प्रकाशक ज्यांची कादंबरी छापत नव्हते त्या नजुबाई विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या…
साहित्य संमेलन हा आपल्याकडे कायम चर्चेचा विषय असतो. म्हणजे इथं पुस्तकं वाचणारे कमी, पुस्तकांवर चर्चा कमी आणि राजकीय भाषणं, नेते यांना लेखकांपेक्षा महत्वाचं स्थान असतं. तस पाहिलं तर राड्याचा भाग सोडला तर इथं अस्सल जातीवंत लेखक लेखकांशी वाचकांची भेट होते. आपल्या आवडत्या लेखकाला भेटायला इथं संधी असते. सरकारकडून ५० लाखांचे अनुदान घेऊनही हे संमेलन बहुतेक वेळा गाजते ते साहित्यबाह्य़ गोष्टींमुळेच. अशा संमेलनातील राजकारणापासून दूर राहूनही मराठीत अनेक साहित्य संमेलने होत असतात.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा देखील वादाचा मुद्दा असतो पण हा किस्सा अशा एका लेखिकेचा आहे ज्यांना
तुमच्या कादंबरीची भाषा लोकांना कळणार नाही म्हणून आम्ही ती छापू शकत नाही म्हणून प्रकाशकांनी नकार दिला होता पुढे त्याच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.
२०१७चं विद्रोही साहित्य संमेलन २३-२४ डिसेंबरला शहादा येथे झालं त्याच्या अध्यक्षपदी आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां व साहित्यिका नजुबाई गावित यांची निवड झाली होती त्यांच्या बद्दलची ही माहिती पाहूया.
नजुबाई गावित यांचा धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी व भूमिहीन कष्टकरी कुटुंबात १० जानेवारी १९५० रोजी जन्म झाला. नजुबाईंना लहानपणापासूनच दारिद्रय़ाशी सामना करावा लागला. दहा भावंडे असल्याने जेमतेम चौथीपर्यंतच त्यांना शिक्षण घेता आले. आदिवासी समाजाची भयानक पिळवणूक होत आहे हे त्यांना वेळीच उमगले. त्यामुळेच १९७२ मध्ये त्यांनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. चळवळ चालवायची तर राजकीय पक्षाचे पाठबळ मिळायला हवे, या हेतूने त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाल्या. यातूनच धुळे येथे श्रमिक महिला सभेची स्थापना त्यांनी केली. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात विद्युत भागवत, छाया दातार आदींसोबत संघर्षांत नजुबाई आघाडीवर होत्या.
पुढे ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा’तून अनेक लढे त्यांनी दिले. वनजमीन हक्काचा लढा उभारण्यात त्या पुढे होत्या. एक गाव एक पाणवठा, विषमता निर्मूलन यांसारख्या सामाजिक चळवळींमध्ये नजुबाई होत्या. आदिवासी महिलांवर कमालीचा अन्याय होत असल्याने त्यांनी याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु आदिवासी समाज हिंदू नसल्यामुळे हिंदू कोड बिल वा कोणत्याही प्रकारचे कायदे आदिवासींना लागू होत नसल्याचा धक्कादायक निकाल तेव्हा न्यायालयाने दिला. या निर्णयाने त्या पेटून उठल्या. अनेक स्त्रीमुक्ती संघटनांना सोबत घेऊन त्यांनी आदिवासी महिलांना हिंदू कोड बिल लागू करावे यासाठी संघर्ष केला. मात्र यात त्यांना यश आले नाही.
नंतरच्या काळात ज्येष्ठ विचारवंत व प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या त्या संपर्कात आल्या. नंतर त्यांच्याशी विवाहबद्धही झाल्या. सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करतानाच त्यांनी आदिवासींच्या व्यथा मांडणारे लिखाणही केले. पण त्यांची आदिवासी भाषा कोणालाच कळणार नाही म्हणून ते प्रकाशकांनी छापण्यास नकार दिला होता. नंतर त्यांच्या ‘तृष्णा’ या आत्मवृत्तपर कादंबरीने मराठी साहित्यात खळबळ माजवली. अनेक पुरस्कार या कादंबरीला मिळाले.
इंग्रजांच्या विरोधात अनेक आदिवासी लढले, पण त्याची दखल घेतली न गेल्याने ‘भिवा भरारी’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. यात भिवाने इंग्रजांच्या विरोधात केलेल्या संघर्षांचे चित्रण आहे. ‘नवसा भिलणीचा एल्गार’ ही त्यांची कादंबरीही विलक्षण गाजली. त्यांनी अनेक कथाही लिहिल्या. त्यातील ‘बाबूची मोळी’ या कथेवर विजय तेंडुलकर यांनी चित्रपट बनवण्याची तयारीही सुरू केली होती. पुढे तेंडुलकर आजारी पडल्याने ते राहूनच गेले.
आदिवासींना मानाने जगता यावे यासाठी संघर्षशील असलेल्या नजुबाई गावित यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड योग्यच असल्याची भावना साहित्यवर्तुळात तेव्हा व्यक्त करण्यात आली होती.
हे ही वाच भिडू :
- फकिराच्या लुटीतून घुटी प्यायलेला माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
- औरंगजेबाला दहशत बसावी म्हणून घाटगेंनी मुघल सैन्याची मुंडकी गडाच्या बुरूजावर रचली…
- ब्रिटिश सत्तेत या क्रांतिकारकांनी छत्रपतींच्या गडावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला …
- त्या दिवशी कळलं सुपरस्टार राजेश खन्ना देखील शाहीर साबळेंचा मोठा फॅन होता