भारताच्या रेसरला त्याच्या बायकोनंच असं मारलं की, हा मर्डर आहे हेच पोलिसांना ३ वर्षांनी सापडलं

शर्यतीचं खुळ कुणाला नसतंय ओ ? नाव माहीत नसतात तरी रात्र रात्र जागून आपण फॉर्म्युला वन बघतो. बैलगाडा शर्यत म्हणजे असा नाद ज्याला जगात तोड नाही. टू व्हीलरचा मुद्दा आला की, आपणच गाड्या रिंगवत रेस खेळलेलो असतोय. काहीही म्हणा, टू व्हीलरच्या रेस असतात लई बाप.

या रेसबद्दल शोधता शोधता आम्हाला एका रेसरची स्टोरी सापडली, हा गडी रेस जिंकून, गाडी पळवून फेमस नाही झाला, हा फेमस झाला मेल्यानंतर. कारण एखाद्या रेसमध्ये असतं तसलं थ्रिल या रेसरच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये होतं. त्याला कुणी मारलं हे शोधायला थोडी नाही, तर ३ वर्ष लागली.

अस्बाक मोन हा भारताचा इंटरनॅशनल बाईक रेसर. बराच काळ दुबईत घालवल्यानंतर तो भारतात बँगलोरमध्ये स्थायिक झाला. चांगलं करिअर, प्रॉपर्टी आणि सुमेरा परवेज नावाची बायको असं वरुन वरुन पाहिलं तर अस्बाकचं आयुष्य निवांत वाटणारं होतं.

२०१८ च्या ऑगस्ट महिन्यात जैसलमेरमध्ये एक रेस होणार होती. अस्बाक या रेसमध्ये भाग घेणार होता. रेसचा ट्रॅक पाहण्यासाठी आणि त्याची रेकी करण्यासाठी तो संजय कुमार, अब्दुल साबिक आणि विश्वास एसडी यांच्यासोबत जैसलमेरला गेला.

ट्रॅकची रेकी केल्यानंतर अस्बाक प्रॅक्टिससाठी गेला. मात्र त्याचदिवशी रात्री त्याच्यासोबत असणाऱ्या संजयनं पोलिसांमध्ये अस्बाक गायब झाल्याची तक्रार केली. 

पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा त्यांना अस्बाकचा मृतदेह सापडला. मात्र कोणतीही मोठी जखम नव्हती, त्यामुळं नेमकं काय झालंय हे ओळखायचा मार्ग नव्हता. पोलिसांनी प्राथमिक तपासात वाळवंटात हरवल्यानं आणि अन्न पाण्याशिवाय राहिल्यानं त्याचा मृत्यू झालाय असा अंदाज लावला. त्याच्या पाठीला दुखापत झाली, मात्र ती गाडीचा अपघात झाल्यानं झाली असावी, असा तर्क लागला. त्याच्या बायकोकडे चौकशी केली, तेव्हा तिनं सांगितलं की, ‘माझा कुणावर संशयही नाही.’ त्यामुळं पोलिसांनी केस बंद केली.

काही दिवसांनी अस्बाकची आई पुढं आली आणि तिनं एक खुलासा केला की, अस्बाक आणि त्याची बायको सुमेरामध्ये सगळं काही आलबेल नव्हतं. त्यांच्यात कायम वाद व्हायचे. तेव्हा पोलिसांना या मृत्यूमध्ये काहीतरी काळंबेरं असावं असं वाटलं. त्यांनी पुन्हा फाईल उघडल्या, तपास सुरू झाला.

पोलिसांनी पुन्हा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिला, तेव्हा अस्बाकच्या पाठीचं हाड मोडलं होतं, या गोष्टीनं त्यांचं लक्ष वेधलं. हा मोडण्याचं कारण अपघात असं नमूद केलेलं असलं, तरी गाडी मात्र स्टॅन्डला लावलेली होती. गाडीला हेल्मेट तसंच होतं आणि गादीवर साधा ओरखडाही आलेला नव्हता. भूक लागून मेला म्हणायला, पोटात अन्नही सापडलं.

आता तपासाला वेग आला, त्यात त्याच्या बायकोचं अफेअर असल्याचं समोर आलं. 

त्यामुळं चक्र आणखी वेगानं फिरली. पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं पण तिनं यायला नकार दिला. त्यामुळं पोलिसांचा संशय बळावला. तेव्हा सगळ्यात आधी निशाण्यावर आले अस्बाकच्या सोबत असलेले त्याचे मित्र.

त्यातला दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि २०२१ मध्ये तब्बल ३ वर्षांनी अस्बाकच्या हत्येचा उलगडा झाला.

त्याच्या हत्येची सुपारी दिली होती, त्याच्या बायकोनं. तिचं नीरज नावाच्या एका व्यक्तीसोबत अफेअर होतं आणि या दोघांचा डोळा होता अस्बाकच्या दुबई आणि भारतातल्या प्रॉपर्टीवर. जेव्हा अस्बाक गाडी चालवत होता, तेव्हा संजय कुमार त्याच्या पुढं होता, तर विश्वास मागं. जाता जाता ते थांबले आणि त्यांनी अस्बाकच्या मणक्यावर वार केला. वर त्याचं तोंड रेतीत खुपसलं. ज्यामुळं त्याचा गुदमरुन मृत्यू झाला. 

पुढे पोलिस तिथं तपास करण्यासाठी आले, तेव्हा संजयनं अस्बाकचा मोबाईल उचलला आणि त्यातले सगळे पुरावे नष्ट केले.

प्राथमिक तपासात रक्ताचा थेंबही गळाला नाही त्यामुळं हत्येचा संशय आला नाही आणि अस्बाकच्या गाडीचा अपघात झाल्याचं कारण चपखल बसलं. साहजिकच पोलिसांनी फार तपास न करता केस बंद केली. मात्र जेव्हा अस्बाकची आई पुढं आली, तेव्हा पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. संजय कुमार, विश्वास, अस्बाकची बायको आणि आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल झाले.

आपल्या नवऱ्याची सुपारी त्याच्याच मित्रांना देण्याचा मास्टरप्लॅन सुमेराचाच होता, मात्र जेव्हा ती पोलिसांच्या रडारवर आली तेव्हा तिनं कल्टी मारायचं ठरवलं. ती पोलिसांना गुंगारा देत राहिली, पण मे २०२२ मध्ये तिला पकडण्यात तपास करणाऱ्या तुकडीला यश आलं.

खून करताना अस्बाकचं रक्त वाहिलं नव्हतं, त्याचा खून गळा दाबूनही झाला नव्हता, तर वाळवंटातल्या रेतीत तोंड घालून त्याला मारण्यात आलेलं. तेही त्याच्याच मित्रांनी, मारण्याची सुपारी आलेली त्याच्या बायकोकडून. नाती, मैत्री या गोष्टींपेक्षा हव्यास जिंकला आणि भारत एका उदयोन्मुख रेसरला मुकला, ज्याच्या हत्येचा उलगडा व्हायला आणि मुख्य आरोपीला अटक व्हायला ४ वर्ष वाट पाहावी लागली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.