कुंभमेळा झाल्यानंतर लाखोंच्या संख्येतले नागा साधू कुठे जातात…?

कुंभमेळा हे नाव जरी ऐकलं तरी सर्वात पहिली डोळ्यासमोर येणारी गोष्ट म्हणजे नागा साधू. तुम्ही एखाद्या कुंभमेळ्याला गेला असाल तर शाहीस्नान, आखाडा आणि आखाड्यात असणारे नागा साधू पाहिलं असतील. नागा साधूंचा जत्था च्या जत्था जेव्हा शाही स्थान करण्यासाठी येतो तेव्हा भल्या-भल्यांची फाटते.

आणि तुम्ही कधी कुंभमेळ्याला गेला नसाल तर नागा साधूंचे फोटो, त्यांच्या बातम्या पाहिल्याचं असतील. त्यामध्ये डोळ्यात आग असणारे, रागीट असणारे नागा साधू दिसतील तर कधीकधी चेष्टेचेष्टेत समोरच्या पत्रकाराची मज्जा घेणारे नागा साधू पण दिसतील..

या नागा साधूबाबात अनेक समज गैरसमज आहेत. म्हणजे नागा साधू कसे होतात. नागा साधू कोण असतात. नागा साधू कुंभमेळ्यानंतर कुठे जातात. असे अनेक प्रश्न. हेच प्रश्न आपण पाहणार आहोत.

तर सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे हे नागा साधू कोण असतात..

ज्या साधूच्या अंगावर वस्त्र नसते तो नागा साधू अस साधं गणित लावलं जातं. ते खरं पण आहे. पण महिला देखील नागा साधू होतात. पण त्या नग्न न राहता भगवी कपडे घालतात. त्यामुळे नग्नता म्हणजे नागा साधू इतकं सोप्प गणित यामागे नाही.  नागा साधू कोणाला म्हणायचे असा प्रश्न पडता तर त्याचं उत्तर नागा साधूंच्या इतिहासात सापडतं..

काय आहे इतिहास

इतिहास असा आहे की, नागा साधूंची फौज तयार करण्यात आली होती ती मुळातच धर्माचं रक्षण करण्यासाठी परकिय आक्रमणांचा विस्तार झाल्यानंतर धर्मरक्षणासाठी आदी शंकराचार्यानी आखाडे उभारले. यात धर्माचे रक्षण करणारे सैन्य म्हणूनच नागा साधूंचा उल्लेख होता. तो तितका खरा देखील आहे, कारण अब्दालीच्या सैन्याला हरवण्याची कामगिरी नागा साधूंनी केली होती असा इतिहास आहे.

त्रिशुल, तलवार, शंख आणि चिलीम हे नागा साधूंसोबत असतच.

नागा साधू कुठे तयार होतात.

नागा साधू हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज अर्थात अलाहाबाद या ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यांच्या दरम्यान नागा साधूंना दिक्षा दिली जाते. ज्या ठिकाणी दिक्षा घेतली जाते त्याप्रमाणे याचे वर्गीकरण देखील होते, म्हणजे जे साधू नाशिकला दिक्षा घेवून नागा साधू बनतात त्यांना खिचडी नागा तर जे साधू हरिद्वारला दिक्षा घेवून नागा बनतात त्यांना बर्फानी नागा, जे नागा साधू उज्जैनला दिक्षा घेतात त्यांना खूनी नागा आणि जे प्रयागराजला दिक्षा घेतात त्यांना राजराजेश्वर नागा असे संबोधले जाते.

संबधित साधू कोणत्याही आघाड्याचे असले तरी जो जिथे दिक्षा घेतो तिथल्या प्रकृतीनुसार त्यांना ही नावे देण्यात आली असल्याचं सांगण्यात येत.

पण हे नागा साधू तयार कसे होतात..

नागा साधू तयार होण्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. पण सर्वात जवळ जाणारी माहिती दिली आहे ती ऐसिटिक गेम्स या पुस्तकात, यात स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस सांगण्यात आली आहे.

त्यातली पहिली प्रोसेस आहे ती मठात जाण्याची.. 

