीत नाही काय? या अशा संघटनेला पॅट्रोनाइज का करावे वाटते पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारला?

अशा संघटना मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करतात असा समज समाजाने आणि शासनाने करून घेतला असेल तर तो वस्तुस्थितीला धरून नाही. समाजाने याविषयी व्यक्त व्हावे. तुमच्या राजकीय- सामाजिक प्रश्नांवर कायम यांच्या धार्मिक प्रश्नांनी कडी केली आहे. जोवर ही मुल्ला मौलवी तुमच्या अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करत असतील, तोवर तुम्हाला मला भविष्य नाही हे लक्षात घ्या. यावर व्यक्त व्हा.

आता मूलभूत मुद्याकडे येतो. इस्लाममधील काही पंथांमध्ये पैगंबर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे चित्रण आज निषिद्ध मानले जाते. (आज शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण या सर्वांचे चित्रण केलेली अनेक चित्रं मुस्लिम कलाकारांनी काढली आहेत मध्ययुगात. ती सर्व ऑनलाईन उपलब्ध आहेत.)

मजिद माजीदीच्या प्रतिभेविषयी आणि त्याच्या चित्रपटाविषयी विस्तारभयामुळे लिहिणं टाळतोय. त्याने हा सिनेमा बनवला कारण त्याला मुहम्मद पैगंबराचे पॉप कल्चर मध्ये होत असलेले विकृतीकरण थांबवायचे होते, त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करायचे होते. त्यातूनच अतिशय कष्टाने त्याने हा सिनेमा बनवला. चित्रपटाला संगीत देण्यामागेही रेहमानची भूमिकाही अशीच होती.

सिनेमाला इराण सरकारकडून बऱ्यापैकी सहकार्य मिळाले. मुहम्मद Trilogy तील हा पहिला सिनेमा आहे, आणखी दोन यायचे आहेत. (या भागात पैगंबरांच्या जन्मापर्यंतचे अरबी जीवन दाखवले आहे फक्त.)

इराण शिया बहुल देश. शिया पंथीय पैगंबर आणि त्यांचे सहकारी (विशेषतः अली) यांच्या चित्रणाविषयी काही अंशी लिबरल आहेत.

भारतात सुन्नी बहुसंख्य आहेत, जवळपास 80-85 टक्के. सिनेमा आला तेव्हा किंवा आत्ताही या सिनेमविरोधात त्यांनी काही आक्रीत केल्याचे ऐकिवात नाही. असे असूनही रझा ऍकॅडमी सारख्या संस्थेच्या मागणीवर प्रोऍक्टिव्ह व प्रॉम्प्ट भूमिका घेणाऱ्या शासनाचा विरोध व्हायला हवा तो अशा संघटनांचे प्रतिनिधित्व समाजाच्या माथी मारण्यासाठी.

यांच्या मिस्ड प्रायोरिटीजचा भुर्दंड मात्र सामान्य मुस्लिमांना भोगावा लागतोय (या निमित्तानेही भोगावा लागेल) मुस्लिमांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक समस्यांवर भूमिका घेण्याऐवजी या असल्या मुल्ला मौलवींपुढे लोटांगण घालून मुस्लिम सुखावतील, आणि स्वस्तात काम होईल ही पूर्वापार चालत आलेली प्रथा या सरकारनेतरी बंद करावी, ती कशी बंद करायची याची जबाबदारी सुशिक्षित आणि तरुण मुस्लिमांची आहे, त्यांनी भूमिका घ्यायला हवी.

पैगंबरांचे चित्रण करणे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे, इतरांनी ते केले तर त्यावर यांनी आक्षेप घेणे अनैतिक आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजाने अशी जबरदस्ती धुडकावून लावायला हवी. (या सिनेमात पैगंबरांचा चेहरा वगैरे दाखवण्यात आलेला नाही, कारण सिनेमा जन्मापर्यंतच आहे. दोन भाग अजून येणार आहेत.)

सुन्नी मुस्लिमांच्या, मुल्ला मौलवींच्या भावना दुखावणार असतील तर त्यांनी सिनेमा बघू नये, त्यांच्यावर कुणीही जबरदस्ती केलेली नाही, तसा कोणता कायदाही नाही. सलमान खानच्या सिनेमाने माझा इंटलेक्ट दुखावला जातो, म्हणून तो इतर कुणीच बघू नये अशी मागणी मी माननीय गृहमंत्र्यांकडे केली तर ते तातडीने केंद्राला पत्र लिहिणार काय?

माझ्या भावना एखाद्या सिनेमामुळे दुखावतात म्हणून इतरांनीही तो बघू नये हा सांस्कृतिक दहशतवाद नाही काय?

हा सिनेमा मी पाहिला आहे, तो ऑनलाईन उपलब्ध आहे. (फेसबुकवरही आहे. muhammad majid majidi movie असं सर्च केलं फेसबुक सर्च बॉक्समध्ये, तरी मिळून जाईल, हार्डकोडेड इंग्लिश सबटाईटल्ससह) सरकारने ऑनलाईन रिलीजवर बंदी आणली तर मजीद माजिदी आणि रहमानच्या चाहत्यांना तो पाहता यावा याची सोय मी करेन. (कोरोना नसता तर सामूहिकपणे पाहिला असता) काळजी नसावी.

– हाजी समीर दिलावर शेख.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.