उज्बेकिस्तानचा व्यापारी कसा झाला मुंबईचा “हाजी अली”.
मुंबईचा “हाजी अली दर्गा”. समुद्राच्या काही मीटर आत असणाऱ्या या दर्ग्यामध्ये न गेलेला मुंबईकर भेटणं तस कठिणच. धर्माच्या पलीकडे जावून भारतीय संस्कृतीचा भाग म्हणून हाजी अलीच्या दर्ग्यास अनेकांनी भेट दिली असेल. धुप आणि अत्तराच्या सुगंधामध्ये संध्याकाळी दिसणारं हाजी अलीचा सौंदर्यं नेमकं कस असतं ते शब्दात सांगण्याची गरज देखील नाही.
पण तुम्हाला माहित आहे का ज्या “हाजी अलींच्या” नावाने हा दर्गा ओळखला जातो ते हाजी अली नेमके कोण होते.
हाजी अलींचा जन्म भारतापासून कोसो दूर असणाऱ्या उज्बेकिस्तानचा. उज्बेकिस्तानच्या बुखारा शहारात या सधन व्यापारी कुटूंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून असणारी श्रीमंती हाजी अलींनी पाहिली होती. सधन कुटूंबातल्या या अली बंधूंनी ठरवलं की आपण मुस्लीम धर्माच्या प्रचारासाठी विश्वयात्रा करायची. मुस्लीम धर्माच्या प्रचारासाठीच भटकतं असताना हाजी अली अर्थात सैय्यद पीर हाजी अली शाह बुखारी मुंबईत आले. आपल्या भावंडासोबत ते मुंबईत आले आणि मुंबईचे होवून बसले.
काही महिन्यानंतर त्यांना इतर ठिकाणी देखील मुस्लीम धर्माचा प्रचार करण्यासाठी जायचं होतं पण हाजी अली यांनी आपल्या आईला पत्र लिहलं. या पत्रात त्यांनी सांगितलं. आत्ता मी भारताचा झालो आहे. मी इथेच राहून मुस्लीम धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल. आत्ता भारत हेच माझ्यासाठी घर झालं आहे. आत्ता हाच माझा देश !
आज ज्या खडकावर हाजी अली दर्गा आहे त्याचं खडकावर उभा राहून ते सुफी संप्रदायाची शिकवण देवू लागले. अशातच हाजी अलींना हजच्या यात्रेला रवाना व्हायचं होतं.
ते हजच्या यात्रेला गेले मात्र काही दिवसातच त्यांच प्रेत त्याचं खडकाजवळ त्यांच्या अनुयायांना आढळून आलं.
हाजी अलींचा मृत्यू कसा झाला हे गुढ !
हाजी अलींचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अनेक वेगवेगळे तर्क दिले जातात. काहींच्या मते ते हज यात्रेवरुन आले होते त्यानंतर ते त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी गेले व त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. तर काहींच्या मते त्यांचा मृत्यू हज यात्रेच्या दरम्यान झाला. मात्र त्यांनी मला मुंबईतच मृत्यू यावा अशी मनोकामना केली होती. त्यांच प्रेत समुद्राच्या लाटेवरुन वाहत मुंबईपर्यन्त आलं. अनुयायांच्या या कथा त्यांच्या श्रद्धेचा भाग असाव्यात मात्र हाजी अलींचा मृत्यू झाला हे एकमेव सत्य सर्वांनाच मान्य करावं लागलं होतं.
त्यानंतर ज्या ठिकाणी हाजी अली अनुयायांना पाठ शिकवत त्याच खडकावर त्यांचा दर्गा बांधण्यात आला.आज मात्र या खडकावर असणारा “हाजी अलीचा” दर्गा खऱ्या अर्थाने मुंबईकर झाला आहे.
हे ही वाचा –
- मुंबई हे शहर जगभरात ‘गे कॅपिटल’ म्हणून ओळखलं जायचं !!!
- मुंबईतली पहिली दंगल कुत्र्यांमुळे झाली होती, ती पण खऱ्याखुऱ्या !!!
- मुंबईला वाचवणारा जंजीर.