चला आत्ता लय कंटाळा आलाय जगाचा, नागा साधू होता आणि सगळ्यांना फाट्यावर मारतो म्हणून उठला आणि गेला असा प्रकार नसतो. नागा साधू होण्यासाठी जे नामांकित आखाडे आहेत तिथे संपर्क करावा लागतो. मग ते लोकं तुमची चौकशी करतात. चौकशी कशासाठी तर तुम्ही पाठीमागच्या आयुष्यात काय केलय आणि कशासाठी नागा साधू व्हायचं आहे यासाठी.

काय आहे बऱ्याचदा नॉर्थ इंडियात मर्डर केसमध्ये अडकलेले, व्यभिचार केलेले गुन्हेगार पोलीसांपासून लपून राहण्यासाठी नागा साधू होवून वर्ष दोन वर्ष काढतात. अस मटॅरियल बाहेर ठेवण्यासाठीच चौकशी केली जाते. खरच धर्मासाठी नागा साधू व्हायचं आहे का? ती वृत्ती आणि प्रवृत्ती आहे का? हे तपासूनच अखाड्यात प्रवेश दिला जातो.

प्रवेश झाल्यानंतर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे लागते. यासाठी एक वर्ष ते १२ वर्ष जातात. त्या दरम्यान नागा साधू होता येत नाही पण व्रत कठोरपणे पालन करावे लागले.

महापुरूष अलंकार धारण करणं 

दूसऱ्या प्रोसेसमध्ये ब्रह्मचर्याची परिक्षा पास झाल्यानंतर शंकर, विष्णु, गणपती, शक्ती आणि सुर्याला गुरू मानून नागा साधूंची ओळख असणारे भस्म जे चितेच्या राखेपासून तयार केलेल असते, लंगोट, जानवं आणि रुद्राक्ष धारण करायला सांगितले जाते. या दरम्यान शेंडी ठेवलेली असते ती कापली जाते. त्यानंतर हा व्यक्ती भावी नागा साधू म्हणून गणला जातो.

तिसरी प्रोसेस असते दिंगबर अवस्थेची.. 

यात खऱ्या अर्थाने नागा साधू होण्याची प्रोसेस सुरू होते. केस कापडे जातात. पिंडदान केलं जातं. एकूण १७ पिंडदान केली जातात. नागा साधू होणाऱ्या व्यक्तीच्या आईवडिलांपासून ते मुलाबाळांपर्यन्त संबधित असणाऱ्या प्रत्येकाला मृत मानून पिंडदान केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचे पिंडदान होते व भौतिक जगासाठी तो व्यक्ती गेल्याचं सांगितलं जातं.

यानंतर कपड्यांचा त्याग केला जातो. उत्तरेला काही पावलं चालत जायला सांगितलं जातं. प्रातिनिधिक स्वरूपात हिमालयाच्या दिशेने प्रस्थान असा त्याचा अर्थ घेतला जातो. सुर्यास्त झाल्यानंतर आखाड्यात परत बोलवलं जातं आणि पेटत्या चितेच्या उपस्थितीत यज्ञ सुरू केला जातो. यावेळी ऋग्वेदातले पुरूष सुक्त मंत्राचं पठण होतं.

सर्वात शेवटची पद्धत असते ती लिंग भंग करण्याची. 

किर्ती स्तंभ आखाड्यामध्ये एक लांब खांब आहे. इथे भावी नागा साधूला बोलावून गुरू संबंधिताचे लिंग तीन वेळा खेचतो. अस सांगतात की या पद्धतीला टांग तोड म्हणतात. त्यानंतर लिंगात उत्तेजना निर्माण होत नाही. वासनेपासून ही व्यक्ती कायमची दूर जाते आणि नागा साधू होण्याची प्रोसेस पार पडते.

पण सर्वात महत्वाचा मुद्दा हे नागा साधू कोठे जातात

नागा साधू हे आखाड्याशी संबंधितच असतात. बऱ्याचदा आखाडा सोडून ते जात नाहीत. इतर अनेक साधू संन्याशी सर्वसामान्य लोकांमध्ये, शहरांमध्ये फिरताना आढळतात पण या नागा साधूंना भौतिक जगाची अपेक्षा नसते.

त्यामुळं ही लोकं एकतर निबीड अशा जंगलात, गंगेच्या काठी असणाऱ्या स्मशानात किंवा आखाड्यातच जगत असतात. जेव्हा कुंभमेळा येतो तेव्हा मात्र हे सर्व एकत्र येतात. पुन्हा आल्या पावली आपल्या आपल्या एकटेपणाच्या जगात जातात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.