गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या या मोदींनी पाच लाख डोळ्यांची ऑपरेशन पार पाडली आहेत…..

मुरुगप्पा चनविरप्पा मोदी हे असे डॉक्टर आहे ज्यांच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आहे त्यामागे त्यांनी केलेला रेकॉर्ड तो म्हणजे आजवर त्यांनी पाच लाख डोळ्यांची ऑपरेशन पार पाडली आहेत.

ही अशी माणसं जास्त प्रसिद्धीच्या झोतात न राहता निमूटपणे आणि शांतपणे आपलं काम करत असतात तर जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्दल. मोठ्या प्रमाणावर नेत्र शिबिरं आयोजित करून मुरुगप्पा चनविरप्पा मोदी भारतभर डोळ्यांविषयी जनजागृती निर्माण केली. भारताच्या लहान लहान खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी कामं केली. भारताचे सगळ्यात मोठे आय सर्जन म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो.

4 ऑक्टोबर 1916 रोजी कर्नाटकमधल्या बागलकोटमध्ये मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण जमखंडी येथे त्यांनी पूर्ण केलं तर आयुर्वेदिक महाविद्यालय बेळगावमधून त्यांनी डॉक्टरीची पदवी मिळवली. शिक्षण चालू असतानाच 8 ऑगस्ट 1942 साली मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांनी मुंबईत एक गांधीजींची सभा अटेंड केली आणि त्यांच्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव पडला. त्या सभेत इंग्रजांविरोधात भारत छोडोचा बडगा उगरलेला होता त्या सभेमध्ये मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांच्या मनावर गांधीजींनी गारुड केलं.

त्या सभेनंतर मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांनी दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं. जेव्हा मी लाखो अंध लोकांना भीक मागताना बघितलं तेव्हा माझ्या हृदयात ढवळाढवळ झाली, त्या लोकांकडे इलाजासाठी पैसेही नव्हते आणि आपलं कार्य या लोकांच्या भल्यासाठी व्हावं असं म्हणत मोदींनी आपल्या कार्याला आरंभ केला.

यानंतर मात्र मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांनी मागे वळून पाहिलं नाही. एकाच दिवसात त्यांनी तब्बल 833 मोतीबिंदू ऑपरेशन केले होते. भारतभर फिरून 46 हजार 120 गावांमध्ये दौरा करून 1 कोटी 21 लाख 18 हजार 630 नेत्र पीडितांचा उपचार केला. 1943 ते 2005 पर्यंत मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांनी तब्बल 10 मिलियनपेक्षाही जास्त लोकांवर उपचार केले आणि स्वस्तात 7.8 लाख लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन केलं होतं.

1980 मध्ये मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांनी एम.सी.मोदी आय हॉस्पिटल इन महालक्ष्मीपुरममध्ये उभारलं आणि शिबिर आधारित या हॉस्पिटलमध्ये मोदींनी खूप लोकांना मोफत उपचार दिले. आज घडीला या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांचे चिरंजीव अमरनाथ मोदी करत आहेत. मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांनी आपल्या काळात अनेक शिबिरं आयोजित केली, त्यांच्या शिबिरांची चर्चा दूरदूरच्या गावांमध्ये व्हायची. एका वेळेला 40 लोकांचे ऑपरेशन मोदी पार पाडायचे इतका सराईत त्यांचा हात झाला होता.

1956 मध्ये भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करत पद्मश्री तर 1968 मध्ये पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. 1986 मध्ये एका दिवसात 833 आय ऑपरेशन करत मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांनी गिनीज बुकात रेकॉर्ड केला होता. कर्नाटकात मोदींना मोदी कंनूकोत्ता अन्न म्हणजे दृष्टी देणारा म्हणून ओळखतात. 11 नोव्हेंबर 2005 साली मुरुगप्पा चनविरप्पा मोदी यांचं निधन झालं. पण आपल्या कार्याने त्यांनी लाखो लोकांना हे रंगीत जग दाखवून दिलं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.